इस्रायलची निवडणूक होऊन आठवडा उलटला तरी सत्ता स्थापनेचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा ‘लिकुड पक्ष’ आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गादी आयझेनकोट यांचा ‘याशर’ या दोन्ही पक्षांनाही संसदेत बहुमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे देशात पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांनी निवडणुकीचे अधिकृत निकाल स्वीकारल्यानंतर सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे. नव्या निवडणुकीची वेळ येऊ नये, यासाठी पक्षांनी काही आश्वासनांबाबत तडजोड करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे नेतान्याहू आणि आयझेनकोट यांच्यापैकी कोणाला सरकार स्थापनेची संधी मिळणार आणि आघाडीचे गणित कसे जुळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेतान्याहूंना बहुमताच्या आकडा का गाठता आला नाही?

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या क्नेसेटच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. नेतान्याहूंच्या नेतृत्वातील धार्मिक-राष्ट्रवादी आघाडीला १२० सदस्यांच्या संसदेत केवळ ५३ जागांवर विजय मिळवता आला. सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ जागांची आवश्यकता असते. दुसरीकडे, त्यांचे प्रतिस्पर्धी गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला देखील केवळ ४८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही प्रमुख आघाड्या बहुमतापासून खूप दूर आहेत. अशावेळी अरब पक्ष निर्णायक ठरु शकणार आहेत, कारण अरब पक्षांनी १९ जागांवर विजय मिळवला आहे.

निवडणुकीनंतर नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने निकालाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप पक्षाने केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारा असा कोणताही गैरप्रकार आढळला नाही, असे इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने स्पष्ट केले आहे. समितीने निकाल प्रमाणित करून तो राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडे सादर केला आहे.

या निकालामुळे इस्रायलमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आता छोट्या पक्षांचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे. विशेषतः अरब पक्षांना मिळालेल्या १९ जागा निर्णायक ठरू शकतात. हे पक्ष कोणत्या गटाला पाठिंबा देणार किंवा कोणाच्या बाजूने शिफारस करणार, यावर नव्या सरकारच्या स्थापनेचे गणित ठरणार आहे.

नेतान्याहूंसमोर गादी आयझेनकोट यांचे कडवे आव्हान

इस्रायलमधील सत्तासंघर्षात गादी आयझेनकोट हे नेतान्याहू यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून समोर आले आहेत. आयझेनकोट यांच्या ‘याशार’ पक्षाने संसदेत २१ जागा जिंकल्या असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने २७ जागा मिळवत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. इस्रायलचे माजी लष्करप्रमुख असलेले आयझेनकोट आता नेतान्याहू यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. ‘चेंज ब्लॉक’मधील पक्षांनी पंतप्रधानपदासाठी त्यांच्याच नावाची शिफारस करण्याचे ठरवले आहे. ‘चेंज ब्लॉक’च्या ४८ जागांव्यतिरिक्त डेमोक्रॅट्स, बियाचाद, इस्रायल बेतेनू आणि रा’आम या पक्षांचाही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असणार आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत आयझेनकोट यांच्या बाजूने शिफारस करणाऱ्या खासदारांची संख्या ५६ वर पोहोचल्याचे ‘यनेट’ने म्हटले आहे. यामुळे सरकार स्थापनेच्या शर्यतीत ते नेतान्याहू यांच्यापेक्षा पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र, राष्ट्राध्यक्षांकडून सरकार स्थापनेचा आदेश मिळाला तरी बहुमताचा आकडा गाठणे आयझेनकोट यांच्यासाठीही सोपे नाही. इस्रायल बेतेनू पक्षाचे प्रमुख अविग्दोर लिबरमन हे जर नेतान्याहूंसोबत सरकारमध्ये सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच ते अरब पक्षांचा पाठिंबा घेण्यास किंवा अति-धार्मिक हरेदी पक्षांसोबत आघाडी करण्यासही नकार दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे संभाव्य आघाडीची समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे नेतान्याहू यांना सत्तेतून दूर करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांना सरकार स्थापन करताना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सामायिक भूमिका मांडावी लागू शकते.

इस्रायलचा नवा पंतप्रधान कोण ठरवणार?

नेतान्याहू आणि आयझेनकोट या दोन्ही गटांना बहुमतासाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे अरब पक्षांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत अरब पक्षांच्या रा’आम आणि ‘जॉइंट लिस्ट’ या दोन्ही आघाड्यांनी मिळून १९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यावेळी सरकार स्थापनेत या पक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो.

मन्सूर अब्बास यांच्या नेतृत्वाखालील रा’आम पक्षाने आयझेनकोट यांच्या नावाची राष्ट्राध्यक्षांकडे शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या बाजूने शिफारस करणाऱ्या खासदारांची संख्या ५६ वर पोहोचली आहे. मात्र, ११ जागा मिळवलेल्या ‘जॉइंट लिस्ट’ने अद्याप आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ‘चॅनल १२’ च्या वृत्तानुसार, जॉइंट लिस्टकडून आयझेनकोट यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो किंवा तटस्थ राहण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. या पक्षाच्या सर्व ११ खासदारांनी आयझेनकोट यांना पाठिंबा दिल्यास ते बहुमताचा आकडा पार करु शकतात.

मात्र, अरब पक्षांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्यास नेतान्याहू यांनी ठाम विरोध केला आहे. त्यामुळे आयझेनकोट यांना या पक्षांचा पाठिंबा मिळाला, तरी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष सरकार स्थापन करण्याबाबत कोणती भूमिका घेतली जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अरब पक्षांच्या पाठिंब्यामुळे आयझेनकोट यांच्या बाजूने बहुमताचे गणित जुळण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी नेतान्याहू यांच्याबाजूने छोट्या पक्ष उभे राहू शकतात. मात्र, अरब पक्षांना सरकारमध्ये सहभागी करून घेतल्यास इस्रायलचे विघटन होईल, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे. अरब पक्षांवर अवलंबून राहण्यास त्यांचा विरोध असल्याने आपल्या आघाडीतील जागांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना पर्यायी पक्षांपर्यंत पोहोचावे लागणार आहे.

दुसरीकडे, सात जागा असलेल्या अति-धार्मिक ज्यूंच्या ‘युनायटेड तोराह ज्यूडाइझम’ (यूटीजे) या पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे. मात्र, या पक्षातील चार जागा असलेल्या ‘डेगेल हातोराह’ या गटाने नेतान्याहू किंवा आयझेनकोट यांपैकी कोणाच्याही नावाची शिफारस न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे इस्रायलमध्ये सरकार स्थापनेचे गणित केवळ दोन प्रमुख राजकीय गटांमधील जागांच्या संख्येवर अवलंबून राहिलेले नाही. अरब पक्षांचा पाठिंबा, अति-धार्मिक ज्यू पक्षांची भूमिका आणि आघाडीतील पक्षांच्या अटी यांमुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडून कोणाला सरकार स्थापनेची संधी मिळते आणि तो पक्ष आवश्यक बहुमताची जुळवाजुळव कशी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.