पात्रता फेर्‍यांमध्येच निराशा

इटलीच्या संघाने विश्वचषकासाठीच्या युरोपीय पात्रता फेरीत ‘आय’ गटात आठपैकी सहा सामने जिंकले. या गटात नॉर्वेने सर्व सामने जिंकून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे संयुक्तपणे जून-जुलैमध्ये होणार्‍या विश्वचषकात थेट स्थान मिळवले. गेनारो गाटुसो यांच्या मार्गदर्शनाखालील इटली संघ दुसर्‍या स्थानावर राहिल्याने त्यांना ‘प्ले-ऑफ’मध्ये खेळावे लागले. ‘प्ले-ऑफ’च्या उपांत्य लढतीत इटलीने उत्तर आयर्लंड संघाला २-० असे पराभूत केल्याने चाहत्यांच्या आशा उंचावल्या. मात्र, अंतिम लढतीत बोस्नियाविरुद्ध इटलीने निराशा केली. नियमित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर त्यांना ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये १-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे २०१८, २०२२ पाठोपाठ २०२६ मध्येही विश्वचषक अपात्रतेची वेळ त्यांच्यावर ओढवली.

नवख्या संघाविरुद्ध चुका नडल्या?

अमेरिकेने यापूर्वी (१९९४) विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती, त्यावेळी बोस्निया-हर्जेगोव्हिना हा देश नुकताच अस्तित्वात आला होता. यंदाच्या स्पर्धेपूर्वी या देशाने केवळ एकदा (२०१४) विश्वचषकात स्थान मिळवले होते. अशा नवख्या संघाविरुद्ध इटलीने काही अक्षम्य चुका केल्या. निर्णायक सामन्यात इटलीने १५व्या मिनिटाला आघाडी मिळवली. परंतु प्रमुख बचावपटू अलेसांड्रो बास्तोनीकडून चूक झाली आणि त्याला लाल कार्ड मिळाले. यानंतर सामन्याचे चित्र पालटले. इटलीला केवळ बचावावर लक्ष केंद्रित करावे लागले. जवळपास सर्वच खेळाडू आपल्याच कक्षात असल्याने चेंडू मिळवल्यावरही प्रतिआक्रमण करणे त्यांना अवघड गेले. त्यातूनही मिळवलेल्या गोलच्या काही संधी त्यांनी वाया घालवल्या. उत्तरार्धात बोस्नियाने बरोबरी साधल्यानंतर इटली संघ सामना ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये नेण्यासाठीच खेळला. ‘शूटआऊट’मध्ये इटलीचा इतिहास चांगला असला, तरी यावेळी त्यांच्या पदरी निराशा पडली.

इटालियन फुटबॉलची मोठी पीछेहाट

इटलीने २००६ मध्ये फ्रान्सला पराभूत करत विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. आता दोन दशकांनंतरही हाच इटलीचा विश्वचषकाच्या बाद फेरीतील अखेरचा विजय आहे. दरम्यानच्या काळात इटालियन फुटबॉलची मोठी पीछेहाट झाली. दक्षिण आफ्रिका २०१० आणि ब्राझील २०१४ या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये इटलीला बाद फेरीही गाठता आली नव्हती. राष्ट्रीय संघाच्या कामगिरीसह ‘सेरी आ’ लीगमधील खेळाचा स्तरही खालावला. गेल्या २९ वर्षांत केवळ एका इटालियन क्लबने प्रतिष्ठेच्या चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवले आहे. एसी मिलान, इंटर, युव्हेंटस, एएस रोमा यांसारख्या नामांकित क्लबच्या कामगिरीत सातत्य नाही. इटलीचे दोन सर्वोत्तम फुटबॉलपटू (गोलरक्षक डोनारुमा आणि मध्यरक्षक सँन्ड्रो टोनाली) इंग्लंडमधील क्लबसाठी खेळतात. पूर्वी दक्षिण अमेरिकेतील युवा खेळाडू कारकीर्दीच्या सुरुवातीला स्पेनसह इटलीतील फुटबॉल क्लबना पसंती द्यायचे. मात्र, आता तेसुद्धा दुर्मीळ झाले आहे. इंग्लंड, स्पेनमधील आघाडीच्या क्लबना जे खेळाडू नकोसे होतात किंवा जे खेळाडू कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत, अशा खेळाडूंवर इटालियन क्लबना आता समाधान मानावे लागते आहे. तसेच सर्वोत्तम इटालियन प्रशिक्षक कार्लो अँचेलॉटी हे त्यांच्या राष्ट्रीय संघापेक्षा ब्राझीलला मार्गदर्शन करत आहेत.

बाजिओच्या सूचनांकडे दुर्लक्ष

इटली संघ सलग तिसर्‍यांदा विश्वचषकासाठी पात्र न ठरल्यानंतर माजी खेळाडू रोबर्टो बाजिओ यांनी मांडलेली ९०० पानी सुधारणा योजना पुन्हा चर्चेत आली आहे. २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत इटली संघ साखळीतच गारद झाला. त्यानंतर बाजिओ यांची इटालियन फुटबॉलच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. बाजिओ यांनी ‘रिन्यू द फ्युचर’ नावाचा व्यापक आराखडा तयार केला होता. यात १०० प्रशिक्षण केंद्रे उभारणे, आधुनिक सुविधा विकसित करणे, तसेच युवा खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्यांवर भर देणे यांसारख्या उपायांचा समावेश होता. इटालियन फुटबॉल बचावासाठी ओळखले जाते. मात्र, यापासून दूर जात अधिक आक्रमक खेळाचे धोरण त्यांनी समोर ठेवले. देशभर निवड चाचणी आयोजित करून हजारो सामन्यांचे विश्लेषण करण्याची योजना त्यांनी मांडली. मात्र, ती कधीच अमलात आली नाही.

यंदाचे अपयश अधिक बोचणारे का?

इटली संघाचे यंदाचे अपयश त्यांच्यासाठी अधिक बोचणारे ठरते. ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा आता अधिक विस्तारित स्वरूपाची होणार आहे. गतस्पर्धेत ३२ संघाचा सहभाग होता, तर या वेळी एकूण ४८ संघ खेळणार आहेत. असे असूनही चार वेळच्या विश्वविजेत्या इटली संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरता न येणे, ही शोकांतिकाच!

बड्या संघांतील सर्वांत कमकुवत संघ?

ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना, फ्रान्स, स्पेन या बड्या संघांच्या बरोबरीने कधी काळी इटलीचे नाव घेतले जायचे. चार विश्वचषक जिंकणारा इटलीबरोबर केवळ जर्मनीचा संघ आहे. त्यांच्यापेक्षा अधिक पाच विश्वचषक स्पर्धा केवळ ब्राझीलने जिंकल्या आहेत. त्यांच्या बरोबरीने अर्जेंटिना (तीन विश्वचषक), फ्रान्स (दोन विश्वचषक) आणि स्पेन (एक विश्वचषक पण सर्वाधिक चार युरो चषक) या तीन संघांचे नाव घेतले जायचे. पण इटली या बड्या संघांच्या तुलनेत फारच फिका ठरू लागल्याचे त्यांच्या चाहत्यांना आणि फुटबॉल विश्लेषकांना वाटते.