Israel Ready for Talks with Lebanon: इस्रायल व लेबनॉन या एकमेकांच्या शेजारी असलेल्या देशांमध्ये मागील काही दशकांपासून वाद आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. इस्रायलने बुधवारी (८ फेब्रुवारी) लेबनॉनची राजधानी बैरुतवर १०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. त्यात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अमेरिका व इराणने शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला. त्यामुळे इराणने अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय इराणने घेतला. इस्रायलच्या हल्ल्यामुळे अमेरिका व इराणमधील शस्त्रसंधी करार धोक्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता लेबनॉनबरोबर चर्चेस तयार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. लेबनॉनने नेतान्याहूंच्या निर्णयाचे स्वागत केले. इस्रायल व लेबनॉनमध्ये सध्या काय सुरू आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
लेबनॉनमध्ये काय घडतंय ?
अमेरिका व इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लेबनॉनमधील हेजबोल्ला या बंडखोर समूहाने इस्रायलवर रॉकेटने हल्ले केले. तेव्हापासून लेबनॉन व इस्रायलमध्ये संघर्ष नव्याने सुरू झाला आहे. हेजबोल्ला संघटनेला इराणचे समर्थन आहे. लेबनॉनमधील हेजबोल्लावरील हल्ले थांबवावेत, अशी मागणी शस्त्रसंधीसाठी इराणने अमेरिकेला केली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत १,८८८ जणांचा मृत्यू, तर सहा हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. २ मार्च पासून इस्रायलने हेजबोल्ला तसेच लेबनॉनच्या लष्करी सुविधांवर हल्ले करणे सुरू केले.
इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये २५० हून अधिक जणांचा मृत्यू
लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये इस्रायलने बुधवारी (८ फेब्रुवारी) १०० हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. त्यात २५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. लेबनॉनवर आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता. हल्ल्यानंतर बैरुतमधील रूग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी झाली होती. “आम्ही मृतदेहांच्या शरीराचे अस्ताव्यस्त पडलेले अवयव गोळा करत होतो”, अशी माहिती मदतकार्यात सहभागी कर्मचाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली. हेजबोल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा सल्लागार व पुतण्या अली युसू हार्षी याचा खात्मा केल्याचे इस्रायलने सांगितले. हेजबोल्ला हा इराणचे समर्थन असलेला लेबनॉनमधील एक बंडखोर समूह आहे. सध्या हेजबोल्ला इस्रायलवर दररोज किमान २० हल्ले करत आहे. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे.
इस्रायल लेबनॉनबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार?
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला लवकरात लवकर लेबनॉनबरोबर चर्चा करण्यास सांगितले आहे. लेबनॉनमधील हेजबोल्ला संघटनेला नि:शस्त्र करणे आणि इस्रायल व लेबनॉनमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे दोन मुद्दे इस्रायल लेबनॉनसमोर मांडणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लेबनॉनने इस्रायलला चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. ते इस्रायलने नाकारले होते. इस्रायल चर्चेसाठी तयार झाला असला तरी हेजबोल्लावरील हल्ले थांबवले जाणार नाहीत, असे इस्रायलने लेबनॉनला स्पष्ट केले आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी बाबत कोणताही करार झालेला नाही.
लेबनॉनची प्रतिक्रिया काय?
लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांनी इस्रायलचे स्वागत केले आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. इस्रायलबरोबर वाटाघाटी करून दोन्ही देशांमध्ये तात्काळ शस्त्रसंधी लागू करणे आवश्यक आहे, असे जोसेफ म्हणाले. लेबनॉनचे अधिकारी इस्रायलबरोबर लवकरात लवकर तात्पुरती शस्त्रसंधी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लेबनॉनमधील हेजबोल्ला बंडखोर समूहाने इस्रायलबरोबर थेट बोलणी करण्याचा प्रस्ताव धुडकावला आहे. इस्रायलबरोबर कोणत्याही वाटाघाटी करू नये, असे हेजबोल्लाचे म्हणणे आहे.
इस्रायल – लेबनॉनमध्ये अमेरिकेची मध्यस्थी
इस्रायल व लेबनॉनमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केली आहे. पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी या चर्चेत सहभागी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व वरिष्ठ दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. लेबनॉनबरोबर चर्चेचा मार्ग खुला करावा व संघर्ष आणखी वाढण्यापासून रोखावा अशी मागणी ट्रम्प व विटकॉफ यांनी नेतान्याहू यांना केली. नेतान्याहूंशी चर्चा केल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर इराणने अमेरिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे, दिलेल्या आश्वासनांचे अमेरिका काय करते, हे जग पाहत आहे”, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची म्हणाले होते. दरम्यान, १० एप्रिल रोजी अमेरिका व इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहे.
इस्रायल व लेबनॉन यांच्यात संघर्ष का सुरू आहे?
इस्रायल व लेबनॉन हे शेजारी देश आहेत. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन आहे. हेजबोल्ला ही लेबनॉनमधील इस्रायलच्या विरोधात कारस्थाने करणारी संघटना आहे. १९८२ मध्ये पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन लेबनॉनच्या दक्षिण भागातून म्हणजेच इस्रायलला खेटून असलेल्या सीमेपलीकडून इस्रायलवर हल्ल्यांचे कट रचते, असा संशय इस्रायलला होता. त्यामुळे इस्रायलने लेबनॉनचा दक्षिणेकडील भाग ताब्यात घेतला. १८ वर्षे लेबनॉनचा दक्षिणेकडील भाग इस्रायलच्या ताब्यात होता. याच कालावधीत इस्रायल विरोधात इराणच्या मदतीने हेजबोल्ला या संघटनेचा जन्म झाला. २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेतली. त्यानंतर हेजबोल्लाने आखातात पहिल्यांदा इस्रायलविरोधात कोणी विजय मिळवल्याचे घोषित केले होते.
२००६ मध्ये ३४ दिवस युद्ध, इस्रायलमध्ये असंतोष
त्यानंतर २००६ मध्ये पुन्हा एकदा इस्रायल व लेबनॉनमधील हेजबोल्ला यांच्यात संघर्ष सुरू झाला. ३४ दिवस युद्ध चालले. सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या तीन इस्रायली सैनिकांची हेजबोल्लाने हत्या केली होती. तर दोन सैनिकांना बंदी बनवले होते. हे युद्धाचे कारण ठरले. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात जवळपास १००० हून अधिक नागरिक मारले गेले. युद्धात इस्रायलचे १५० हून अधिक नागरिक मारले गेले. इस्रायलला मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्यामुळे इस्रायली जनतेत रोष होता. इस्रायलने पूर्व तयारी न करता, घाईत लेबनॉनवर हल्ला केल्याचे एका इस्रायली समितीने सांगितले होते. त्या घटनेनंतर इस्रायलचे आजचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावरही हेजबोल्ला अस्तित्वात असल्याने टीका केली जाते.
२०२३ मध्ये हमासच्या हल्ल्यानंतर संघर्ष चिघळला
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने हेजबोल्लाचे दीर्घकाळ प्रमुख राहिलेल्या हसन नसरल्लाह याची हत्या केली. तसेच हेजबोल्लाचे अनेक टॉप कमांडर मारले. २०२४ मध्ये अमेरिका व फ्रान्सने मध्यस्थी करत दोघांमधील तणाव कमी केला. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल व अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केल्यानंतर हेजबोल्लाने इस्रायलवर रॉकेट डागून हल्ला केला. तेव्हापासून आतापर्यंत इस्रायल व हेजबोल्लामध्ये संघर्ष सुरू आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये हेजबोल्लाचे वास्तव्य आहे. त्यामुळे लेबनॉनच्या दक्षिणेला असलेल्या इस्रायलवर हल्ले करणे हेजबोल्लाला सोपे जाते.
