Israel Lebanon Conflict and Geopolitical Impact Explained: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता इस्रायल व लेबनॉन या दोन शेजारील देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. लेबनॉन मधील लितानी नदीपर्यंतचा भूभाग ताब्यात घेणार असल्याचा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दिला. हेजबोलाकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे हा भूभाग संरक्षित क्षेत्र बनवण्यासाठी ताब्यात घेणार असल्याचे काट्झ यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन हा देश आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान १००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १०० हून अधिक बालकांचा समावेश आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांनी राजधानी बैरूत व उत्तरेकडे स्थलांतर करणे सुरू केले आहे. दरम्यान, सीरियातील पंधरा लाख शरणार्थींनी लेबनॉनमध्ये आश्रय घेतला आहे. लेबनॉनमध्ये नेमकं काय घडतंय, याबाबत लेबनॉनमध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान राजदूत म्हणून कार्यरत असलेले संजीव अरोरा यांनी काय माहिती दिली, ते जाणून घेऊयात.
इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केला?
अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लेबनॉनमधील हेजबोला या बंडखोर समूहाने इस्रायलवर हल्ले चढवले. इस्रायलच्या उत्तरेकडील लेबनॉनच्या सीमेलगत असलेल्या भागात हेजबोलाने हल्ला केला. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात लेबनॉनमध्ये किमान १ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १०० हून अधिक बालकांचा समावेश आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर देखील हल्ला केला आहे. लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्रायलने हल्ले चढवले आहेत. इस्रायलने डागलेल्या क्षेपणास्त्रांनी लेबनॉनच्या शहरी भागातील अनेक मोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. लेबनॉनमधील नाकुरा या शहरात युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन (UNIFIL) चे मुख्यालय आहे. त्यावर इस्रायलने हल्ला केला. तसेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या रोमन काळातील पाऊलखुणा असलेल्या टाईर (Tyre) येथेही हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान, लेबनॉनमध्ये दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तेथील १५० हून अधिक रूग्णालये व रूग्णवाहिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. २०२४ मध्ये झालेल्या संघर्षानंतर लेबनॉनची अवस्था बिकट झाली असताना आता पुन्हा एकदा इस्रायलकडून लेबनॉनला लक्ष्य केले जात आहे.
इस्रायल लेबनॉनमध्ये पुन्हा संघर्ष का सुरू झाला?
इस्रायल व लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात २०२४ मध्ये अमेरिका व फ्रान्सने मध्यस्थी केली होती. या दोन्ही देशांनी इस्रायल व लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी केला होता. लेबनॉनमधील सरकारने हेजबोलाला निशस्त्र करावे, अशी अट इस्रायलने ठेवली होती. परंतु, इस्रायलने हेजबोलाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना व कमांडर्सना संपवले होते. त्यामुळे इस्रायलची अट हेजबोलाला मान्य करणे शक्य नव्हते. हेजबोलाकडे सध्याही शस्त्रास्त्रे आहेत. हेजबोलाने लेबनॉनच्या दक्षिणेकडील इस्रायलच्या सीमावर्ती भागातून माघार घ्यावी, तसेच इस्रायली सैन्यानेही माघार घ्यावी असे ठरले होते. परंतु, त्यानंतरही इस्रायल व हेजबोलामधील वैर सुरूच राहिले.
लेबनॉनमध्ये स्थलांतर का होत आहे?
लेबनॉनमध्ये इतर देशांमधून आलेल्या शरणार्थींची संख्या मोठी आहे. एकट्या सीरियामधून लेबनॉनमध्ये पंधरा लाख शरणार्थी आधीच दाखल झाले आहेत. तसेच पॅलेस्टाइनमधूनही मोठ्या प्रमाणात शरणार्थींनी लेबनॉनमध्ये आश्रय घेतला आहे. इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर बैरूतच्या दिशेने लोक स्थलांतर करत आहेत. त्यामुळे तिथे शरणार्थींची गर्दी झाली असून नागरिकांना लागणाऱ्या मुलभूत गोष्टी देखील मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
लेबनॉनमधील सरकारची भूमिका काय?
इस्रायल व लेबनॉन या दोन देशांमधील नाते कायम शत्रूत्वाचे राहिले आहे. दरम्यान, पहिल्यांदाच लेबनॉनमधील सरकारने इस्रायल सरकारशी थेट संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच लेबनॉनमधील इराणी अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. लेबनॉन मधील सरकार देखील हेजबोला बंडखोरांमुळे त्रस्त आहे. हेजबोलाला निशस्त्र करण्यासाठी लेबनॉन प्रयत्न करत आहे. परंतु, लेबनॉनचे लष्कर तुलनेने कमी आहे. तसेच लेबनॉनला हेजबोलाविरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून सहकार्य मिळालेले नाही. यंदा लेबनॉन मधील सरकारने इस्रायलबाबत सौम्य भूमिका घेतली आहे. दरम्यान, हेजबोला बंडखोरांचा समूह लेबनॉनमधील राजकारणातही सक्रिय आहे. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत हेजबोलाचे १३ सदस्य लेबनॉनच्या संसदेत निवडून गेले होते. हेजबोलाने लेबनॉनच्या संसदेचे सभापती नबीन बेर्री यांच्या अमाल पक्षाबरोबर युती केली होती. दोन्ही पक्षांचे मिळून लेबनॉनच्या संसदेत एकूण ६२ सदस्य आहेत. हेजबोलाचा लेबनॉनमधील समाज व्यवस्थेत प्रभाव आहे. दरम्यान, लेबनॉन हा देश आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मुलभूत वस्तुंची मदत अनेकदा पुरवण्यात आली, परंतु, लेबनॉनची अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न झाले नाहीत.
ही परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल ?
इस्रायलने लेबनॉनच्या लितानी नदीपर्यंतचा भूभाग ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई केली तर त्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने आवाज उठवला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, लेबनॉनवर २३ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या फ्रान्सने या प्रकरणात इस्रायलबरोबर वाटाघाटी सुरू केल्या आहेत. फ्रान्सचे लेबनॉनबरोबर विशेष संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी भारतानेही पुढाकार घ्यायला हवा. लेबनॉनमधील UNIFIL मध्ये भारताचे सध्या ६४२ लष्करी जवान सेवा देत आहेत. युनायटेड नेशन्सने या प्रकरणात तातडीने सत्र बोलावून इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले पाहिजे.
