Israel air strikes on Lebanon Beirut : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धात अमेरिका व इराण यांच्यात काल (८ एप्रिल) दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीचा करार झाला होता. परंतु, आता इस्रायलमुळे हा करार धोक्यात आला आहे. इस्रायलचा शेजारी देश असलेल्या लेबनॉनवरील हल्ले देखील थांबवावेत, अशी मागणी इराणची होती. परंतु, इस्रायलने शस्त्रसंधीची घोषणा झाल्याच्या काही तासांनंतरच लेबनॉनवर मोठा हल्ला केला आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलने फक्त १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले केले. त्यात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा इराणने निषेध केला आहे. तर लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचे ‘डील’ झाले नव्हते असा दावा अमेरिकेने केला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केला? पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका होईल का? सविस्तर जाणून घेऊयात.

शस्त्रसंधीवर इस्रायलची भूमिका काय?

अमेरिका व इराण दरम्यान पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. ८ एप्रिल (काल) रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत शस्त्रसंधीची माहिती दिली होती. “इराण व अमेरिका त्यांच्या मित्रराष्ट्रांसह शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. लेबनॉनसह इतर भागात ही शस्त्रसंधी तात्काळ लागू झाली आहे”, असे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इस्रायल शस्त्रसंधीला पाठिंबा देतो, पण लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले. “चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे. अमेरिका त्यांनी दिलेल्या आश्वासनाला जागते की नाही, हे जग पाहत आहे”, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वर म्हटले.

इस्रायल एकटा पडला का?

इस्रायल व लेबनॉन हे शेजारी देश आहेत. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे. शस्त्रसंधीची घोषणा होताच इस्रायलची लढाऊ विमाने लेबनॉनची राजधानी बैरुतच्या आकाशात दिसून आली. शस्त्रसंधीच्या विरोधात इस्रायलमधील जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. इस्रायल व लेबनॉनमध्ये मागील पाच दशकांपासून संघर्ष सुरू आहे. तसेच इस्रायलमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. शस्त्रसंधीचा करार अमेरिका व इराण या दोन देशांमध्ये झाल्याने आपल्याला डावलण्यात आल्याची भावना इस्रायलमध्ये आहे.

इस्रायलसाठी काय महत्वाचे?

१२ मार्च रोजी नेतान्याहू यांनी युद्धात इस्रायलची तीन महत्वाचे ध्येय सांगितली होती. इराणचा अणुकार्यक्रम रोखणे, इराणला बॅलेस्टिक मिसाइल तयार करण्यापासून रोखणे व इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणे. दरम्यान, इराणकडे अणुबॉम्ब बनवण्यासाठी पर्याप्त युरेनियमचा साठा आहे. अणुबॉम्ब बनवणे हे ध्येय नसल्याचे इराणने वारंवार सांगितले आहे. इराणचे एक तृतियांश क्षेपणास्त्र संपले असल्याची माहिती आहे. दरम्यान, इस्रायलचे विरोधी पक्ष नेते याईर लापिड म्हणाले, “इराणला ८६ वर्षीय खामेनी चालवत नव्हते, तर ५६ वर्षीय खामेनी चालवत होते.” इराण – अमेरिका चर्चेदरम्यान इस्रायलच्या या तीन ध्येयांचे काय होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इराण व अमेरिकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये होणार आहे. त्यामुळे इस्रायलच्या पंतप्रधानांना या चर्चेपासून दूर ठेवले जात असल्याची भावना इस्रायलमध्ये आहे. शस्त्रसंधीची घोषणा होण्याआधी झालेल्या वाटाघाटीत देखील नेतान्याहू यांना सामाविष्ट करण्यात आले नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इस्रायलचे विरोधी नेते याईर लापिड म्हणाले, इस्रायलचा या युद्धात ‘पाडकाम करणाऱ्या ठेकेदारा’ सारखा वापर करून घेण्यात आला. इस्रायल लेबनॉनमधील हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेविरोधात अनेक वर्षांपासून लढा देत आहे. हेजबोल्लाला संपवणे नेतान्याहू यांच्यासाठी महत्वाचे आहे. याच वर्षी इस्रायलमध्ये निवडणुका होणार आहेत.

इस्रायलचे हेजबोल्ला व लेबनॉन विरोधात न संपणारे युद्ध

इस्रायल व लेबनॉन हे शेजारी देश आहेत. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे. हेजबोल्ला ही लेबनॉनमधील इस्रायलच्या विरोधात कारस्थाने करणारी संघटना आहे. १९८२ मध्ये पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन लेबनॉनच्या दक्षिण भागातून म्हणजेच इस्रायलला खेटून असलेल्या सीमेपलीकडून इस्रायलवर हल्ल्यांचे कट रचते, असा संशय इस्रायलला होता. त्यामुळे इस्रायलने लेबनॉनचा दक्षिणेकडील भाग ताब्यात घेतला. १८ वर्षे लेबनॉनचा दक्षिणेकडील भाग इस्रायलच्या ताब्यात होता. याच कालावधीत इस्रायल विरोधात इराणच्या मदतीने हेजबोल्ला या संघटनेचा जन्म झाला. २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतली. त्यानंतर हेजबोल्लाने आखातात पहिल्यांदा इस्रायलविरोधात कोणी विजय मिळवल्याचे घोषित केले होते.

त्यानंतर २००६ मध्ये पुन्हा एकदा इस्रायल व लेबनॉनमधील हेजबोल्ला यांच्यात संघर्ष सुरू झाला. ३४ दिवस युद्ध चालले. सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या तीन इस्रायली सैनिकांची हेजबोल्लाने हत्या केली होती. तर दोन सैनिकांना बंदी बनवले होते. हे युद्धाचे कारण ठरले. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात जवळपास १००० हून अधिक नागरिक मारले गेले. युद्धात इस्रायलचे १५० हून अधिक नागरिक मारले गेले. इस्रायलला मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्यामुळे इस्रायली जनतेत रोष होता. इस्रायलने पूर्व तयारी न करता, घाईत लेबनॉनवर हल्ला केल्याचे एका इस्रायली समितीने सांगितले होते. त्या घटनेनंतर इस्रायलचे आजचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावरही हेजबोल्ला अस्तित्वात असल्याने टीका केली जाते.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने हेजबोल्लाचे दीर्घकाळ प्रमुख राहिलेल्या हसन नसरल्लाह याची हत्या केली. तसेच हेजबोल्लाचे अनेक टॉप कमांडर मारले. २०२४ मध्ये अमेरिका व फ्रान्सने मध्यस्थी करत दोघांमधील तणाव कमी केला. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल व अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केल्यानंतर हेजबोल्लाने इस्रायलवर रॉकेट डागून हल्ला केला. तेव्हापासून आतापर्यंत इस्रायल व हेजबोल्लामध्ये संघर्ष सुरू आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हेजबोल्लाचे वास्तव्य आहे. त्यामुळे लेबनॉनच्या दक्षिणेला असलेल्या इस्रायलवर हल्ले करणे हेजबोल्लाला सोपे जाते.

पुढे काय घडणार?

दक्षिण लेबनॉनचा लितानी नदीपर्यंतचा ३० किमी पर्यंतचा भाग ताब्यात घेणार असल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ २४ मार्च रोजी म्हणाले होते. दक्षिण लेबनॉनमध्येच हेजबोल्ला सक्रिय आहे. दरम्यान, लेबनॉनमधील सरकारने इस्रायलला चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. ते इस्रायलने फेटाळले. याआधी शस्त्रसंधी करारानुसार लेबनॉनमधील सरकार लेबनॉनमधून हेजबोल्लाला निशस्त्र करणार असे ठरले होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे आता इस्रायल आपले काम करत राहणार असे इस्रायलने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलने काल लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध फ्रान्स, इटली, स्पेन या देशांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच नेतान्याहू यांना आवर घालू शकतात. इराणबरोबर मागील वर्षी चाललेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर शस्त्रसंधी करण्यात आली होती. त्यानंतरही इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. तेव्हा ट्रम्प यांनी इस्रायलला “शांत राहण्याचे” आवाहन केले होते. तसेच “दोन्ही देश खूप वर्षांपासून लढत आहेत. ते काय करत आहेत, त्यांचे त्यांनाच कळत नाही”, असे ट्रम्प म्हणाले होते.