Haitham Ali Tabatabai killed Israel Air Strike : वर्षभराच्या युद्धविरामानंतर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. इस्रायलयने रविवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर हायथम अली तबताबाई ठार झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरात लेबनॉनवर झालेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. इस्रायलच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचा इशारा लेबनॉनने दिला आहे. या हवाई हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा अस्थिरता पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाहचा कमांडर कोण होता? त्याविषयी जाणून घेऊ…

मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध भडकणार?

प्राप्त माहितीनुसार, रविवारी इस्रायलच्या हवाई दलाने लेबनॉनच्या बेरुत शहरात असलेल्या एका इमारतीवर बॉम्बचा वर्षाव केला. हा परिसर हिजबुल्लाहच्या प्रभावाखाली असल्याचे सांगितले जाते. २०२५ च्या मध्यापासून इस्रायलने या परिसरात कोणताही हल्ला केला नव्हता. लेबनॉनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार; तर डझनभर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली होती. एकीकडे गाझा पट्टीत हमासबरोबर युद्ध सुरू असताना दुसरीकडे इस्रालयने हिजबुल्लाहवरही हवाई हल्ले केल्याने मध्य पूर्वेतील अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इस्रायलने लेबनॉनवर कसा हल्ला केला

७ ऑक्टोबर रोजी हिजबुल्लाहने इस्रायलवर गोळीबार सुरू केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले आणि नंतर लेबनॉनच्या हद्दीत घुसखोरी केली. या युद्धात आतापर्यंत लेबनॉनमधील ४,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय अंदाजे ११ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हिजबुल्लाहवरच्या हल्ल्यात इस्रायलममधील १२७ लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे, ज्यामध्ये ८० सैनिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. युद्धबंदीनंतरच्या महिन्यांतही इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत, ज्यात त्यांनी हिजबुल्लाह सदस्य, शस्त्रास्त्रांची ठिकाणे आणि हमासशी संबंधित पॅलेस्टिनींना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. लेबनॉनने त्यांचा हा दावा वारंवार फेटाळून लावला असून युद्धविरामाच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : भारतीय वंशाच्या मोस्ट-वॉन्टेड गुन्हेगाराला कॅनडात अटक; निकोलस सिंग नेमका आहे तरी कोण?

इस्रायलच्या लष्कराने पोस्टमध्ये काय म्हटले?

इस्रायलच्या लष्कराने रविवारी हिजबुल्लाहवरच्या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी हिजबुल्लाचा टॉप कमांडर हायथम अली तबताबाई याचा खात्मा केल्याचा दावा केला. “आम्ही बेरूत शहरातील एका इमारतीवर हल्ला करून हिजबुल्लाहच्या प्रमुख कमांडरला ठार केले आहे. हायथम अली तबताबाई याचा यशस्वीरित्या खात्मा करण्यात आला आहे”, असे इस्रायली सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले. दुसरीकडे हिजबुल्लाहनेही तबताबाईच्या मृत्यूची कबुली दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आम्ही महान जिहादी कमांडर गमावले असून त्यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा इशारा हिजबुल्लाहकडून देण्यात आला आहे.

हायथम अली तबताबाई कोण होता?

  • हायथम अली तबताबाई याचा जन्म १९६८ मध्ये लेबनॉनमध्ये झाला. त्याचे वडील इराणी आणि आई लेबनीज होती.
  • इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, तबताबाई १९८० च्या दशकात हिजबुल्लाह संघटनेत सामील झाला आणि त्याने अनेक वरिष्ठ पदे भूषवली.
  • लेबनॉनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तबताबाईने सीरिया आणि येमेनमध्ये सहयोगी गटांना मदत करण्यासाठी सैनिकांबरोबर काम केले.
  • चीफ ऑफ स्टाफ होण्यापूर्वी तबताबाई हा येमेन प्रकरणाचा पर्यवेक्षण करत होता, असे हिजबुल्लाहच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
  • जुलै २०२५ मध्ये इस्रायलने हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर फुआद शुकरला ठार केल्यानंतर तबताबाई पुन्हा लेबनॉनमध्ये रुजू झाला.
  • त्याचे लष्करी कार्य लेबनॉनच्या सीमांच्या पलीकडेही पसरले होते आणि तो सीरियामध्ये बशरमधील अल-अस्सादच्या सरकारी सैन्याला मदत करत होता.
  • २०२३–२४ च्या युद्धात इस्रायलच्या कारवायांमध्ये हिझबुल्लाहचे अनेक वरिष्ठ नेते ठार झाले होते.
  • या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तबताबाई याने युद्धाच्या काळात ऑपरेशन्स डिव्हिजनची जबाबदारी सांभाळली.
  • इस्रायल आणि लेबनॉनच्या युद्धविरामानंतर तबताबाईला चीफ ऑफ स्टाफ बनवण्यात आले.
  • येमेनच्या हुती बंडखोरांनाही हायथम अली तबताबाई याचा मोठा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.
  • २०१६ मध्ये अमेरिकेने तबतबाईला दहशतवादी म्हणून घोषित करून त्याच्या अटकेसाठी ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.

हेही वाचा : सकाळच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका; झोपेतून उठताच काय करू नये? तज्ज्ञ काय सांगतात?

इस्रायलने बेरुत शहरावर कसा केला हल्ला?

युद्धविरामानंतरही हिजबुल्लाहकडून वारंवार सीमावर्ती भागातील नागरिकांवर गोळीबार केला जात होता, त्यामुळेच इस्रायलयी लष्कराने लेबनॉनच्या बेरुत शहरावरील हिजबुल्लाहच्या इमारतीवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर हायथम अली तबताबाई मारला गेला. इस्रायलयने इमारतीवर हवाई हल्ला केल्यानंतर चौथ्या मजल्यावर भीषण स्फोट झाला. आजूबाजूचे लोक जीव मुठीत घेऊन पळत होते. सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आणि या हल्ल्यात काही निष्पाप लोकांनाही प्राण गमावावे लागले, असे बेरुत शहरातील एका व्यक्तीने अल जजीराला सांगितले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात पाच निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून २५ ते २८ जखमी झाले आहेत.

हिजबुल्लाहचे पुढील पाऊल काय?

२०२३–२४ च्या युद्धामुळे हिजबुल्लाचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले होते. वरिष्ठ नेत्यांच्या सतत होत असलेल्या हत्यांमुळे संघटनेला जलदगतीने नवीन नेतृत्व उभे करावे लागले. यादरम्यान हिजबुल्लाहने तबताबाईला इब्राहिम अकीलचा उत्तराधिकारी मानले होते. परंतु, इस्रायलच्या हल्ल्यात आता तोही ठार झाल्याने संघटनेसमोर नेतृत्वाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इस्रायलविरुद्धच्या युद्धविरामानंतर हिजबुल्लाहने मोठे हल्ले टाळले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी इस्रालयी सैन्याला इशारा देण्यासाठी दोन रॉकेट्स सोडले होते. मात्र, आता तबताबाईच्या मृत्यूनंतर हिझबुल्लाह संयम राखणार की इस्रायलवर हल्ला चढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.