गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायल हा भारताचा घनिष्ठ मित्र ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध अचूक हल्ला करणाऱ्या इस्रायलनिर्मित शस्त्रांमुळे भारताची भेदकक्षमता वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात येत असलेल्या अशा काही शस्त्रांचा आढावा… हॅरॉप ड्रोन हॅरॉप ड्रोन हे रडारचा वेध घेणारी ड्रोन म्हणून ओळखले जातात. पाकिस्तानातील विविध सामरिक ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला गेल्याची माहिती आहे. ‘इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज’ने (आयएआय) हा ड्रोन विकसित केला आहे. शत्रूच्या रडार यंत्रणा, हवाई सुरक्षा यंत्रणा आणि महत्त्वाची सामरिक ठिकाणे या ड्रोनचा वापर करून भेदता येतात. अचूक हल्ला करण्यासाठी घेण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये या ड्रोनचा प्रामुख्याने उलेख करावा लागेल. भारताच्या भात्यात या ड्रोनची संख्या वाढत आहे. लक्ष्यावर घोंघावून विविध बाजूंनी हे ड्रोन त्याचा वेध घेतात. समुद्रासह जमिनीवरूनही हे ड्रोन शत्रूवर डागता येतात. पाकिस्तानची संरक्षण क्षमता कमकुवत करण्यासाठी या ड्रोननी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वृत्त आहे. आत्मघाती ड्रोन किंवा कामिकाझे ड्रोन म्हणूनही ओळखले जातात. ड्रोनवर बसविलेल्या कॅमेऱ्याच्या आधारे लक्ष्य अचूक टिपले जाते. स्वयंचलित किंवा इतर पद्धतीने या ड्रोनचा वापर करून हल्ला करता येतो. हेरॉन एमके २ यूएव्ही भारताच्या हवाई दलाकडे ‘इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज’ने (आयएआय) विकसित केलेले हेरॉन एमके २ हे मध्यम उंचीवरून मारा करणारे, दीर्घ पल्ला असलेले मानवरहित हवाई वाहन अतिशय महत्त्वाचे आयुध आहे. प्रामुख्याने टेहळणीकरिता याचा वापर केला जातो. दीर्घ पल्ल्याचे सेन्सर आणि रडारने ही यूएव्ही सज्ज असतात. ८.५ मीटर लांबी, १६.६ मीटर पंखांचा आकार, ४९० किलो वजन नेण्याची क्षमता आहे. उड्डाण करताना एकूण १४३० किलो वजन यूएव्ही पेलू शकते. ४५ तास हे यूएव्ही एका वेळी उडू शकतात. २४ तास टेहळणीची क्षमता, सीमा न ओलांडता १० किलोमीटरपर्यंतची गुप्तवार्ता मिळविण्याची या यूएव्हीची क्षमता आहे. ३५ हजार फूट उंचीपर्यंत हे यूएव्ही उडू शकते. जे लक्ष्य भेटायचे आहे, ते लेझरने प्रकाशझोतात आणून लढाऊ विमानांना ते उद्ध्वस्त करण्यासाठी हे यूएव्ही मदत करतात. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी ही यूएव्ही सज्ज करता येतात.
स्पाईस बॉम्ब
अचूक आणि गाइडेड हल्ला करणारे हे बॉम्ब आहेत. बॉम्बना अचूक आणि जीपीएसद्वारे दिशा देणारी याची रचना आहे. राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम ही इस्रायलची संरक्षण कंपनी आणि अमेरिकेतील राफेल यूएसए ही उपकंपनी यांनी हे बॉम्ब बनवले आहेत. यात बॉम्बच्या पुढील बाजूला दिशादर्शक उपकरण आणि मागे नियंत्रक उपकरण बसवलेले असते. दिशादर्शक उपकरण इलेक्ट्रो-ऑप्टिकल किरणांचा वापर करून लक्ष्य शोधते. नियंत्रक त्याच्या पंखांचा वापर करून बॉम्ब लक्ष्यावर टाकतो. हा बॉम्ब जीपीएसचाही वापर काही वेळा करतो. अचूक हल्ला, दीर्घ पल्ला, हलत्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता, रडार अथवा इतर प्रणालींवर अवलंबित्व नसणे आदी बाबी या बॉम्बच्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. या बॉम्बच्या विशिष्ट गुणधर्मामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेपासून विमानाला दूर राहून लक्ष्यभेद करता येतो. वजन, पल्ला आणि क्षमतेनुसार या बॉम्बचे चार प्रकार आहेत. स्पाईस २५०, १०००, २००० आणि ३००० असे चार प्रकार आहेत. यातील २५०, हजार, एक, दोन, तीन हजार हे आकडे बॉम्बचे पौंडमधील वजन दर्शवतात. स्पाईस २००० बॉम्बचा पल्ला ६० किलोमीटर, तर इतर प्रकारच्या बॉम्बचा पल्ला १०० किलोमीटर आहे. सर्व प्रकारच्या वातावरणात हे बॉम्ब वापरता येतात. इस्रायलसह, भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, पोलंड, अमेरिका हे देश हा बॉम्ब वापरतात.
इस्रायल भारताचा पाठीराखा
याशिवाय बराक क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय नौदलाकडे आहे, जी इस्रायलनेच दिलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलने विविध मुद्द्यांवर भारताला निःसंदिग्ध पाठिंबा दिलेला आहे. विशेषतः २००८मधील मुंबई हल्ल्यात नरिमन हाऊस या ज्यू वास्तूला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले व एक धर्मोपदेशक आणि त्याच्या पत्नीला ठार मारले. त्यानंतर दहशतवाद या मुद्द्यावर भारत आणि इस्रायल नेहमीच एकत्र आले. prasad.kulkarni@expressindia.com