देशात उत्पादित होणाऱ्या गुळाला जगभरातून मागणी वाढली आहे. एकीकडे साखरेच्या मागणी घट होत असताना, गुळाच्या निर्यातीत वाढीचा कल आहे. २०१५ – १६ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये निर्यातीत १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गूळ उद्योग आणि निर्यातीच्या दिलासादायक स्थितीचा आढावा.
भारतातील गुळाचा इतिहास किती जुना?
गूळ हे एक अस्सल भारतीय उत्पादन आहे. वैदिक काळापासून गूळ निर्मिती होत असल्याचे पुरावे सापडतात. इसवी सन पूर्व १४०० ते १००० या काळातील बहुतेक सर्व ग्रंथांत गुळाचा उल्लेख आहे. मुळात शुगर हा इंग्रजी शब्द शर्करा या शब्दापासून घेतला गेला आहे. त्यातून त्याचे भारतीयत्व स्पष्टपणे दिसून येते. इसवी सन ६४७ मध्ये गूळ उत्पादनाची माहिती घेण्यासाठी आणि तंत्र शिकण्यासाठी चीनमधून एक प्रतिनिधी मंडळ तत्कालीन मगध राज्यात आल्याचा उल्लेख आहे. तेव्हापासून गूळ निर्मिती तंत्रज्ञान आणि गुळाची देवाण – घेवाण सुरू आहे.
गुळाला परिपूर्ण आहार मानले जाते. साखर उत्पादनाचे तंत्रज्ञान आल्यानंतर गूळ काहीसा मागे पडला. पण, पुन्हा रसायन विरहित सेंद्रिय गुळाच्या मागणीत वाढ होत आहे. भारतात उसापासून गूळ, खांडसरी आणि साखर तयार केली जाते. त्यातील गूळ हे सर्वाधिक आरोग्यदायी आहे.
जगातील ७० टक्के गुळाचे उत्पादन भारतात?
देशाच्या गूळ उत्पादन व्यवसायाला प्राचीन वारसा आहे. प्राचीन काळापासून गूळ निर्मिती आणि निर्यात होत आली आहे. रसायनमुक्त, सेंद्रिय गुळाला कायमच मागणी राहिली आहे. आरोग्याच्या दृष्टीने किंवा आयुर्वेदात गुळाला औषधाचा दर्जा आहे. पोषणतत्त्वांच्या बाबतीत गुळाला मधाच्या बरोबरीने मानले जाते. पारंपरिक पद्धतीने गुळाचे सेवन प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रात जास्त केले जाते. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण गुळापैकी ७० टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. देशात उत्पादित होणाऱ्या एकूण उसापैकी २० ते ३० टक्के ऊस गूळ निर्मितीसाठी वापरला जातो. गूळ उद्योगात एकूण २५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
देशातून गूळ निर्यात का वाढत आहे?
देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार ही प्रमुख ऊस उत्पादक राज्ये आहेत. या राज्यांमध्ये गूळ उत्पादनही होते. २०१५ – १६ मध्ये गूळ, गुळापासून तयार केलेल्या मिठाईची २९२.८ टनांची निर्यात झाली होती, ज्याद्वारे १,९७० लाख डॉलरचे परकीय चलन मिळाले होते. २०२४-२५ मध्ये ४,०६८ लाख डॉलर किमतीच्या ४७१.९ टन गुळाची निर्यात झाली. २०१५-१६ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १०६.५ टक्के निर्यात वृद्धी झाली आहे. ही निर्यात प्रामुख्याने इंडोनेशिया, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया आणि नेपाळला झाली. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ही निर्यात वाढ कायम असून, ४५०.१ टन गुळाची निर्यात होऊन ३,८४४ लाख डॉलरचे परकीय चलन मिळाले. गतवर्षाच्या याच काळाची तुलना करता १६.५ टक्क्यांनी निर्यात वृद्धी झाली. देशांतर्गत गूळ वापरही सरासरी १५ टक्क्यांनी वाढला. देशांतर्गत बाजारात वार्षिक गूळ विक्री ५,००० टनांपर्यंत वाढली आहे.
पोषणमूल्यांमुळे गुळाला मागणी वाढली?
गूळ प्राचीन काळापासून आरोग्यदायी मानला जातो. तो पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, झिंक, कॉपर आदी खनिजांनी समृद्ध आहे. या शिवाय व्हिटॅमीन, फोलिक ऑसिडही त्यात आढळून येते. कुपोषणमुक्तीसाठी गुळाचा आहारात समाविष्ट केला जातो. तमिळनाडूत शालेय पोषण आहारात गुळाचा समावेश करण्यात आला आहे. गुळापासून शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. आयुर्वेदात गुळाचा वापर प्रामुख्याने खोकला, कफ आणि श्वसनासंबंधी आजारांवरील उपचारात जास्त होतो. गुळातील कॅल्शियम, फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. संपूर्ण शारीरिक पोषणासाठी गुळाला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
ग्रामीण भारताला आर्थिक समृद्धी?
देशातील अनेक राज्यांमध्ये गूळ उत्पादन केले जाते. गूळ प्रक्रिया उद्योग (गुऱ्हाळ) प्रामुख्याने असंघटित क्षेत्रात मोडतो. कामगार पारंपरिक पद्धतीने काम करतात. गत काही वर्षांपासून गुऱ्हाळ घरांचे आधुनिकीकरण सुरू झाले आहे. कोल्हापूर, पुण्यातील दौंड परिसरात राज्यातील गूळ उद्योग एकवटला आहे. वाढती मजुरी, उसाची वाढती किंमत आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत गुळाच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यामुळे कराड, शिराळा परिसरातील पारंपरिक गुऱ्हाळ घरे बंद पडली आहेत. ज्या गुऱ्हाळ घरांच्या मालकांकडून गुळाचे मार्केटिंग केले जाते, सेंद्रिय गूळ, गूळ पावडर, टॉफीच्या स्वरूपात उत्पादन केले जाते, बाजारात गूळ विक्रीची व्यवस्था निर्माण केली आहे, अशीच गुऱ्हाळ घरे तग धरून आहेत. उद्योग जुना असला तरी सध्या फार चांगले दिवस नाहीत. केंद्र सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून पंतप्रधान किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय), पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ आदी योजनांद्वारे गुऱ्हाळ घरांना प्रोत्साहन दिले जात आहे. पण, त्याचा उद्योगावर फार सकारात्मक परिणाम झाला आहे, असे चित्र दिसत नाही.
dattatray.jadhav@expressindia.com
