गेल्या आठवड्यात दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, भारतीय वैमानिकाने दाखवलेल्या धाडसामुळे हा कट उधळला गेला आणि विमानातील सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली. अपहरणकर्त्याचा डाव यशस्वी झाला असता, तर इस्रायलने संबंधित विमान हवेतच पाडण्याची तयारी केली होती, असा दावा सीबीएस न्यूजच्या वृत्तातून करण्यात आला, त्याविषयी…
विमानाच्या कॉकपिटमध्ये नेमके काय घडले?
३० सप्टेंबर प्लायदुबई कंपनीच्या विमानाने दुबई येथून तेल अवीवकडे जाणाऱ्यासाठी उड्डाण केले होते. सदरील विमान हे इस्रायलच्या हवाई हद्दीजवळ पोहोचत असतानाच कॉकपिटमधील दोन वैमानिकांमध्ये झटापट सुरू झाली. त्यामुळे अवघ्या दोन मिनिटातच हे विमान तब्बल १७००० फूट उंचीवरून अचानक खाली आले. त्याचवेळी विमानात हायजॅकचा अलर्ट जारी झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर ओमानच्या त्यांच्याच सहवैमानिकाने चाकूहल्ला केल्याने हा प्रकार घडला होता. यादरम्यान विमान हजारो फूट उंचीवरून खाली येत असताना इस्रायली अधिकाऱ्यांनी कॉकपिटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी ही परिस्थिती संभाव्य विमान अपहरण म्हणून हाताळण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती या घडामोडींशी थेट संबंधित असलेल्या दोन इस्रायली सूत्रांनी सीबीएस न्यूजला दिली.
इस्रायली फायटर जेट्स तातडीने हवेत झेपावली
इस्रायली सूत्रांच्या मते, प्रवासी विमानाचा वापर करून ९/११ सारखा हल्ला होण्याची शक्यता असल्यास त्याचा सामना करण्यासाठी इस्रायलकडे आधीपासूनच यंत्रणा अस्तित्वात आहे. विमानाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच इस्रायलने सुरक्षेचा उपाय म्हणून आपली सर्व हवाई हद्द बंद केली होती. तसेच त्यांच्या लढाऊ विमानांनीही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी हवेत झेपावली होती. मात्र, प्लायदुबईच्या विमानाने अचानक आपला मार्ग बदलून सौदी अरेबियाच्या दिशेने वळण घेतले. त्या विमानाची दिशा बदलल्याचे स्पष्ट होताच इस्रायलने आकाशात पाठवलेली आपली लढाऊ विमाने मागे बोलावली. यादरम्यान भारतीय वैमानिकाने दाखवलेल्या धाडसामुळे विमानाच्या अपहरणाचा कट उधळला गेला होता. त्यांनी आपल्या सहवैमानिकाचा प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजाही उघडला. त्यामुळे विमानातील इस्रायली प्रवासी आणि फ्लायदुबईचे कर्मचारी कॉकपिटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी हमाम अल-हमामी याला ताब्यात घेतले. त्यानंतर प्लायदुबईच्या प्रवासी विमानानेही सौदी अरेबियात सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
…तर इस्रायलने घेतला असता कठोर निर्णय?
सीबीएस न्यूजने इस्रायली सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्लायदुबईच्या विमानाचे अपहरण होऊन ते इस्रायलच्या हद्दीत आले असते, तर इस्रायली फायटर जेट्सने ते रोखण्यासाठी सर्वप्रथम जॉर्डनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला असता. त्यानंतर फायटर जेट्सच्या वैमानिकांनी विमानाच्या कॉकपिटशी थेट नजरभेट साधून परिस्थितीचा अंदाज घेतला असता, तसेच केबिनमध्ये प्रवाशांची हालचाल आणि संघर्षाचे संकेत तपासले असते. त्यानंतर ही माहिती पंतप्रधान नेतान्याहू यांना देण्यात आली असती. इस्रायलच्या स्थापित सुरक्षा नियमांनुसार आणीबाणीच्या टोकाच्या परिस्थितीत अशा प्रवासी विमानाला पाडण्याचा अधिकार केवळ इस्रायलच्या पंतप्रधानांकडे असतो. त्यामुळे पुढील घातपाताची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हे विमान हवेतच पाडण्याचा आदेश दिला असता. एखादे अपहरण केलेले विमान दाट लोकवस्तीच्या किंवा महत्त्वाच्या ठिकाणी आदळण्याचा धोका असल्यास, त्याला रोखण्यासाठी अशा टोकाच्या कारवाईचा विचार केला जाऊ शकतो, असेही इस्रायली सूत्रांनी सीबीएस न्यूजला सांगितले.
सहवैमानिकाने दिली धक्कादायक कबुली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या घटनेबाबत जागतिक माध्यमांना सविस्तर माहिती दिली. प्लायदुबईचे विमान इस्रायलजवळ पोहोचत असतानाच वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर ओमानच्या सहवैमानिकाने चाकूने गंभीर हल्ला केला होता. मात्र, जखमी असूनही त्यांनी सहवैमानिकाला विमानाचा ताबा घेऊ दिला नाही. तो सहवैमानिक प्रवाशांसह संपूर्ण विमान क्रॅश करण्याच्या प्रयत्नात होता; पण मच्छार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे अमेरिकेतील ‘९/११’ सारखी भीषण दुर्घटना टळली, असे नेतान्याहू म्हणाले. सध्या ओमानच्या या सहवैमानिकाची सौदी अरेबियाकडून कसून चौकशी केली जात आहे. या तपासात सहभागी होण्यासाठी इस्रायलनेही आपले प्रतिनिधी पाठवल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, कट्टरतावादी विचारांनी प्रेरित असलेला ओमानचा सहवैमानिक हमाम अल-हमामी याचा हेतू अत्यंत भयानक होता. त्याने तेल अवीवमधील सर्वात व्यस्त असलेल्या ‘बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करण्याचे ठरवले होते. या विमानतळावरून दररोज ६०० विमाने आणि सुमारे १ लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे या विमानतळावरच प्लायदुबईचे विमान क्रॅश करण्याचा आरोपीचा कट होता. याबाबत आरोपीने कबुलीही दिल्याचा दावा इस्रायली यंत्रणांनी केला आहे.
