इटलीत पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या भारतीय कामगारांना कामाच्या ठिकाणी शोषणाचा सामना करावा लागला. तरीही अन्यायासमोर हार न मानता त्यांनी एकत्रितपणे कायदेशीर लढा दिला. मिलान शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता या प्रकरणातील सुमारे ३०० भारतीयांना तब्बल ३३५ कोटी रुपयांची विक्रमी नुकसानभरपाई मिळणार आहे. युरोपमधील कामगारांच्या शोषण प्रकरणातील ही सर्वात मोठी भरपाई मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नक्की आहे तरी काय? भारतीय कामगारांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले? तसेच त्यांना न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर लढा का द्यावा लागला? जाणून घेऊया…
मिलान शहरात कामाच्या ठिकाणी शोषणाला सामोरे जाणाऱ्या ६० हून अधिक परदेशी कामगारांनी बुधवारी नुकसानभरपाईच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यातील बहुतांश कामगार हे भारतीय असल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण ‘कॅडेल कन्स्ट्रक्शन’ या अमेरिकन बांधकाम कंपनीसाठी काम करत होते. मिलानमधील अमेरिकेच्या नव्या दूतावासाची इमारत बांधण्याचे काम त्यांच्याकडे होते. या प्रकरणात सुमारे ३१ दशलक्ष युरो म्हणजेच तब्बल ३३५ कोटी नुकसानभरपाई देण्याबाबत गेल्या महिन्यात करार झाला होता. त्यानुसार मंगळवारपासून कामगारांना भरपाई मिळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास ११५ कामगारांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. ही प्रक्रिया पुढील आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले जाते.
भारतीय कामगार इटलीत कसे पोहोचले?
इटालियन तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘डायनॅमिक हाऊस’ नावाच्या एका मध्यस्थ भरती संस्थेने अमेरिकेच्या बांधकाम कंपनीसाठी भारतीय कामगारांची भरती केली होती. या प्रकल्पाच्या कामाच्या सर्वाधिक व्यस्त काळात सुमारे ४५० ते ५०० कामगार कार्यरत होते. त्यामध्ये भारतीय कामगारांची संख्या सर्वाधिक होती. २०२५ मध्ये या कंपनीकडे ३१६ भारतीय कामगार काम करत होते. इटलीला जाण्यापूर्वी या कामगारांना तीन वर्षांच्या नोकरीचे आणि तिथे कायदेशीर राहण्याची व्यवस्था केल्याचे आश्वासन देण्यात आले होते. अनेक भारतीय कामगारांनी ही नोकरी मिळवण्यासाठी सुमारे ५,००० युरो (अंदाजे ५ लाख रुपये) दिल्याचे सांगितले.
भारतीय कामगारांची कशी फसवणूक झाली?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या कामगारांना कागदोपत्री अत्यंत कुशल कामगार म्हणून दाखवण्यात आले होते. तसेच व्हिसासाठी केलेल्या अर्जांमध्ये त्यांचे वार्षिक वेतन २४ हजार युरो म्हणजेच सुमारे २५.९ लाख रुपये असल्याचे नमूद होते. मात्र, कामगारांनी प्रत्यक्षात स्वाक्षरी केलेल्या करारात तासाला केवळ १.३१ ते १.९१ युरो (सुमारे १५० ते २१० रुपये) वेतनाचा उल्लेख होता. ‘द वायर’च्या वृत्तानुसार, हा करार इंग्रजी भाषेत असल्याने बहुतांश कामगारांना त्यातील अटी समजून घेता आल्या नाहीत. सरकारी वकिलांकडे जबाब नोंदवलेल्या ३५ कामगारांपैकी दोघांना तर अजिबात वाचताच येत नव्हते. दरम्यान हे कामगार इटलीत पोहोचल्यानंतर त्यांना कॅडेल कन्स्ट्रक्शनच्या इटलीतील कंपनीकडून आणखी एका करारावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. हा करार इटलीच्या कामगार कायद्यांनुसार तयार करण्यात आला होता; पण त्याची प्रत कामगारांना देण्यात आली नव्हती.
इटलीत भारतीय कामगारांचे कसे शोषण झाले?
इटलीमध्ये साधारणत: आठवड्यातील कामाचे तास ४० असतात. तरीदेखील संबंधित कंपनीने या कामगारांकडून दिवसाला १२ आणि आठवड्यातून सहा दिवस काम करून घेतले जात होते. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या कामगारांना तासाला दोन डॉलरपेक्षाही कमी वेतन मिळत होते. राहण्याचा खर्च म्हणून त्यांच्या वेतनातून महिन्याला ५०० युरो (अंदाजे ५४ हजार रुपये) कापले जात होते. तसेच त्यांना जेवणासाठीही दरमहा सुमारे ३०० ते ३७० युरो (अंदाजे ३२,५०० ते ४० हजार रुपये) खर्च करावे लागत होते. कामाच्या अटी मान्य न केल्यास या कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. काही कामगारांनी या अटी मान्य करण्यास नकार दिल्यास त्यांना भारतात परत पाठवून देण्यात आले होते. याबाबत एका कामगाराने तपासकर्त्यांना सांगितले की, माझ्याकडून काही कागदपत्रांवर जबरस्तीने स्वाक्षऱ्या करून घेतल्या होत्या. त्यात नेमके काय लिहिलेले होते हे मला सांगण्यात आले नाही. दुसऱ्या एका कामगाराने आरोप केला की, करारात कंपनीकडून जेवण दिले जाईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही आमच्याकडून रोजच्या दुपारच्या जेवणासाठी ६.५० युरो जबरदस्तीने वसूल केले जात होते.
इटलीतील तपास यंत्रणांचे म्हणणे काय?
इटलीतील सरकारी वकिलांनी या प्रकरणाचे वर्णन कामगारांच्या शोषणाची व्यवस्था असे केले आहे. हे प्रकरण केवळ कमी वेतनापुरते मर्यादित नसून भरमसाठ भरती शुल्क, अतिशय कमी पगार, जास्त कामाचे तास, वेतनातून होणारी कपात, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या आणि स्थलांतरित कामगारांची असुरक्षितता अशा अनेक बाबींशी संबंधित असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. तपासानुसार, नोकरी मिळवण्यासाठी कामगारांनी हजारो युरो खर्च केले होते. त्यामुळे हे पैसे वसूल करण्यासाठी त्यांना नोकरी सोडणेही कठीण झाले होते. भरतीसाठी घेतलेले कर्ज आणि परदेशात नोकरी मिळवण्याच्या आशेने केलेला खर्च यामुळे कामगार शोषण सहन करण्यास भाग पडले. तपास सुरू झाल्यानंतर इटलीतील कॅडेल कंपनीच्या शाखेचा कारभार न्यायालयीन प्रशासनाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आला. या प्रकरणातील फौजदारी तपास अद्याप सुरू आहे. खंडणीसह बेकायदा स्थलांतराला मदत केल्याच्या आरोपांवरून कंपनीचे दोन व्यवस्थापक नजरकैदेत आहेत. दुसरीकडे- अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. तसेच, अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी यंत्रणा इटलीच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
३३५ कोटी रुपयांच्या भरपाईची तडजोड कशी झाली?
सप्टेंबर २०२६ मध्ये कॅडेल कंपनीने कामगारांना ३१ दशलक्ष युरो (सुमारे ३३५ कोटी रुपये) देण्यास सहमती दर्शवली. युरोपमधील कामगार शोषणाच्या प्रकरणातील हा सर्वात मोठा समझोता असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. कामगारांनी समझोत्यावर स्वाक्षरी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित भरपाईची रक्कम त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कामगारांना कॅडेलच्या प्रकल्पाव्यतिरिक्त इटलीमध्ये अन्य ठिकाणी नोकरी करण्याची परवानगीही दिली जात आहे. इटलीची अर्थव्यवस्था स्थलांतरित कामगारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. २०२५ मध्ये इटलीतील सुमारे २६ लाख परदेशी नागरिक रोजगारात होते. हे देशातील एकूण रोजगारित लोकसंख्येच्या १०.७ टक्के आहे. भारत आणि इटली या दोन्ही देशांकडून कायदेशीर स्थलांतर आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भरतीसाठी घेतले जाणारे कर्ज आणि परदेशात होणारे कथित शोषण ही स्थलांतरित कामगारांसाठी मोठी आव्हाने आहेत. रोममधील भारतीय दूतावासानेही नोंदणी नसलेल्या एजंटांपासून, परदेशातील बनावट नोकरीच्या जाहिरातींपासून आणि भरमसाठ भरती शुल्कापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
