Israel-Iran War History and the strategic shift after the 1979 Islamic Revolution: आज इस्रायल-इराण संघर्षाच्या बातम्या जागतिक माध्यमांमध्ये झळकत असताना प्रश्न पडतो की, हे अचानक कसं सुरू झालं? परंतु, वास्तव वेगळं आहे. हा संघर्ष अचानक उद्भवलेला नाही. तो गेल्या पाच दशकांत हळूहळू वाढत गेलेल्या राजकीय, धार्मिक आणि लष्करी तणावाचा परिपाक आहे.
१ मार्च २०२६: संघर्षाचा नवा टप्पा
१ मार्च २०२६ पर्यंत इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहाटेच्या हल्ल्यानंतर खामेनी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेस दुजोरा दिला; त्यानंतर इराणच्या राष्ट्रीय माध्यमांनीही अधिकृत घोषणा केली. २०२५ साली जून महिन्यात झालेल्या महत्त्वपूर्ण ‘१२ दिवसांच्या युद्धा’नंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
मार्च २०२६: ताज्या घडामोडी
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणची आण्विक तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने व्यापक लढाईस सुरुवात केली. इराणने तत्काळ प्रत्युत्तर देत इस्रायलवर तसेच मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. कतार, संयुक्त अरब अमिरात, कुवैत, बहारिन आणि जॉर्डन येथील तळांवरही हल्ल्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. इराणी रेड क्रेसेंटच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, २०० हून अधिक मृत्यू आणि सुमारे ७०० जखमींची नोंद झाली आहे.

२०२५ चे १२ दिवसांचे युद्ध: निर्णायक पार्श्वभूमी
सध्याचा संघर्ष समजून घेण्यासाठी जून १३ ते २४, २०२५ दरम्यान झालेल्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’कडे पाहणे आवश्यक ठरते.
- १३ जून २०२५ रोजी इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या आण्विक तळांवर हवाई हल्ले सुरू केले. २२ जूनला अमेरिकेने अधिकृतपणे संघर्षात प्रवेश करत फोर्दो, नातांझ आणि इस्फहान येथील आण्विक तळांवर कारवाई केली.
- २४ जून २०२५ रोजी ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी जाहीर झाली. ती काही महिन्यांपर्यंत टिकली; परंतु २०२६ मधील नव्या आक्रमणाने पुन्हा तणाव उसळला.
- २०२५ मधील संघर्षात इराणमध्ये अंदाजे १,०६० ते १,१९० लोक मृत्युमुखी पडले, तर इस्रायलमध्ये सुमारे २९ ते ३३ जणांचा मृत्यू झाला होता.
- संघर्षाची उद्दिष्टे
- इस्रायलचे उद्दिष्ट स्पष्ट आहे; इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे निष्प्रभ करणे आणि हिझबुल्ला व हौथी यांसारख्या प्रादेशिक दहशतवादी गटांना दिले जाणारे समर्थन थांबवणे.
- अमेरिकेच्या दृष्टीने, ट्रम्प प्रशासनाने इराणला अण्वस्त्र प्राप्त करण्यापासून रोखणे आणि इराणी जनतेला सत्तांतरासाठी प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट सांगितले आहे.

मागे वळून पाहताना…
एकेकाळी इस्रायल-इराण या दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे बंध होते. १९४८ साली इस्रायलची स्थापना झाल्यानंतर इराणमधील शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या कारकिर्दीत इस्रायल-इराण संबंध व्यवहार्य आणि धोरणात्मक स्वरूपाचे होते. इराण इस्रायलला तेलपुरवठा करत असे; कृषी, पायाभूत सुविधा आणि गुप्तचर सहकार्यही होत असे. दोघांनाही अरब राष्ट्रवादी शासनांविरोधात समान स्वारस्य होते.
हे संबंध वैचारिक नव्हते, तर ते परस्पर हितसंबंधांवर आधारित होते. मात्र, १९७९ मधील इस्लामी क्रांतीने हे समीकरण पूर्णतः बदलले आणि त्यानंतर सुरू झालेला तणाव आज थेट लष्करी संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
१९७९: इस्लामी क्रांती आणि निर्णायक वळण
१९७९ हे वर्ष इस्रायल-इराण संबंधांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वळण मानले जाते. अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या इस्लामी क्रांतीने शाह मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून टाकली आणि इराणमध्ये इस्लामी प्रजासत्ताकाची स्थापना झाली. या नव्या व्यवस्थेने परराष्ट्र धोरणात मूलभूत बदल करत इस्रायलविरोधी भूमिका अधिकृत आणि वैचारिक धोरण म्हणून स्वीकारली. इस्रायलला बेकायदेशीर राष्ट्र, पाश्चिमात्य वसाहतवादी शक्तींचा प्रतिनिधी आणि इस्लामी जगाचा शत्रू म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर इराणने इस्रायलशी असलेले सर्व राजनैतिक संबंध तोडले आणि इस्रायलविरोधी संघटनांना राजकीय व लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. याच टप्प्यापासून दोन्ही देशांमधील आधुनिक शत्रुत्वाची औपचारिक सुरुवात झाली, जी पुढील दशकांत अधिक तीव्र होत गेली.
१९८०-१९९०चे दशक: छुप्या युद्धाची सुरुवात
१९७९ नंतर दोन्ही देशांनी थेट रणांगणावर आमनेसामने उभे राहण्याऐवजी अप्रत्यक्ष संघर्षाचा मार्ग स्वीकारला. इराणने लेबनॉनमध्ये हिझबुल्लाहची उभारणी केली आणि हा गट पुढे इस्रायलविरोधातील सर्वात प्रभावी आणि संघटित लष्करी शक्ती ठरला. २००६ च्या लेबनॉन युद्धात इस्रायलने प्रत्यक्षात हिझबुल्लाहशी लढा दिला, परंतु त्यामागे इराणचे राजकीय व लष्करी पाठबळ स्पष्टपणे दिसत होते. दरम्यान, इराणने सीरिया, इराक आणि गाझामध्येही आपला प्रभाव सातत्याने वाढवला. इस्रायलच्या दृष्टीने हे एक नियोजित ‘रिंग ऑफ फायर’ धोरण होते. म्हणजेच इस्रायलभोवती विविध आघाड्यांवर इराणपुरस्कृत शक्तींची साखळी निर्माण करणे. या संपूर्ण काळात संघर्ष उघड युद्धाच्या स्वरूपात नसला, तरी तो पडद्याआड सुरूच राहिला. गुप्त कारवाया, सायबरहल्ले, शस्त्रसाठ्यांवर हवाई हल्ले आणि मर्यादित लष्करी कारवाया यांमधून दोन्ही देश एकमेकांना सातत्याने प्रत्युत्तर देत राहिले.
२०००चे दशक: अणुकार्यक्रमाचा प्रश्न
२०००च्या दशकात इस्रायल-इराण तणावाला नवे परिमाण मिळाले ते इराणच्या अणुकार्यक्रमामुळे. इस्रायलने इराणच्या वाढत्या अणु क्षमतेकडे केवळ सुरक्षेचा नव्हे, तर अस्तित्वाचाच प्रश्न म्हणून पाहिले. दुसरीकडे, इराणने आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे नागरी आणि ऊर्जानिर्मितीसाठी असल्याचा दावा सातत्याने केला. या कालखंडात संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला. इराणी अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य करणारी हल्ल्यांची मालिका, सायबर युद्धाच्या कारवाया आणि गुप्त तोडफोडीच्या घटनांनी वातावरण ढवळून निघाले.
२०१५ साली इराण आणि जागतिक शक्तींमध्ये अणुकरार (JCPOA) झाला, ज्यामुळे काही काळ तणाव शमल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र २०१८ साली अमेरिकेने या करारातून माघार घेतल्यानंतर समीकरण पुन्हा बदलले. इराणने युरेनियम संवर्धनाची पातळी वाढवण्यास सुरुवात केली, तर इस्रायलने सीरियातील इराणी लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले तीव्र केले. सावलीतील संघर्ष आता अधिक उघड आणि थेट स्वरूप धारण करू लागला होता.
२०२०-२०२४: बदलती प्रादेशिक समीकरणे
२०२० ते २०२४ या काळात पश्चिम आशियातील सामरिक संतुलन लक्षणीयरीत्या बदलले. एका बाजूला इराणने इराक, सीरिया, लेबनॉन आणि येमेनमधील सहयोगी गटांच्या माध्यमातून आपला प्रभाव विस्तारला; तर दुसऱ्या बाजूला इस्रायलने काही अरब देशांशी संबंध सामान्य करत नवी राजनैतिक आघाडी उभारली. या बदलांनी पारंपरिक शत्रुत्वाची रेषा अधिक गुंतागुंतीची केली. दरम्यान, गाझा संघर्ष तीव्र होत असताना इराणपुरस्कृत गटांनी इस्रायलच्या विविध सीमांवर दबाव वाढवला. उत्तर सीमेवर हिझबुल्लाहची हालचाल, दक्षिणेकडील तणाव आणि प्रादेशिक क्षेपणास्त्र हल्ल्यांची शक्यता यामुळे वातावरण अधिक अस्थिर झाले. दोन्ही बाजूंनी थेट युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, तरी संघर्ष अधिक तीव्र होत गेला आणि उघड संघर्षाच्या शक्यतेकडे परिस्थिती हळूहळू ढकलली जात असल्याचे स्पष्ट दिसू लागले.
जून २०२५: १२ दिवसांचे हवाई युद्ध
जून २०२५ मध्ये इस्रायल-इराण संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला. अनेक महिन्यांपासून वाढत चाललेल्या मिसाईल हल्ल्यांच्या आणि प्रत्युत्तरात्मक कारवायांच्या मालिकेनंतर दोन्ही देश थेट आमनेसामने आले. अखेर इस्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवस चाललेले थेट हवाई युद्ध भडकले, जे त्यांच्या इतिहासातील अभूतपूर्व वळण मानले जाते. या संघर्षात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करून लष्करी पायाभूत सुविधांवर तीव्र हल्ले करण्यात आले. या सर्वांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरतेची भीती निर्माण झाली. या १२ दिवसांनी एक मूलभूत सीमा ओलांडली. आतापर्यंत चाललेला छुपा संघर्ष आता थेट युद्धाच्या स्वरूपात समोर आला. इस्रायल आणि इराण या दोन राष्ट्रांनी प्रथमच उघडपणे एकमेकांविरुद्ध लष्करी ताकद वापरली आणि त्यानंतर प्रादेशिक समीकरणे कायमची बदलली.
आत्ताच का हा संघर्ष?
इस्रायल-इराण संघर्ष २०२५-२६ मध्ये अचानक उफाळून आल्यासारखा वाटत असला, तरी त्यामागे काही स्पष्ट आणि दीर्घकालीन कारणांची साखळी आहे.
१) अणुकार्यक्रमातील वेगवान प्रगती
इराणच्या युरेनियम संवर्धन क्षमतेत झपाट्याने झालेली वाढ ही इस्रायलसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरली. तांत्रिकदृष्ट्या इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वाढत असल्याचे इस्रायलला वाटू लागले. त्यामुळे ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ अपरिहार्य असल्याचा विचार बळावला.
२) दीर्घकाळ सुरू असलेला तणाव
१९७९ पासून सुरू असलेला अप्रत्यक्ष संघर्ष, छुपे युद्ध, गुप्त कारवाया आणि सायबरहल्ल्यांची मालिका या सगळ्याने ४५ वर्षांचा तणाव वाढत गेला. हा संघर्ष एका निर्णायक बिंदूपर्यंत पोहोचला आणि युद्धाला सुरुवात झाली.
३) बदललेली प्रादेशिक समीकरणे
पश्चिम आशियातील नव्या आघाड्या, इस्रायल-अरब देशांमधील सामान्य झालेले संबंध आणि इराणचा वाढता प्रभाव… या सगळ्यामुळे जुनी व्यवस्था ढासळली. प्रतिबंधक कूटनीति आणि अप्रत्यक्ष संवादाच्या यंत्रणा कमकुवत झाल्या.
४) अंतर्गत राजकीय दबाव
दोन्ही देशांतील राजकीय वातावरणही तितकेच निर्णायक ठरले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याचा दबाव वाढला. अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि जनमत यामुळे आक्रमक धोरणांना अधिक पाठबळ मिळाले.
या सर्व घटकांच्या एकत्रिकरणातून संघर्षाचा ज्वालामुखी २०२५-२६ मध्ये उफाळून आला आणि ‘आता का?’ या प्रश्नाचे उत्तर या बहुआयामी कारणांमध्ये दडलेले दिसते.
वैचारिक व राजकीय समीकरणे बदलली
- इस्रायल-इराण संबंधांचा संपूर्ण इतिहास पाहिला, तर तो साधारणपणे तीन स्पष्ट टप्प्यांत विभागता येतो. १९७९ पूर्वीचा काळ हा व्यवहार्य सहकार्याचा होता; १९७९ ते २०२४ हा वैचारिक वैर, छुपे युद्ध किंवा शांतता काळातील संघर्षांचा कालखंड ठरला; आणि २०२५ नंतरचा काळ थेट युद्धाचा नवा अध्याय असल्याचे चित्र समोर येते.
- म्हणूनच आजचा संघर्ष अचानक उद्भवलेला नाही. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर बदललेल्या राजकीय आणि वैचारिक समीकरणांचा हा दीर्घकालीन परिणाम आहे. दशकानुदशके वाढत गेलेल्या अविश्वास, शत्रुत्व आणि लष्करी स्पर्धेचा हा परिपाक आहे.
- जून २०२५ मधील १२ दिवसांचे हवाई युद्ध या इतिहासातील केवळ एक अध्याय असला, तरी ते निर्णायक वळण ठरले. कारण त्याने अप्रत्यक्ष संघर्षाची मर्यादा ओलांडून थेट लष्करी संघर्षाचा मार्ग खुला केला.
- आजच्या घडामोडी समजून घ्यायच्या असतील, तर या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीकडे पाहणे अत्यावश्यक ठरते. इतिहासाची ही साखळी समजल्याशिवाय वर्तमानाचा अर्थ पूर्णपणे उलगडत नाही.
