जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागात गारपिटीसह वादळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर बाजारात निर्माण झालेला केळीचा तुटवडा आता दरवाढीच्या रूपाने समोर येत आहे. दरम्यान बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला ३५०० रुपयांहून अधिक दर मिळत असताना, या विक्रमी दरवाढीचा लाभ खरोखर किती शेतकऱ्यांना मिळणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नैसर्गिक आपत्तीने किती नुकसान?

जळगाव जिल्ह्यातील रावेरसह यावल, मुक्ताईनगर तसेच इतरही काही तालुक्यांत २४ मे ते ६ जूनच्या कालावधीत झालेल्या गारपिटीसह वादळी पावसामुळे सुमारे ६३८१ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभाच्याच्या प्राथमिक अहवालातून घेण्यात आली आहे. पैकी केळी लागवडीसाठी प्रसिद्ध रावेर तालुक्यात सर्वाधिक ३७८२ हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी काढणीवर आलेल्या केळीच्या हजारो हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. मोठ्या कष्टातून उभ्या केलेल्या केळी बागा काही तासांच्या वादळात उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसणारे सर्व शेतकरी हताश होऊन आक्रोश करताना दिसून येत आहेत.

आपत्तीनंतर आवक घटली?

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांच्या तडाख्यामुळे केळी पट्ट्यातील हजारो हेक्टरवरील बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडल्याने बाजारात दाखल होणाऱ्या मालाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने प्रमुख बाजार समित्यांमध्ये केळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिसून येत आहे. त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी दररोज सुमारे १५० मालवाहू वाहनांमधून होणारी केळीची आवक आता जवळपास निम्म्यावर आली आहे. स्थानिक बाजारपेठांसह उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यांमधून केळीची मागणी कायम असताना पुरेशा प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने व्यापाऱ्यांना त्यामुळे आपली खरेदीची पद्धत बदलावी लागली आहे. बाजार समितीत केळीची प्रतीक्षा करण्याऐवजी अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून शेतातच व्यवहार निश्चित करत आहेत.

केळी दरावर काय परिणाम?

नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यातून वाचलेल्या केळी बागांमधील उत्पादनाला आता बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. अर्थात, उपलब्ध मालाचे प्रमाण मर्यादित असल्याने व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात दर्जेदार केळी खरेदीसाठी स्पर्धा वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतात जाऊन खरेदीचे व्यवहार निश्चित केले जात असताना, उपलब्ध केळीसाठी आगाऊ बुकिंग करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे केळी बाजारातील तेजीला आणखी बळ मिळत असल्याचे चित्र आहे. बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात केळीला मिळणारा कमाल दर २३७१ रुपये प्रति क्विन्टल होता. मात्र अवघ्या काही दिवसांतच या दराने विक्रमी झेप घेत मंगळवारी ३५५५ रुपयांचा टप्पा गाठला. कमी कालावधीत झालेली ही दरवाढ केळी व्यापारातील महत्त्वाची घडामोड मानली जात असून, बाजारातील बदलत्या परिस्थितीचे संकेत देणारी ठरत आहे. आवकेत झालेली मोठी घट आणि त्याच वेळी कायम असलेली स्थानिक तसेच परराज्यातील मागणी यामुळे केळी दरांवर सतत दबाव निर्माण होत आहे. बाजारात केळीची उपलब्धता कमी असताना स्पर्धात्मक खरेदीचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी केळी दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दरवाढीचा लाभ नेमका कोणाला?

केळीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या तेजीचा लाभ सर्वच केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यातून वाचलेल्या केळी बागांमधील मालालाच सध्या चांगला भाव मिळत असून, काढणीसाठी तयार असलेल्या उत्पादनाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा होत आहे. मात्र वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांची परिस्थिती वेगळीच आहे. अनेक शेतकऱ्यांकडे संपूर्ण बागा जमीनदोस्त झाल्याने बाजारात विक्रीसाठी माल उपलब्ध नाही. परिणामी अचानक निर्माण झालेली तेजी आणि वाढते दर त्यांच्यासाठी केवळ चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रत्यक्ष आर्थिक लाभापासून ते वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे, ज्या काळात दरवाढीचा सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा होती, त्याच काळात केळी उत्पादन नैसर्गिक आपत्तीने नष्ट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या हातातून कमाईची संधीही निसटली आहे. त्यामुळे केळीला विक्रमी भाव मिळत असला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ दिलासादायक ठरण्याऐवजी हळहळ वाढवणारी ठरत आहे.

केळीचे दर आणखी वाढणार?

केळी पट्ट्यातील मोठ्या नुकसानीचा परिणाम आगामी काळातही बाजारावर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर बागांचे नुकसान झाल्याने बाजारातील केळीची आवक पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार आहे. नव्या लागवडीतील पीक तयार होऊन बाजारात दाखल होण्यास काही महिने शिल्लक असल्याने सध्या उपलब्ध उत्पादनावरच बाजाराची भिस्त राहणार आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दराला सातत्याने आधार मिळत आहे. जाणकारांच्या मते, स्थानिक बाजारपेठांसह परराज्यांतील व्यापारी आणि निर्यातदारांकडून मागणी कायम राहिल्यास केळीच्या दरातील तेजी पुढील काळात आणखी वाढू शकते. आवक अपेक्षेपेक्षा कमी राहिली तर येत्या काही दिवसांत केळीचे घाऊक दर नव्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, दरवाढीचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही दिसू लागण्याची चिन्हे आहेत.

patil.jitendra@expressindia.com