उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार तसेच बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागते. या पार्श्वभूमीवर, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असलेल्या केळीच्या दोन नवीन वाणांच्या लागवडीला आता जळगाव जिल्ह्यात चालना देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांपर्यंत नवीन वाण कसे पोहचणार?
वादळी वाऱ्यांचा सामना करण्यास सक्षम ‘कावेरी वामन’ आणि बुरशीजन्य मर रोग प्रतिकारक्षम असलेल्या ‘कावेरी पूवन’ या केळी वाणांच्या रोपांची निर्मिती आता जळगावमध्ये करण्यात येणार आहे. या संबंधीचा सामंजस्य करार त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने जळगावमधील जैन इरिगेशनशी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत नुकताच केला. जैन इरिगेशन कंपनी आता जळगावमध्ये ‘कावेरी वामन’ आणि ‘कावेरी पूवन’ या जातीच्या केळी रोपांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना किफायतशीर दरात पुरविणार आहे. यामुळे प्रतिकूल परिस्थितीत केळी उत्पादन घेणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
कावेरी वामन केळीची वैशिष्ट्ये?
केळी पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले सुधारित वाण शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पादनक्षम आणि किफायतशीर ठरत आहेत. त्यापैकीच एक कावेरी वामन हा वाण मुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्राने लोकप्रिय ग्रॅन्ड नैन जातीपासून विकसित केला आहे. कावेरी वामन हा ट्रिपल ए जिनोमिक गटातील वाण असून, त्याची वाढ विशेषतः सपाट भूप्रदेश आणि चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे होते. पाण्याचा साठा न होणारी जमीन या वाणासाठी अधिक उपयुक्त मानली जाते. त्यामुळे योग्य जमिनीची निवड केल्यास या वाणातून चांगले उत्पादन मिळू शकते. या वाणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बुटकी वाढ. झाडाची उंची साधारणतः १५० ते १६० सेंटीमीटर इतकी मर्यादित राहते. त्यामुळे झाडे मजबूत राहतात आणि वादळ, जोरदार वारे किंवा अति पावसाच्या परिस्थितीत पडण्याचा धोका कमी होतो. खोडावर काळसर-तपकिरी डाग दिसतात, तर संपूर्ण झाडाचा आकार दंडगोलाकार असतो.
कावेरी वामन केळीचे किती उत्पादन?
कावेरी वामन केळीचा प्रत्येक घड साधारणतः १८ ते २५ किलो वजनाचा असतो. फळे आकाराने आकर्षक आणि बाजारपेठेसाठी योग्य असतात. पिकल्यावर केळीचा रंग पिवळा होतो, तर आतील गर क्रिम रंगाचा, मऊ आणि चवीला गोड असतो. त्यामुळे या वाणाच्या केळीला बाजारात चांगली मागणी मिळण्याची शक्यता आहे. कावेरी वामन वाणाची लागवड अतिसघन पद्धतीने करता येते. त्यामुळे कमी जागेत अधिक झाडे लावता येतात आणि एकूण उत्पादन वाढते. याशिवाय, झाडांची उंची कमी असल्याने त्यांना आधार देण्याची गरज भासत नाही. त्यामुळे लागवड आणि व्यवस्थापन खर्चात सुमारे १० टक्क्यांपर्यंत बचत होते. कावेरी वामन वाण विशेषतः वादळ प्रवण आणि किनारी भागासाठी उपयुक्त मानला जातो. अशा भागांमध्ये उंच झाडे पडण्याचा धोका अधिक असतो. मात्र, बुटक्या रचनेमुळे हा धोका कमी होतो. लागवडीनंतर साधारणतः ११ ते १२ महिन्यांत हा वाण कापणीसाठी तयार होतो. तसेच हा वाण वर्षभरात कोणत्याही हंगामात लावता येतो. सरासरी हेक्टरी ५५ ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.
कावेरी पूवन केळीची वैशिष्ट्ये?
कावेरी पूवन हा केळीचा सुधारित वाण सध्या विशेष चर्चेत आहे. लोकप्रिय पूवन जातीपासून विकसित करण्यात आलेला हा वाण त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने तब्बल १५ वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनातून विकसित केला आहे. या वाणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उच्च दर्जाची रोगप्रतिकारक क्षमता. केळी पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या विषाणूजन्य रोगांसह फुजारिअम विल्ट (मर रोग) या घातक रोगाला हा वाण प्रभावीपणे प्रतिकार करतो. विशेषतः टीआर-१ आणि टीआर-४ या प्रकारांमुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट होते, परंतु कावेरी पूवन वाण या दोन्ही प्रकारांपासून संरक्षण देतो, असा दावा संशोधन संस्थेकडून करण्यात आला आहे. उत्पादन क्षमतेच्या दृष्टीनेही हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पारंपरिक स्थानिक पूवन जातीच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आढळून आली आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी हा वाण उपयुक्त मानला जात आहे.
कावेरी पूवनची लागवड क्षारयुक्त जमिनीतही?
कावेरी पूवन या केळीच्या वाणाची आणखी एक विशेष बाब म्हणजे विविध प्रकारच्या जमिनीत जुळवून घेण्याची त्याची क्षमता. विशेषतः समुद्रकिनारी आढळणाऱ्या खारट तसेच विंधन विहिरींच्या पाण्यामुळे क्षारयुक्त झालेल्या जमिनीतही हा वाण चांगल्या प्रकारे वाढतो. त्यामुळे किनारपट्टी भागातील शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. अशा जमिनीत इतर पिके कमी प्रमाणात यशस्वी ठरतात, त्या तुलनेत कावेरी पूवन वाणाने चांगले उत्पादन देण्याची क्षमता दाखवली आहे. केळी पिकाची वाढ जोमदारपणे होत असून, घडाची गुणवत्ता चांगली राहते. फळांचा आकार, चव आणि बाजारातील मागणी लक्षात घेता केळीचा हा वाण व्यापारी दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरू शकतो.
patil.jitendra@expressindia.com
