इराण-अमेरिका-इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे इराणची प्राचीन संस्कृती हा चर्चेचा विषय ठरली. कालपरत्वे जगातील प्राचीन संस्कृतींपैकी मेसोपोटेमिया किंवा इजिप्तसारख्या संस्कृतींची मूळ ओळख नष्ट झाली किंवा परिवर्तीत झाली. मात्र अनेक परकीय आक्रमणे होऊनही इराणने आपला एक वेगळा आणि अखंड सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेणे महत्त्वाचे ठरावे.
अश्मयुगीन इराण

इराणचा इतिहास हा अश्मयुगापासून सुरू होतो. या भागात सुमारे दहा लाख वर्षांपूर्वीपासून आदिमानव अस्तित्त्वात असल्याचे पुरावे सापडतात. झाग्रोस पर्वतरांगा आणि मध्य इराणमधील ‘बिसितुन गुहा’ (Bisotun/Bisitun) आणि ‘वारवासी’ (Warwasi) यांसारख्या ठिकाणी निअँडरथल मानवांनी वापरलेली दगडी हत्यारे सापडली आहेत. इसवी सन पूर्व १०,००० च्या सुमारास, जगातील पहिल्या काही कृषी समुदायांचा उगम येथे झाला. Encyclopaedia Iranica मध्ये ‘गंज दारेह’ (Ganj Dareh) येथे शेळ्यांच्या पालनाचे (domestication) जुने पुरावे मिळतात,असे म्हटले आहे. अलीकडच्या जनुकीय व पुरातत्त्वीय संशोधंनातूनही हे सिद्धही झालं आहे.

‘चोघा गोलान’ (Chogha Golan-9800 BP) येथे सुरुवातीच्या काळातील गव्हाच्या शेतीचे (emmer wheat farming) अवशेष आढळतात. हा इराणमधील आणि पूर्व फर्टाइल क्रेसेंटमधील आदिम शेतीचा महत्त्वाचा पुरावा आहे. नंतरच्या कालखंडात इसवी सन पूर्व ३००० मध्ये आग्नेय इराणमध्ये ‘जिरोफ्ट संस्कृती’ (Jiroft/Halil Rud) सारख्या प्रगत संस्कृती अस्तित्वात होत्या. या संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण ‘क्लोराईट’च्या भांड्यांचे अवशेषही उत्खननात सापडले आहेत.

इराण मधील राजसत्तेची पायाभरणी

इसवी सन पूर्व ३००० नंतर इराणमध्ये राजसत्तेची पायाभरणी केली गेली. इलाम हे दक्षिण-पश्चिम इराणमधील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या प्रशासन व्यवस्थेपैकी एक होते. सुसा हे त्यांचं प्रमुख केंद्र होतं. त्याशिवाय Anshan, Awan, Simash, Susa अशी विविध केंद्रेही महत्त्वाची होती. त्यांचे मेसोपोटेमियाशी जवळचे संबंध होते तसेच इलाम आणि मेसोपोटेमियात संघर्षही होत होता. इलामकडून हम्मुराबीची प्रसिद्ध ‘कायदा संहिता’ (Law Code) विजयाची निशाणी म्हणून सुसा येथे आणण्यात आली होती. हम्मुराबीची ‘कायदा संहिता’ (Law Code) इलामी राजा Shutruk-Nahhunte याने लुटीच्या मालाप्रमाणे Sippar किंवा बाबिलोनियन प्रदेशातून सुसाला आणली असावी, असे अभ्यासक मानतात. पण हे हम्मुराबीच्या काळात नाही, तर त्याच्या सुमारे ६०० वर्षांनी घडले होते.

मिडीयन साम्राज्य (इ.स.पू ७२८-५५०)

मिडीयन राज्याचा उदय इ.स.पू. ८व्या-७व्या शतकात झाला. परंपरेनुसार Deioces याने मिडीयन जमातींना एकत्र करून राज्याची पायाभरणी केली, तर Cyaxares याने त्या राज्याला लष्करी बळ देऊन मोठ्या सामर्थ्यशाली सत्तेत रूपांतरित केले. Medes हा इराणातील विशाल प्रदेशावर प्रभावी राजसत्ता उभारणारा पहिला प्रमुख इराणी लोकसमूह मानला जातो.

अकेमेनिड साम्राज्य (इ.स.पू. ५५०–३३०)

अकेमेनिड साम्राज्याची स्थापना सायरस द ग्रेट याने इ.स.पू. ५५० मध्ये केली. हे त्या काळातील जगातील सर्वात विशाल, संघटित आणि प्रभावी बहुराष्ट्रीय साम्राज्यांपैकी एक होते. सायरसने मिडीयन सत्तेला पराभूत करून इराणमध्ये एका नव्या साम्राज्ययुगाची सुरुवात केली.

व्यवहार्य आणि समन्वयवादी राज्यपद्धती

या साम्राज्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्यवहार्य आणि समन्वयवादी राज्यपद्धती. जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांवर सायरसने आपली भाषा, धर्म किंवा संस्कृती सक्तीने लादली नाही. उलट, अनेक ठिकाणी स्थानिक देवालये, परंपरा आणि प्रशासकीय रचना कायम ठेवून त्याने आपल्या सत्तेला स्थैर्य दिले. बेबिलोन (Babylon) जिंकल्यानंतर तयार झालेल्या Cyrus Cylinder मध्ये त्याने देवालयांच्या पुनर्स्थापनेचा आणि काही विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा उल्लेख केला आहे.

Cyrus Cylinder ला अनेकदा जगातील पहिली मानवाधिकार सनद असे म्हटले जाते; परंतु आधुनिक इतिहासकारांच्या मते हा दावा पूर्णपणे अचूक नाही. हा शिलालेख प्रामुख्याने सायरसच्या विजयाचे आणि त्याच्या राजकीय वैधतेचे समर्थन करणारा आहे. त्यामुळे त्याला आधुनिक अर्थाने मानवाधिकारांची सनद म्हणणे वादग्रस्त मानले जाते.

सायरस आणि ज्यू

सायरसचे नाव ज्यू निर्वासितांच्या पुनरागमनाशीही जोडले जाते. बायबलमधील वर्णनांनुसार, त्याने Babylon मधील ज्यूंना परत आपल्या भूमीत जाण्याची आणि मंदिर पुनर्बांधणीची मुभा दिली. मात्र Cyrus Cylinder मध्ये ज्यूंचा थेट उल्लेख आढळत नाही.

सॅट्रपीची सुरुवात

अकेमेनिड साम्राज्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रशासकीय विभागणी. एवढे विशाल साम्राज्य चालवण्यासाठी राज्याचे विविध प्रांतांत विभाजन करण्यात आले. या प्रांतांना पुढे सॅट्रपी (Satrapy) असे म्हटले गेले. या व्यवस्थेची सुरुवात सायरसच्या काळात झालेली दिसते; परंतु तिला अधिक सुसंघटित आणि स्थिर स्वरूप दारयवहुश प्रथम (Darius I) याने दिले.

प्राचीन जगातील महान साम्राज्य

थोडक्यात, अकेमेनिड साम्राज्य हे केवळ लष्करी विजयांवर उभे राहिलेले राज्य नव्हते; तर विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि प्रदेश यांना एका व्यापक राजकीय चौकटीत एकत्र बांधणारे प्राचीन जगातील एक महान साम्राज्य होते.

ग्रीक प्रभाव आणि पार्थियन काळ

सेल्यूसिड साम्राज्य (हेलेनिस्टिक काळ):

अलेक्झांडरच्या विजयानंतर इराणमध्ये ग्रीक प्रभाव वाढला. सेल्यूसिड सत्तेखाली शहरे, नाणी, कला, वास्तुकला आणि राजकीय संस्कृती यांवर हेलेनिस्टिक छाप पडली. तरीही स्थानिक इराणी परंपरा पूर्णपणे नष्ट झाल्या नाहीत; उलट पुढील काळात त्यांचे पुनरुज्जीवन झाले.

पार्थियन साम्राज्य:

सेल्यूसिड सत्ता कमकुवत झाल्यावर Arsacid किंवा पार्थियन सत्तेचा उदय झाला. हे अकेमेनिडनंतरचे पहिले मोठे इराणी साम्राज्य मानले जाते. पार्थियन हे रोमन साम्राज्याचे बलाढ्य प्रतिस्पर्धी होते आणि त्यांनी Carrhae सारख्या लढायांत रोमनांचा मोठा पराभव केला. तसेच पूर्व-पश्चिम व्यापारमार्गांतील मध्यवर्ती स्थानामुळे त्यांना मोठी आर्थिक समृद्धी लाभली.

इस्लामिक संक्रमण आणि ‘पर्शियनायझेशन’

अरब विजयानंतर इराणमध्ये इस्लामचा प्रसार झाला; परंतु इराणची भाषा, सांस्कृतिक स्मृती आणि प्रशासकीय परंपरा नष्ट झाल्या नाहीत. उलट, प्रारंभीच्या अब्बासी काळात पर्शियन सांस्कृतिक पुनरुज्जीवनाला सुरुवात झाली. अब्बासी राज्ययंत्रणेत पर्शियन अधिकारी, सचिव आणि विद्वान यांचा मोठा वाटा होता आणि ससानी परंपरेचा प्रभाव प्रशासन व दरबारी संस्कृतीत जाणवतो. अल्-ख्वारिझमी आणि इब्न सिना यांसारख्या विद्वानांनी गणित, वैद्यक आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सेल्जुक साम्राज्य: तुर्की सत्ताधीश, पर्शियन राजकीय संस्कृती

सेल्जुक हे मूळचे तुर्की सत्ताधीश होते; परंतु त्यांनी पर्शियन प्रशासकीय परंपरा, दरबारी संस्कृती आणि साहित्यभाषेला मोठ्या प्रमाणात स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या राज्याला Persianate स्वरूप प्राप्त झाले. याच व्यापक बौद्धिक वातावरणात ओमर खय्यामसारखे कवी, गणितज्ञ आणि खगोलतज्ज्ञ उदयास आले. या काळात व्यापारमार्ग, शहरी जीवन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना चालना मिळाली.

मंगोल आक्रमण: प्रचंड विध्वंसाचा काळ

१३व्या शतकातील मंगोल आक्रमणांनी इराणमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली, लोकसंख्येची मोठी हानी झाली आणि सिंचन व कृषीव्यवस्था गंभीरपणे बाधित झाली. काही प्रदेशांना सावरण्यासाठी दीर्घकाळ जावा लागला. त्यामुळे मंगोल आक्रमण हा इराणच्या मध्ययुगीन इतिहासातील सर्वात विध्वंसक टप्प्यांपैकी एक मानला जातो.

इल्खानेट: विनाशातून पुनर्रचना

मंगोलांनी सुरुवातीला मोठा विध्वंस केला; परंतु Ilkhanid काळात त्यांनी इराणमध्ये स्थिर राज्य उभारले. कालांतराने मंगोल सत्ताधीशांनी इस्लाम स्वीकारला आणि पर्शियन प्रशासकीय व सांस्कृतिक परंपरा आत्मसात केल्या. या काळात पर्शियन, मंगोल आणि चिनी कलाप्रवाहांच्या संमिलनातून चित्रकला, हस्तलिखित अलंकरण, मृत्तिका-कला आणि वास्तुकलेत नवे प्रवाह दिसू लागले.

इराणची राजकीय रचना बदलली

इल्खानी काळानंतर सफवीदांनी इराणला शिया धार्मिक ओळख दिली आणि आधुनिक इराणी राज्याची पायाभरणी केली. पुढे कजार आणि पहलवी काळात परकीय हस्तक्षेप, आधुनिकीकरण आणि राष्ट्रवाद यांमुळे इराणची राजकीय रचना बदलली. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर इराण इस्लामी गणराज्य झाले; तरीही पर्शियन भाषा, ऐतिहासिक स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य कायम राहिले. त्यामुळे इराणची ओळख ही प्राचीन वारसा, इस्लामी परंपरा आणि आधुनिक राष्ट्रवाद यांच्या संगमातून घडलेली आहे.

इराण जिंकणारे अनेक आले, पण प्राचीन इराणी संस्कृतीला पूर्णपणे पुसून टाकणे कोणालाच जमले नाही; एकुणातच इराणी संस्कृतीची ताकद तिच्या टिकून राहण्यात नव्हे, तर प्रत्येक नव्या काळाला काळानुरूप गोष्टी नव्या रूपात आत्मसात करण्यात आहे.