अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये इस्रायली दूतावासात दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री यहुदी म्युझियमच्या बाहेर ही घटना घडली. इस्रायल दूतावासात एकत्र काम करणाऱ्या एक पुरुष आणि एक महिला अशा दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. यारॉन लिशिन्स्की व सारा लिन मिलग्रीम हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे एक यहुदीविरोधी हत्याकांड आहे. याचा अंत झालाच पाहिजे. अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतावादाला कुठलंही स्थान नाही”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इस्रायलचे राजदूत डैनी डेनन यांनीदेखील या हल्ल्याला यहुदीविरोधी दहशतवाद, असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेला याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली आहे. इस्रायल दूतावासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हे जोडपे एका यहुदी कार्यक्रमात भाग घेणार होते. तेव्हाच त्यांना गोळी मारण्यात आली. त्यावेळी अमेरिकेत इस्रायलचे राजदूत उपस्थित नव्हते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयातूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनीही यहुदीविरोधाचा (यहुदी धर्मातील लोकांबद्दल पूर्वग्रह किंवा द्वेष) उल्लेख केला आहे. दरम्यान, त्यावेळी नेमकं काय घडलं, हा हल्लेखोर कोण आहे आणि हल्ल्यांवरील प्रतिक्रियांमागील संदर्भ काय आहे हे जाणून घेऊ…
हल्ला कोणी केला?
इस्रायल नागरिक लिशिन्स्की हे संशोधन सहायक होते; तर अमेरिकन नागरिक मिलग्रीम ही इस्रायलमध्ये भेटी आणि मोहिमा आयोजित करीत होती. रात्री सव्वानऊच्या सुमारास हे जोडपे संग्रहालयातून बाहेर पडले, तेव्हा संशयिताने चार लोकांच्या एका गटाजवळ जात बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये हे जोडपे मारले गेले. तिथे हल्ला केल्यावर तो हल्लेखोर यहुदी संग्रहालयात गेला आणि त्यादरम्यानच सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेतले. या हल्लेखोराला ताब्यात घेतल्यावर त्याने फ्री, फ्री पॅलेस्टाईन, अशी नारेबाजी सुरू केली. ही माहिती मेट्रोपोलिटन पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांनी दिली.

हल्लेखोर कोण आहे?
हा ३१ वर्षीय हल्लेखोर शिकागोचा रहिवासी असून, एलियास रॉड्रिग्ज असे त्याचे नाव आहे. स्थानिक पोलीस आणि एफबीआय अशा दोघांकडूनही त्याची चौकशी करण्यात आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, तो आधी पोलिसांच्या रडारवर नव्हता किंवा त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.
संदर्भ काय?
“७ ऑक्टोबरच्या हत्याकांडापासून जगभरातील इस्रायल आणि यहुदींविरोधात सुरू असलेल्या संघर्षाचा हा थेट परिणाम आहे”, असे इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन सार यांनी म्हटले आहे. २०२३ मध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० लोक मारले गेले होते. त्यानंतर इस्रायलने लष्करी आक्रमण सुरू केले आणि त्यामध्ये गाझा पट्टीमध्ये जवळपास ५० हजार लोकांचा बळी गेला. त्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश अधिक होता. इस्त्रायलने केलेल्या या कृत्याचा जगभरातून निषेध झाला. त्यामध्ये पाश्चात्त्य देशांचाही समावेश होता. अमेरिकेत महाविद्यालयांमध्ये निदर्शने केली गेली. त्यामध्ये प्रमुख आयव्ही लीगचाही समावेश होता.
ही निदर्शने यहुदीविरोधाशी जोडली जात असल्याने त्यांना रोखण्यासाठी काही वेळा पोलीस तैनात करावे लागतात. दरम्यान, या निदर्शकांचे असे म्हणणे आहे की, घोषणा देऊन ज्यू लोकांच्या धार्मिक ओळखीला लक्ष्य करणे हे केवळ काही वैयक्तिक प्रकरणांमध्येच घडते; विद्यार्थी चळवळींच्या घोषित उद्दिष्टांचा भाग म्हणून नाही. एकंदर विद्यापीठ स्तरावर इस्रायलसोबतचा निधी आणि सहकार्य कमी करणे, इस्रायलमधील ब्रँडवर बहिष्कार टाकणे आणि इस्रायलवर लष्करी कारवाया थांबवण्यासाठी दबाव निर्माण करणे यावर त्यांचे लक्ष आहे. अमेरिका जरी ऐतिहासिकदृष्ट्या इस्रायलचा कट्टर मित्र असला तरी २०२३ पूर्वी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनी इस्रायली राज्याच्या पॅलेस्टिनींबाबतच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. विद्यार्थ्यांनी असाही युक्तिवाद केला की, निदर्शने संपविण्यासाठी यहुदीविरोधी भावनांचा वापर केला जात होता. ट्रम्प प्रशासनाच्या काळात कठोर भूमिका घेतल्या गेल्या आणि पॅलेस्टिनीसमर्थक निदर्शनांमध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांना यहुदीविरोधकाचा हवाला देऊन हद्दपार करण्यात आले. अलीकडेच गाझामधील इस्रायली नाकेबंदी पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण- या प्रदेशात अन्न जवळपास संपल्यात जमा आहे. अगदी लहान मुलांसाठीही अन्न शिल्लक नाही. फ्रान्स, यूके व कॅनडासारख्या पाश्चात्त्य देशांकडूनही आता इस्रायलचा तीव्र निषेध केला जाऊ लागला आहे. याबाबतचे एक संयुक्त निवेदन १९ मे रोजी जारी करण्यात आले होते.
या निवेदनात असे म्हटले होते, “गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवायांच्या विस्ताराला तीव्र विरोध केला जातो आणि गाझामध्ये सध्या लोकांची परिस्थिती गंभीर आहे.” पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही द्विराज्य उपाय साध्य करण्यासाठी योगदान म्हणून पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्यास वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी इतरांसोबत काम करण्यासही तयार आहोत.” बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी म्हटले की, “यहुदीविरोधी मतभेद हा एक वाईट प्रकार आहे. तो आपल्याला जिथे दिसेल, तिथे तो नष्ट केला पाहिजे. नेहमीप्रमाणे मी ज्यू समुदायासोबत कायम उभा आहे.” फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही नेतान्याहू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही या हल्ल्याला यहुदीविरोधी हल्ला, असे म्हटले आहे.