इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने साऱ्या जगाचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या दरम्यान गेल्या रविवारी तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकन सिनेटर्सच्या शिष्टमंडळाला सायरन वाजताक्षणी अचानकच बॉम्ब निवारा/ बॉम्ब शेल्टर्समध्ये नेण्यात आले. या शिष्टमंडळात सिनेटर्स चक शूमर, मिट रोमनी, बिल कॅसिडी, जॅकी रोसेन आणि मार्क केली यांचा समावेश होता. शुमर हे शिष्टमंडळाच्या संघर्षग्रस्त इस्रायलच्या दौऱ्याचे नेतृत्व करत होते, त्यांनी या घटनेची माहिती देणारी पोस्ट एक्सवर (X) (पूर्वीचे ट्विटर) केली. या त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांनी बंकरमध्ये असलेल्या आपल्या शिष्टमंडळाचे छायाचित्र देखील दिले आहे, या निमित्ताने एकूणच युद्धभूमीवर असणाऱ्या बॉम्ब शेल्टर्सचा इतिहास आणि गरज समजून घेणे नक्कीच समयोचित ठरावे. चक शूमर काय म्हणाले? चक शूमर यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, "आज तेल अवीवमध्ये असताना, आमच्या शिष्टमंडळाला हमासकडून आलेल्या रॉकेटपासून संरक्षण म्हणून बॉम्ब शेल्टरमध्ये नेण्यात आले. यातूनच इस्त्रायलींना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत आहे, ते कळते. आम्ही इस्रायलला स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा प्रदान केला पाहिजे.” एकूणच या पोस्टद्वारे युद्धजन्यस्थितीत हे शेल्टर्स विशेषतः एअर रेड शेल्टर्स किती महत्त्वाचे आहेत त्याचा अंदाज येऊ शकतो. आणखी वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते? युद्ध, विमान आणि बॉम्ब युद्ध आणि त्याचा इतिहास हा काही नवा नाही. मानवाच्या उत्पत्ती आणि उत्क्रांती इतकाच युद्धाचा इतिहासही जुना आहे. शिकारीपासून ते टोळीयुद्धापर्यंत, टोळीयुद्धापासून ते जागतिक महायुद्धापर्यंत मानवाने मारलेली मजल एकाच वेळी स्तुतीस आणि निंदेस पात्र आहे. युद्ध तिथे बचाव पर्यायाने येतोच. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून युद्धासारख्या परिस्थितीत वाचण्यासाठी मानवाने पर्यायी मार्ग देखील शोधले, हे संशोधनातून लक्षात येते. याच बचावाच्या- संरक्षणाच्या प्रक्रियेतून काळाच्या ओघात ‘बॉम्ब शेल्टर्स’ ही संकल्पना विकसित झाली. कालांतराने तंत्रज्ञानात इतकी प्रगती झाली की, एकाच वेळी आणि एकाच हल्ल्यात जास्त नरसंहार करणारे बॉम्ब, अणुबॉम्ब तयार झाले आणि ते वाहून नेणारी विमानेही आली. याच आकाशातून होणाऱ्या बॉम्बहल्ल्यापासून संरक्षणार्थ ‘बॉम्ब शेल्टर्स’ची योजना करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे शेल्टर्स मूलतः वेगवेगळ्या प्रकारच्या बॉम्ब शेल्टर्सची योजना ‘आक्रमण आणि प्रतिकूल स्फोटकांपासून संरक्षण’ मिळविण्याकरिता केली जाते. बॉम्ब शेल्टर्सच्या श्रेणीत प्रामुख्याने एअर रेड शेल्टर्स, फॉल आउट शेल्टर्स, अंडर ग्राउंड बंकर इत्यादींचा समावेश होतो. एअर रेड शेल्टर्स म्हणजे मोठ्या क्षेत्रावर बॉम्ब टाकणाऱ्या बॉम्बर विमानांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेली रचना. अँडरसन शेल्टर हे अमेरिकेतील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरले गेलेले एअर रेड शेल्टर हे या प्रकारात मोडणारे आहेत. आणखी वाचा: इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज ! फॉलआउट शेल्टर हे विशेषत: आण्विक युद्धासाठी तयार केले जातात. ज्यामध्ये अणुस्फोटामुळे होणार्या किरणोत्सर्गाला प्रतिबंधित करण्याच्या उद्देशाने जाड भिंतीची रचना असते. शीतयुद्धादरम्यान नागरी संरक्षण उपाय म्हणून असे अनेक शेल्टर्स बांधण्यात आले. फॉलआउट शेल्टर पारंपारिक बॉम्बस्फोटांपासून संरक्षण करतात. शॉक वेव्ह आणि अतिदाब तसेच भूकंपापासून संरक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बॉम्ब शेल्टर्सचे हे प्रकार नागरिक आणि लष्करी वापरासाठी अनुकूल असले तरी, बंकर हा प्रकार मोठ्या प्रमाणात लष्करासाठी वापरला जातो. "बॉम्ब शेल्टर" या शब्द प्रयोगाचा जुना उल्लेख १८३३ सालातला आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात बॉम्ब शेल्टर्स १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बांधले गेले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान तळघर, हॉचबंकर, आणि अंडरपास यासारख्या अनेक प्रकारच्या संरचनांचा हवाई हल्ला आश्रयस्थान-बॉम्ब शेल्टर्स म्हणून वापर करण्यात आला. १९ व्या शतकात बॉम्ब शेल्टर्स मोठ्या प्रमाणात का बांधले गेले? हेन्री टी. कॉक्सवेल या इंग्लिश वैमानिकाने १८४८ सालामध्ये विमानातून पहिला बॉम्ब टाकला. ऑगस्ट १८४८ साली, पहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धादरम्यान, आकाशातून टाकलेल्या या पहिल्या बॉम्बस्फोटाची नोंद करण्यात आली होती. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धाला बॉम्बफेक युद्ध म्हटले जाते. या जागतिक दोन युद्धांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विमानातून बॉम्ब टाकण्यात आले, परंतु हवाई युद्धाची उत्पत्ती अगदी पहिल्या महायुद्धापूर्वीची झाली होती. १९११ मध्ये तुर्की-इटालियन युद्धात हवेतून पहिला बॉम्ब टाकण्यात आला होता. १९१२ मध्ये मोरोक्कन युद्धात, फ्रेंच आणि स्पॅनिश यांनी देखील हवाई बॉम्बफेक केला होता. परंतु या पद्धतीचा सर्वात जास्त वापर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात झाल्याने, हे युद्ध विमान आणि बॉम्ब यांच्या एकत्रित समीकरणातून विध्वंसक ठरले होते, आणि याच युद्धांनी येणाऱ्या भविष्यातील युद्धांची दिशा बदलली. याच युद्धादरम्यान आणि नंतर युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाण बॉम्ब शेल्टर्स बांधण्यास सुरवात झाली. पहिल्या महायुद्धादरम्यान झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे अमेरिकेत तब्बल ८० भूमिगत शेल्टर्स बांधले गेले होते. आणखी वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का? इस्रायल मधील शेल्टर्स इस्रायलची स्थापना युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने १९४८ साली इस्रायलच्या स्थापनेनंतर, १९५१ सालापासून सर्व इमारतींना बॉम्ब शेल्टर्स आवश्यक आहेत, हे घोषित करून त्या दिशेने उपायोजना राबवल्या गेल्या. सर्व वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा असलेली ठिकाणे रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर हल्ल्यांसाठी तयार तयार करण्यात आली. रासायनिक घटकांना प्रतिरोधक करणाऱ्या क्लोज-सायकल एअर सिस्टीमसह काही बॉम्ब शेल्टर्स तयार करण्यात आले. तसेच या व्यतिरिक्त बांधलेल्या बॉम्ब शेल्टर्स मध्ये रासायनिक एअर फिल्टरिंग सिस्टम समाविष्ट करण्यात आली होती. सार्वजनिक बॉम्ब शेल्टर्स (हवाई-हल्ला निवारा) सामान्यतः शांततेच्या काळात गेम रूम म्हणून वापरले जातात, जेणेकरुन मुलांना आवश्यकतेच्या वेळी त्यांच्यामध्ये प्रवेश करण्यास सोयीस्कर ठरेल आणि प्रसंगी ते घाबरणार नाहीत, असे प्रशिक्षण मिळेल. एकूणच युद्ध हा मानवी इतिहासाचा अविभाज्य भाग होता आणि आहे. कालानुरूप युद्धाचे स्वरूप बदलत गेलेले आहे. याच युद्धाचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहत आणि अनुभवत आहोत. मग ते कधी रशिया-युक्रेन युद्धाच्या माध्यमातून, वा इस्रायल-हमास युद्धातून असो. आकाशात गडगडाट करणारी विमाने येतात, आणि एका क्षणात होत्याचे- नव्हते होते. याच पार्श्वभूमीवर या बॉम्ब शेल्टरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही शेल्टर्स आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करतात, यामुळे जीवित हानीचे होणारे नुकसान नक्कीच कमी करता येते.