चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या एका थंड विवरात (गोलाकार खड्ड्यात) बर्फ असल्याचा पुरावा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या हाती लागला आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथे असलेल्या एका प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी हा शोध लावला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एका विवरात पृष्ठभागाखाली हा बर्फाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचा दावा इस्रोने केला आहे. चांद्रयान – २ च्या ऑर्बिटरवर लावलेल्या उपकरणांच्या माध्यमातून ही माहिती इस्रोला मिळाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर असलेल्या व अब्जावधी वर्षांपासून सूर्यप्रकाशापासून दूर असलेल्या एका विवरात इस्रोला बर्फ असल्याचा भक्कम पुरावा मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्र मोहिम राबवल्या जाऊ शकतात. चंद्रावरील पाण्याचा वापर विविध कारणांसाठी करता येऊ शकतो. चंद्रावर इस्रोला बर्फाचा साठा कुठे व कसा आढळून आला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

चंद्रावर पाण्याचे रेणू आणि हायड्रॉक्सील

इस्रोने चांद्रयान – २ वर एक रडार उपकरण बसवले होते. त्याच उपकरणाच्या माध्यमातून चंद्रावर बर्फ असल्याची माहिती मिळाली आहे. DFSAR – ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपेर्चर रडार असे या उपकरणाचे नाव असून ते एक मायक्रोवेव इमेजिंग उपकरण आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली काय आहे? याचा अचूकपणे अंदाज घेण्याची क्षमता या उपकरणात आहे. चंद्राच्या ध्रुवीय भागांवर असलेल्या पृष्ठभागाखाली बर्फाचे साठे असू शकतात, या शक्यतेला इस्रोच्या शास्त्रज्ञांमुळे बळकटी मिळाली आहे. चांद्रयान – २ ने पाठवलेल्या माहितीचा यापूर्वीही अभ्यास करण्यात आला होता. त्यात चंद्रावर पाण्याचे रेणू (वॉटर मॉलेक्युल्स) आणि हायड्रॉक्सिल (एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन अणू असणारे) आढळून आले होते.

इस्रोने चांद्रयान – २ वर लावलेले डीएफएसएआर उपकरण चंद्राच्या ध्रुवीय भागांवरील पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी लावण्यात आले आहे. हे उपकरण चंद्राचा पृष्ठभाग व पृष्ठभागाखालील गुणधर्मांची माहिती देते. हे उपकरण चांद्रयान – २ वर पहिल्यांदाच लावण्यात आले आहे. त्याला ‘पोलारीमेट्रिक सिंथेटिक अपेर्चर रडार’ असेही म्हटले जाते.

चंद्राच्या पृष्ठभागाखाली बर्फ सापडण्याचे कारण काय?

चंद्राच्या पृष्ठभागावरील ज्या विवरात बर्फ आढळून आला ते विवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे. ते अशा भागात स्थित आहे, जिथे थेट सूर्यप्रकाश कधीच पडत नाही. त्याचे कारण म्हणजे चंद्र त्याच्या अक्षावर थोडासा एका बाजूला कललेला आहे. त्यामुळे या भागातील अनेक विवर हे अब्जावधी वर्षांपासून अंधारात आहेत. याच भागात विवराच्या आत काही विवर आहेत. असे विवर फक्त सूर्य प्रकाशापासूनच नव्हे, तर अंतराळातून येणाऱ्या रेडिएशनपासूनही सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे या विवरांमध्ये तापमान हे २५ केल्विन किंवा मायनस २४८ अंश असते. शास्त्रज्ञांच्या मते, इतके थंड वातावरण असल्याने धूमकेतू, लघुग्रह आणि सूर्यापासून येणारे वारे यांच्यामार्फत येणारे पाण्याचे रेणू या विवरांमध्ये लाखो किंवा अब्जावधी वर्षांपासून जमा होत आले आहेत. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाखाली बर्फ आढळला आहे.

चंद्रावरील बर्फाचा वापर कसा होऊ शकतो?

शास्त्रज्ञांच्या मते, या अभ्यासाचा आगामी चांद्र मोहिमांमध्ये फायदा होऊ शकतो. मानवाला चंद्रावर अधिक काळ वास्तव्य करता यावे, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या अभ्यासाचा फायदा होणार आहे. चंद्रावर सापडलेल्या बर्फाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी, ऑक्सिजनसाठी आणि रॉकेटमध्ये इंधन म्हणून करता येतो. चंद्रावर मानवाला दीर्घकाळ वास्तव्य करता यावे, तसेच चंद्रावर राहून अंतराळात आणखी पुढे जाऊन संशोधन करता यावे, यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा प्रयत्नशील आहे. नासाने नुकतीच आर्टेमिस मोहिम यशस्वी केली आहे. दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याची शक्यता असल्याने भविष्यात याच भागात अंतराळवीरांना उतरवले जाईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

सूर्यप्रकाशामुळे चंद्रावर ऊर्जा निर्मितीचीही शक्यता ?

चंद्राच्या याच भागात असलेल्या काही उंच भागांवर सतत सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे या ठिकाणी ऊर्जा निर्मितीही करता येऊ शकते. चांद्रयान – २ ने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा शोधल्याने यापुढे होणाऱ्या चांद्र मोहीमांना याचा फायदा होऊ शकतो. चांद्रयान – ३ च्या यशानंतर इस्रोला आता चांद्रयान – ४ मोहिमेच वेध लागले आहेत. या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या ध्रुवीय भागांचा अधिक बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. सरकारने २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीरांना पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चांद्रयान – २ मोहिमेद्वारे इस्रोने केलेल्या संशोधनामुळे जागतिक पटलावर भारताचे महत्व वाढणार आहे. इस्रोने केलेल्या संशोधनामुळे इतर देशही भारताची अंतराळ मोहिमांमध्ये मदत घेऊ शकतात. आगामी चांद्रमोहिमांसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे सध्या मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. चंद्रावर सापडलेल्या बर्फाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी, ऑक्सिजनसाठी आणि रॉकेटमध्ये इंधन म्हणून करता येतो. त्यामुळे चंद्रावर अंतराळवीरांना दीर्घकाळ वास्तव्य करता येऊ शकते.