Crime Ranjangaon Triple Murder Police:औद्योगिक प्रगतीचा चेहरा असलेला रांजणगाव MIDC परिसर. दिवसाढवळ्या मोठाल्या यंत्रांचा आवाज, रात्री ट्रक-ट्रेलरची अखंड वाहतूक… हे चित्र नेहमीचेच. पण २५ मे २०२५ची सकाळ मात्र वेगळीच उजाडली आणि ती येथील अनेकांच्या आता कायम स्मरणातही राहील अशी… तीन अर्धवट जळलेले मृतदेह सापडले आणि त्या पाठोपाठ पोलीस तपासात उलगडत गेली ती मानवी क्रौर्याची थरकाप उडवणारी कहाणी!
औद्योगिक पट्ट्यातील अस्वस्थ करणारे दृश्य
पुणे- अहिल्यानगर महामार्गालगत, एका निर्जन माळरानावर सकाळी काही कामगारांच्या नजरेला एक बाब खटकली…. काळवंडलेली जमीन, पेट्रोलचा उग्र वास आणि तीन अर्धवट जळलेले मृतदेह. एक तरुण महिला आणि तिची दोन लहान मुलं. मृतदेह अर्धवट जळालेले होते… कोणीतरी घाईघाईने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा… रांजणगाव MIDC पोलिसांनी परिसर तत्काळ सील केला. फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पहिल्या नजरेतच पोलिसांना लक्षात आले की, ही केवळ आग लागून झालेल्या मृत्यूची घटना नाही तर हे निर्घृण खूनच आहेत.
पोस्टमॉर्टेममधून उलगडले धक्कादायक सत्य
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आले आणि त्यातून सर्वच बाबी पुरत्या स्पष्ट झाल्या. तिघांचाही मृत्यू आग लावण्याआधीच झाला होता. महिलेच्या गळ्यावर श्वास रोखल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. तर दोन्ही मुलांचाही गळा दाबून खून करण्यात आला होता. पुराव नष्ट करण्याच्या उद्देशानेच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आरोपीने केलेला होता.
दोन अनुत्तरीत प्रश्न
या निष्कर्षानंतर या प्रकरणाची नोंद तिहेरी हत्याकांड अशी करण्यात आली. पण दोन प्रश्न अनुत्तरीत होते. हे तिघे कोण होते? आणि त्यांना इथे आणून कुणी ठार केले?

बीडमधील ‘Missing Complaint’ आणि जय भीम टॅटू
पोलिसांना तपासादरम्यान पडलेल्या प्रश्नाचे उत्तर बीड जिल्ह्यात सापडले. ९ मे रोजी माजलगाव पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने त्याची पत्नी स्वाती केशव सोनवणे (२५) आणि दोन मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. वय, वर्णन आणि काही शारीरिक वैशिष्ट्ये असं सगळं जुळत होतं. ओळख पटवण्यात एक लहानसा तपशील महत्त्वाचा ठरला तो म्हणजे स्वातीच्या हातावरील ‘जय भीम’ टॅटू. मृतदेहांना नाव मिळाले आणि त्याचबरोबर तपासाला दिशाही.
नातेसंबंध आणि संशय
तपास जसजसा पुढे सरकला, तसतशी एक व्यक्ती केंद्रस्थानी येऊ लागली ती म्हणजे गोरख पोपट बोखारे (३६). स्वातीचा नातेवाईक आणि कुटुंबात नेहमीची ये-जा असलेला. स्वाती आणि तिच्या पतीतील वादांमध्ये मध्यस्थी करणारा अशीही त्याची ओळख होती. स्वाती काही दिवसांपूर्वी पतीशी झालेल्या वादानंतर आळंदीत माहेरी आली होती. २३ मे रोजी ती दोन मुलांसह गोरखसोबत दुचाकीवरून निघाली. त्यानंतर तिचा कोणाशीही संपर्क झालेला नव्हता. हीच ‘last seen’ माहिती पोलिसांसाठी निर्णायक ठरली.
CCTV जाळे आणि सात पथकांची मोहीम
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तपासाचा मोठा फास टाकला. सात स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. वाघोली, शिरूर, रांजणगाव, अहिल्यानगर मार्गावरील २५०हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. MIDC परिसरातील सुमारे १६,५०० कामगार, भाडेकरू आणि वाहनांची नोंद चाळण्यात आली. अखेर, एका फुटेजमध्ये संशयित दुचाकी आणि गोरखच्या हालचाली स्पष्ट दिसल्या. त्यानंतर शिरूर परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्या रात्री नेमके काय घडले?
आरोपीनेच पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २३ मेच्या रात्री निर्जन रस्त्यावर स्वाती आणि गोरखमध्ये वाद झाला. स्वातीने लग्नाचा आग्रह धरला आणि गोरखने नकार दिला. वाद वाढला आणि त्याचे रागावरचे नियंत्रण सुटले. त्याने स्वातीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि त्यानंतर झोपेत असलेल्या दोन चिमुकल्यांनाही ठार केले. हत्या केल्यानंतर पेट्रोल आणून मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न त्याने केला. मात्र, त्या रात्री पडलेल्या पावसामुळे आग पूर्णपणे भडकली नाही. हाच पाऊस नंतर पुरावे शिल्लक ठेवण्यासाठी निर्णायक घटक ठरला आणि आरोपीचा डाव फसला.
MIDCसारख्या परिसरात गुन्हे कसे उघड होतात?
हा गुन्हा केवळ कौटुंबिक वादाचा परिणाम नव्हता. तर तो औद्योगिक परिसरातील स्थलांतर, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि गुन्हे लपवण्याचा प्रयत्न यांचा एक वेगळाच मिलाफ होता. MIDCसारख्या भागात लोकांची सतत ये-जा असते, पण त्याचवेळेस काही निर्जन पट्टेही असतात. आणि त्याच निर्जन पट्ट्यांची निवड गुन्ह्यासाठी केली जाते, असे पोलिसांना लक्षात आले. या प्रकरणात मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि फोरेन्सिक तपास यामुळे गुन्हा उघडकीस आला.
विश्वास, फसवणूक आणि निरपराध जीव
गोरख बोखारे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खटला सुरू आहे. दोष सिद्ध होणे न्यायालयाच्या प्रक्रियेवर अवलंबून असले, तरी रांजणगाव MIDCमधील ती सकाळ अनेक प्रश्न मागे ठेवून गेली. नातेसंबंध किती टोकाला जाऊ शकतात? आणि औद्योगिक प्रगतीच्या सावलीत मानवी आयुष्य किती असुरक्षित आहे? ही कथा केवळ गुन्ह्याची नाही, तर ती विश्वास, फसवणूक आणि एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या तीन निरपराध आयुष्यांचीही आहे.
