Crowd Psychology in Stampede Situation : ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ पुरी रथयात्रेदरम्यान गुरुवारी लाखो भाविकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या गर्दीत गुदमरल्यामुळे एका भाविकाचा मृत्यू झाला, तर १२० हून अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशाच दुर्घटना घडल्या आहेत. या वारंवार घडणाऱ्या घटनांमध्ये गर्दीचं मानसशास्त्र कसं कारणीभूत ठरतं, जाणून घेऊया सविस्तर.

जगन्नाथ पुरीमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती कशी निर्माण झाली?

जगन्नाथ पुरी येथे मंदिरातील नियमित दर्शनाप्रमाणे भाविक रांगेत पुढे सरकत नाहीत; तर नंदीघोष, तळध्वज आणि दर्पदलन या रथांच्या दोरीला स्पर्श करणे किंवा रथ ओढणे पुण्याचे मानले जाते, यामुळे हजारो भाविक एकाच वेळी रथांच्या दिशेने धाव घेतात.

याशिवाय ‘पाहंडी’ विधी (देवतांना मंदिरातून रथावर आणण्याचा सोहळा) आणि रथ प्रवास सुरू होण्याचा क्षण हा धोकादायक टप्पा ठरत असतो. यातच ओडिशामध्ये सध्या उष्ण व दमट हवामान असल्याने डिहायड्रेशन, उष्माघात होण्याची शक्यता होती. अशाच परिस्थितीत यात्रेदरम्यान गर्दी अचानक थांबली किंवा अस्वस्थ होऊन धावपळ करू लागली, तर चेंगराचेंगरीचा धोका अधिक वाढतो. जगन्नाथ पुरीत याच वातावरणाचा भाविकांवर परिणाम झाला आणि अनेकजण अत्यवस्थ झाले.

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर दरवेळी गर्दीच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होतात. मात्र, हजारोंच्या गर्दीत असताना माणसाचं वर्तन नेहमीपेक्षा वेगळं राहतं. गर्दी वाढत गेली की व्यक्तीचा स्वतंत्र विचार करण्याचा वेग कमी होतो आणि तो समूहाच्या हालचालींनुसार वागू लागतो, त्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटनांना समजून घेण्यासाठी गर्दीचं मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक ठरतं.

गर्दीचं मानसशास्त्र काय सांगतं?

चेंगराचेंगरी ही केवळ अपुऱ्या नियोजनामुळे होत नाही. अतिगर्दी, गर्दीतील दाब, अफवा आणि सामूहिक मानवी वर्तन यांच्या एकत्रित परिणामांमुळे अशा घटना घडतात, असे जागतिक घटनांमधील गर्दीच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या प्रा. जी. कीथ स्टील यांनी संशोधनात नमूद केले आहे.

प्रा. जी. कीथ स्टील यांच्या मते, गर्दीच्या ठिकाणी जेव्हा लोकांमध्ये पुढे जाण्याची स्पर्धा किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होते, तेव्हा गर्दी एकाच ठिकाणी कोंडली जाते, यामुळे गुदमरल्यासारख्या दुर्घटना घडू शकतात. तसेच लोक एकमेकांवर कोसळण्याच्या (Crowd Collapse) घटना घडतात.

गर्दीत माणूस समूहाचं अनुकरण का करतो?

मानसशास्त्रज्ञ याला ‘हर्ड बिहेविअर’ (Herd Behaviour) किंवा ‘क्राउड सायकोलॉजी’ म्हणतात. याचा अर्थ, एखाद्या मोठ्या समूहात असताना लोक स्वतःच्या परिस्थितीचा विचार करण्यापेक्षा इतर लोक जे करत आहेत त्याचं अनुकरण करतात.

जसे की, एखाद्या धार्मिक स्थळी अचानक काही लोक धावू लागले तर मागे उभ्या असलेल्या अनेकांना कारणही माहीत नसतं, तरीही तेही धावायला सुरुवात करतात. कारण त्या क्षणी मेंदू ‘इतर सगळे धावत आहेत, म्हणजे काहीतरी धोका असणार’ असा निष्कर्ष काढतो. काही सेकंदांत एक अफवा हजारो लोकांमध्ये पसरते आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते असे तज्ज्ञ सांगतात.

चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये गोंधळ उडण्याची सुरुवात एका अफवेपासून झालेली दिसून आली आहे. यावेळी मानवी मेंदू विचार करण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचवण्याला प्राधान्य देतो. याला मानसशास्त्रात ‘लढा किंवा पळ काढा’ (Fight or Flight Response) म्हटलं जातं. अमेरिकन शरीरक्रियाशास्त्रज्ञ वॉल्टर ब्रॅडफर्ड कॅनन यांनी १९१५ मध्ये ही संकल्पना मांडली.

वॉल्टर ब्रॅडफर्ड कॅनन यांच्या मते, संकटाची जाणीव होताच शरीर तात्काळ स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होते, त्यामुळे अफवा पसरताच लोक एकाच दिशेने वेगाने धावू लागतात. मागून येणाऱ्या गर्दीचा दाब इतका वाढतो की पुढे असलेल्या लोकांना हालचाल करण्याचीही संधी मिळत नाही.

धार्मिक भावना आणि दर्शनाची घाई

धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दीचं स्वरूप इतर सार्वजनिक कार्यक्रमांपेक्षा वेगळं असतं. अनेक भाविक तासनतास किंवा अनेक दिवस प्रवास करून येतात. शुभ मुहूर्त, आरती, प्रसाद किंवा पहिल्यांदा दर्शन मिळवण्याची धार्मिक आस, यामुळे अनेक जण एकाच वेळी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ अनेकांमध्ये असलेली धार्मिक आसच याला कारणीभूत ठरते असं नाही. लाखो लोक एकाच वेळी पुढे सरकू लागले आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसेल तर धोका वाढतो.

फक्त गर्दीची मानसिकता कारणीभूत?

  • तज्ज्ञांच्या मते, नाही.
  • चेंगराचेंगरी ही सहसा एका कारणामुळे होत नाही. अनेक घटकांच्या एकत्रित परिणामांमुळे अशी दुर्घटना घडते.
  • क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देणे
  • प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी अपुरे मार्ग
  • गर्दीची सतत देखरेख न करणे
  • अपुरे पोलिस आणि स्वयंसेवक
  • अफवांवर नियंत्रण ठेवणारी प्रभावी यंत्रणा नसणे
  • स्पष्ट दिशादर्शक फलक आणि घोषणांचा अभाव

क्राउड सायन्स क्षेत्रातील संशोधनानुसार, चेंगराचेंगरी ही केवळ अस्वस्थ गर्दीचा परिणाम नसून मानवी वर्तन आणि व्यवस्थापनातील त्रुटी यांच्या एकत्रित परिणामातून घडते, त्यामुळे मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वैज्ञानिक गर्दी व्यवस्थापन, सतत देखरेख आणि प्रभावी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित होते.