इस्रायलने भारताला खोलवर हल्ला करण्याची विशेष क्षमता राखणारी गोल्डन होरायझन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे देण्याची तयारी दर्शविली आहे. हवेतून जमिनीवर (एएलबीएम) मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रांच्या करारास मूर्त स्वरूप प्राप्त झाल्यास शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या धोकादायक क्षेत्राबाहेर राहून खोलवर हल्ले चढविण्याच्या भारताच्या क्षमतेत विलक्षण बदल घडू शकतो.

पारंपरिक क्षेपणास्त्रापेक्षा वेगळे?

संरक्षण भागीदारी अधिक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून इस्रायलकडून गोल्डन होरायझनचा प्रस्ताव आल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात लेझर शस्त्रे, ॲंटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण, मानवरहित प्रणाली व लांब पल्ल्याची स्टँड-ऑफ क्षेपणास्त्रे यासंदर्भात सहकार्य करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. गोल्डन होरायझनचे तंत्रज्ञान इस्रायलच्या सिल्व्हर स्पॅरो क्षेपणास्त्रावर आधारित असल्याचे मानले जाते. त्याची रचना सुखोई – ३० एमकेआय विमानातून प्रक्षेपित करण्यास अनुकूल मानली जाते. इस्रायल भारताला एअर लोरा आणि रॅम्पेजसारखी रणनीतीक क्षेपणास्त्रे पुरवतो. त्यांचा अनुक्रमे ४०० ते २५० किलोमीटर मारक पल्ला आहे. ही क्षेपणास्त्रे दारूगोळा डेपो आणि रडार प्रणाली नष्ट करण्यात प्रभावी आहेत. परंतु, गोल्डन होरायझन पूर्णत: वेगळ्या पद्धतीने काम करते. त्याची रचना जमिनीत खोलवर निर्मिलेल्या आणि मजबूत संरचना नष्ट करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. जमिनीतील ‘कमांड बंकर्स’ अथवा संरक्षित आण्विक सुविधा हवेतून जमिनीवर मारा करणारी पारंपरिक क्षेपणास्त्रे सहजपणे नष्ट करू शकत नाहीत. ते काम गोल्डन होरायझन करू शकते. म्हणजे त्याचे लक्ष्य क्षेत्र पूर्णत: वेगळे आहे.

वेग, क्षमता, प्रभाव

लढाऊ विमानातून डागल्यानंतर होरायझन क्षेपणास्त्र बॅलिस्टिक मार्गाचा अवलंब करते. अवकाशातून लक्ष्याकडे झेपावण्याच्या टप्प्यात ते हायपरसोनिक वेगात असते. यातून निर्माण होणारी गतिज ऊर्जा अंतिम चरणात प्रवेश क्षमता वाढवते. हा वेग भूमिगत लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. कारण महत्त्वाच्या लष्करी केंद्रांना जाड कॉक्रिट थर, भूमिगत व नैसगिक संरक्षण असते. अशा लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी केवळ अचूकताच नव्हे तर, अचूक मार्गदर्शनासह तीव्र प्रभाव ऊर्जा गरजेची असते. गोल्डन होरायझनची रचना त्या विशिष्ट समस्येला लक्षात घेऊन केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच्या क्षमतेविषयी अधिकृत तपशील उघड झालेला नसला तरी त्याचा पल्ला सुमारे एक हजार किलोमीटर असल्याचा अंदाज आहे. रॅम्पेज आणि एअर लोरा क्षेपणास्त्र युद्धभूमीवरील शत्रूच्या मालमत्ता नष्ट करण्याचे काम करतात. तर गोल्डन होरायझन हे दुर्मिळ पण परिणामकारक मोहिमांसाठी रचनाबद्ध केलेले आहे.

एएलबीएमचे फायदे

लढाऊ विमानातून अर्थात हवेतून डागले जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे (एएलबीएम) अनेक फायदे आहेत. या क्षेपणास्त्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वेग आणि मार्गक्रमण हवाई प्रक्षेपण व्यवस्थेच्या लवचिकतेसह एकत्रित केले जाते. यामुळे जमिनीवरून सोडल्या जाणाऱ्या व्यवस्थेपेक्षा हवेतून सोडल्या जाणाऱ्या व्यवस्थेतून सोडल्यामुळे जलद तैनाती आणि लांब पल्ल्याची क्षमता प्राप्त होते. प्रचंड वेग, शत्रूची महत्त्वाची केंद्रे भेदण्याची क्षमता आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते तैनात केले जाऊ शकते. विविध उंची आणि क्षेणीवरून सोडले जाऊ शकते. लढाऊ विमान सुरक्षित अंतरावरून क्षेपणास्त्र डागू शकते. शत्रूच्या संरक्षण दलांकडून विमानाला लक्ष्य होण्याचा धोका कमी होतो. प्रचंड वेगामुळे शत्रूच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीला ते चकवा देऊ शकते. शत्रूला हल्ल्याचा अंदाज घेणे आणि त्यांचा प्रतिकार करणे कठीण होते.

जागतिक स्थिती

हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची क्षमता जगातील काही मोजक्याच हवाई दलांकडे आहे. शीतयुद्धात अमेरिकेने बी – ५२ बॉम्बफेकी विमानांसाठी ‘जीएएम-८७ स्कायबोल्ट’चा प्रयोग केला होता. पुढे योजना रद्द झाली, पण एएलबीएमची ती सुरुवातीची संकल्पना होती. रशियाने ‘केएच-४७एम२ किन्झल’ विकसित केले आहे, जे मिग ३१ लढाऊ विमानातून सोडल्यानंतर त्याच्या बॅलिस्टिक उड्डाण मार्गामुळे हवेतून प्रक्षेपित होणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मानले जाते. चीन ‘डीएफ – २१’ आणि ‘डीएफ – १७’ अशी दोन नवीन एएलबीएम विकसित करीत आहे, ज्यापैकी एक अण्वस्त्र वाहून नेऊ शकते, असे सांगितले जाते. ‘डीएफ – २१ डी’ हे या चिनी एएलबीएम क्षेपणास्त्राचा दीड हजार किलोमीटर मारक पल्ला आहे.

भारतासाठी महत्त्वाचे कसे?

शत्रूवर दूरवरून हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय हवाई दलाकडून शस्त्रास्त्रांचा विस्तार आहे. शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली, युद्धनौका व लढाऊ विमानांच्या मारक पल्ल्याच्या बाहेर राहून धोके कमी करता येतात. यासाठी सामरिक युद्धभूमीवरील शस्त्रास्त्रांपासून ते लांब पल्ल्याच्या प्रणालीपर्यंतचे पर्याय शोधले जात आहेत. याच दरम्यान हा प्रस्ताव आला. भारताला चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर ते महत्त्वाचे आहे. चीन उत्तरेकडील आघाडीवर क्षमता वाढवत आहे. दुसरीकडे पाकिस्तानही चिनी प्रणालीच्या आधारे हवाई संरक्षण क्षमता विस्तारत आहे. या स्थितीत दूरवरून, दृश्य टप्प्याच्या पलिकडे (Beyond Visual Range) हल्ल्याची क्षमता आवश्यक ठरते. भारत स्वदेशी एएलबीएम विकसित करेल की नाही यावर देखील चर्चा होत असली तरी हवेतून डागता येणारे ब्रम्होस, संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे हायपरसोनिक संशोधन, अग्नी-पी यावर काम प्रगतीपथावर आहे. संपूर्ण स्वदेशी विकास आणि प्रमाणीकरण या प्रक्रियेला साधारणत दशकभराचा कालावधी लागतो. त्यामुळे भविष्यात स्वदेशी एएलबीएम क्षेपणास्त्र तयार केले जाईल, तोवर गोल्डन होरायझनचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो.