जळगावचे हवाई स्थान कसे?
अजिंठा लेणीसारख्या जागतिक वारसा स्थळाजवळ असलेले जळगाव विमानतळ गेली अनेक वर्षे दुर्लक्षितच होते. मात्र, आज खासगी आणि व्यावसायिक विमानांच्या हालचालींच्या बाबतीत हे राज्यातील पाचवे सर्वात व्यग्र विमानतळ बनले आहे. सध्या जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा आणि हैदराबादसाठी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीमार्फत, तर मुंबई आणि अहमदाबादसाठी ‘अलायन्स एअर’ कंपनीची विमानसेवा सुरू आहे. यामुळे जळगावचा हवाई नकाशावरचा दर्जा गेल्या काही महिन्यांत बर्यापैकी उंचावला आहे. दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याच्या बाबतीत काही दिवसांपासून हालचाली सुरु आहेत. या विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित आहे.
प्रवाशांना कितपत लाभ?
जळगाव सोन्याच्या बाजारपेठेमुळे नावाजलेले आहेच. येथील शेतकरी केळीसह कापसाचे निर्यातक्षम उत्पादन घेऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यात आणखी हातभार लावत असतात. यामुळे जिल्ह्यात व्यावसायिक, शासकीय कामकाज तसेच शिक्षण आणि पर्यटनासाठी मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, गोवा, सुरत, अहमदाबाद प्रवास करणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे तसेच खासगी प्रवासी गाड्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या प्रवाशांना अवघ्या दोन तासांत मुंबई, पुणे, गोवा पोहचणे शक्य होत आहे.
विमानतळ विस्ताराच्या हालचाली?
जळगाव विमानतळ विस्तारासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एसजीबी इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला २५ कोटी ५२ लाख रुपये निधीतून होणार्या विकासकामांचा कार्यादेश दिल्याचे सांगितले जात आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याने दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची चिन्हे आहेत. विमानतळावर सद्य:स्थितीत सुमारे ७०० चौरस मीटर क्षेत्रफळाची देशांतर्गत टर्मिनल इमारत आहे, ती सुमारे १५०० चौ. मी.पर्यंत वाढवून, विमानांच्या पार्किंगच्या (ॲप्रन) जागेचाही विस्तार करण्यात येणार आहे. या जागेत एटीआर ७२ प्रकारची विमाने आणि एक व्यावसायिक जेट उभे राहू शकेल अशी रचना असेल. त्यासोबतच विमानांच्या जमिनीवरील सेवांसाठी आवश्यक उपकरणांची जागा (जीएसई क्षेत्र), १०० मोटारींच्या पार्किंगची व्यवस्था, विद्युत, यांत्रिक आणि माहिती-तंत्रज्ञान यंत्रणांची कामे केली जाणार आहेत.
मग वाढीव सुरक्षेचे काय?
सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव विमानतळावर २१ इनडोअर डोम कॅमेरे, नऊ आउटडोअर बुलेट कॅमेरे, तीन पीटीझेड कॅमेरे, दोन पॅनोरोमिक कॅमेरे, वाहनचालकांच्या चेहर्याची ओळख पटवणारे आठ, तर आठ एएनपीआर कॅमेरे बसवले जातील. आगमन /प्रस्थान विभागांत संपूर्ण बॅगेज हँडलिंग सिस्टीम (बीएचएस) उभारली जाईल. नवीन अग्निशमन अलार्म प्रणालीचे कामही कंत्राटदारावर सोपवण्यात आले आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सर्व कामांचे कार्यादेश काढले असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी यांनी माध्यमांना दिली आहे.
कार्गो वाहतुकीचा विकास कधी?
जळगाव विमानतळासाठी प्रवासी वाहतुकीनंतर कार्गो वाहतूक सुविधा भविष्यातील सर्वात महत्त्वाची गरज मानली जात आहे. सध्या जळगाव येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल नसल्यामुळे शेतीमालाची हवाई वाहतूक प्रवासी विमानांद्वारे मर्यादित प्रमाणातच होते. जळगाव जिल्हा केळीसह कापूस आणि इतर कृषी उत्पादनांसाठी ओळखला जात असल्यामुळे कार्गो टर्मिनल कार्यान्वित झाल्यास शेतकर्यांना थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याची संधी मिळू शकते. केंद्र सरकारच्या कृषी उडान योजनेत जळगावचा समावेश असूनही प्रत्यक्ष सुविधा याठिकाणच्या विमानतळावर नाहीत. या संदर्भात आवश्यक लॉजिस्टिक साखळी, शितगृह आणि वितरण यंत्रणा विकसित करणेही तितकेच आवश्यक आहे.
भविष्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणे?
जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असली, तरी जळगाव शहरापासून हे स्थळ केवळ ५० कि.मी.वर आहे. अनेक परदेशी पर्यटक आजही जळगावमार्गे अजिंठा प्रवास करण्यास प्राधान्य देतात. जळगाव विमानतळावरून भविष्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सुविधा उपलब्ध झाली, तर पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. सध्या विमानतळावर केवळ एका पाळीतच कामकाज सुरू असल्याने उड्डाणांची संख्या मर्यादित राहते, ही मोठी अडचण आहे.
