Israel Strikes on Oil Reserves : इस्रायलने शनिवारी रात्री इराणवर जोरदार हल्ले केले. त्यानंतर रविवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानच्या आकाशात धुराचे काळे लोट दिसून आले. सकाळी सूर्य प्रकाशाऐवजी तेहरानमधील नागरिकांनी काळोख अनुभवला. धुरामुळे लोक सकाळी खोकल्याने जागे झाले. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील तेलाच्या साठ्यांवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे आकाशात धुराचे काळे लोट सर्वत्र पसरले होते. इस्रायलकडून तेलाच्या साठ्यांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमुळे इराणच्या काही भागांत अ‍ॅसिडचा पाऊस पडला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

इस्रायलकडून कच्च्या तेलाच्या साठ्यांवर हल्ले

अमेरिका-इस्रायल व इराणमध्ये युद्ध सुरू होऊन आता दहा दिवस झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरूवात झाली. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलकडून शनिवारी (७ मार्च) रात्री तेलाच्या साठ्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरलचे भाव ९२.६९ डॉलरवरून वाढून ११४ डॉलरवर पोहोचले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्याने तेलाचे भाव तर वाढलेच परंतु, इराणमध्ये आरोग्य व पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

इराणी लष्कर तेलाच्या साठ्यांचा वापर करत असल्याने हल्ला?

२८ फेब्रुवारीला युद्धाची सुरूवात झाल्यानंतर ७ मार्चच्या रात्री पहिल्यांदाच इराणमधील तेलाच्या साठ्यांना लक्ष्य करण्यात आले. तेलाच्या साठ्यांमुळे इराणच्या लष्कराला बळ मिळत आहे, त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले, असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. “लष्करी तळांना सुरू ठेवण्यासाठी इराण तेलाच्या साठ्यांचा सातत्याने वापर करत आहे. इराणकडून इतर ग्राहक तसेच इराणी लष्कराला इंधन, तेल पुरवले जात आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या लष्कराला आणखी नुकसान पोहोचवण्यात आले आहे”, असे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे.

इस्रायलने कच्च्या तेलाच्या कोणत्या साठ्यांवर हल्ले केले?

इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील इंधन साठ्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तेहरान व अल्बोर्ज प्रांतातील कच्च्या तेलाच्या साठ्यांना लक्ष्य करण्यात आले. ईशान्य तेहरानमधील अघदासेह तेलाच्या गोदामावर, दक्षिणेतील तेहरान रिफायनरीवर, तेहरानच्या पश्चिमेतील शाहरान ऑइल डेपोवर तसेच कराज शहरातील तेलाच्या डेपोवर हल्ले करण्यात आले. शाहरान डेपोतील तेल रस्त्यांवरून वाहत होते, अशी माहिती समोर आली आहे. तेहरान व अल्बोर्जमध्ये झालेल्या हल्ल्यांत चार टँकर चालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘फार्स’ने दिले आहे. इंधन पुरवठा सुरळीत असून सध्या इराणी सैन्य लढा देत असल्याचे देखील ‘फार्स’मध्ये सांगण्यात आले. दरम्यान, तेहरानचे राज्यपाल मोहम्मद सादेघ मोतामेदिन यांनी रविवारी या हल्ल्यांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, हल्ल्यांमुळे काही काळ इंधन पुरवठा खंडीत झाला होता. परंतु, आता समस्या सोडवण्यात आली आहे.

तेहरानमध्ये हल्ल्यांनंतर सकाळी पसरला काळोख

इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये भल्या सकाळी काळोख पसरला होता. आकाशात काळ्या धुराचे लोट पसरल्याने सर्वत्र अंधार पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेहरानमधील एक कोटी लोकसंख्येने या भीषण परिस्थितीचा अनुभव घेतला. ‘द टेलिग्राफ’ला एका रहिवाशाने सांगितले, “तेहरानमध्ये झालेल्या बॉम्बवर्षावाने सर्वनाश झाल्यासारखी स्थिती उद्भवल्यासारखे वाटत होते.” कराज शहरातील व्यक्ती ‘बीबीसी’ला म्हणाली, “एक लाल रंगाचा प्रकाश आकाशात दिसला, त्यानंतर दरवाजांवर जोरात उष्णतेची लाट आदळली. त्यानंतर आम्ही गच्चीवर जाऊन पाहिले असता तेलाच्या डेपोला आग लागल्याचे दिसून आले.”

तेहरानमधील एक महिला भीषण परिस्थितीची माहिती देताना म्हणाली, “काहीतरी जळाल्याचा वास येत होता. आम्ही सकाळच्यावेळी सूर्य पाहू शकत नव्हतो. सर्वत्र भयावह धूर पसरला होता.” ‘एएफपी’ने वृत्तात म्हटले आहे, “सकाळी साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर धावणाऱ्या कार त्यांचे हेडलाइट्स ऑन ठेवून धावत होत्या.”

धुरामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य

‘द गार्डियन’ला एक महिला म्हणाली, “परिस्थिती खूपच भयंकर होती. तिचे वर्णन करणे अवघड आहे. धुराने संपूर्ण शहराला विळखा घातला होता. मला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच माझे डोळे व घसा जळजळ करत होता. अशा परिस्थितीतही लोकांना बाहेर पडणे गरजेचे होते. अनेक दुकाने उघडली पण काही वेळातच बंद झाली. कारण धुरामुळे घराबाहेर थांबणे अशक्य झाले होते.”

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

इस्रायलने इराणमधील तेलाच्या साठ्यांवर हल्ले चढवल्यानंतर जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ९२.६९ डॉलर होती. सोमवारी प्रति बॅरलच्या किंमतीत तब्बल २३ टक्क्यांची वाढ होऊन ती ११४ प्रतिडॉलर इतकी वाढली आहे.

पर्यावरण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

इराणमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. इराणच्या पर्यावरण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तेहरानमधील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेलाच्या साठ्यांवर झालेल्या हल्ल्याने घातक केमिकलचे उत्सर्जन होऊन अॅसिडचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा त्वचा, आतड्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. घरातील एसी सुरू करू नये, अॅसिडचा पाऊस पडल्यानंतर घरातून बाहेर पडू नये, उघड्यावर ठेवलेले अन्न खाऊ नये, असे आवाहन तेहरानमधील नागरिकांना करण्यात आले आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांवर अमेरिकेकडून नाराजी

इस्रायलने इराणमधील तेलाच्या साठ्यांवर केलेल्या हल्ल्यांवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. हल्ले करण्यापूर्वी इस्रायलने अमेरिकेला हल्ल्याबाबत माहिती दिली होती. परंतु, इस्रायलने इराणवर मोठ्या स्वरूपात हल्ले केले. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका व इस्रायलमध्ये या हल्ल्यांवरून मतभेद उघड झाले. “ही एक चांगली कल्पना आहे, असे आम्हाला वाटत नव्हते”, असे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या सल्लागाराने ‘एक्झिओस’ (Axios) या वृत्तसंस्थेला म्हटले की, “राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडणार नाही. तेल वाचवणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. ते जाळणे नव्हे. या हल्ल्यांमुळे गॅसच्या किंमती वाढतील.” दरम्यान, इस्रायलने जर तेलाच्या साठ्यांवर हल्ले करणे सुरूच ठेवले तर इराण पश्चिम आशियातील इतर देशांच्या तेलाच्या साठ्यांवर हल्ला चढवेल असा इशारा इराणने दिला आहे.