जळगावमध्ये २० वर्षांपूर्वी गाजलेले बहुचर्चित घरकुल गैरव्यवहार प्रकरण थंडावल्याचे वाटत होते. मात्र, न्यायालयीन कामकाजासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन फायली महानगरपालिकेच्या अभिलेख कक्षातून गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. संबंधित फायली मनपाच्या निष्काळजीपणामुळे हरवल्या की पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार असल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
घरकुल गैरव्यवहाराचे प्रकरण काय?
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना स्वस्तात पक्की घरे देण्यासाठी १९९९ मध्ये जवळपास ११ हजार घरकुले बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे ११० कोटी रुपयांचे कर्जही काढण्यात आले होते. योजनेचा हेतू चांगला असला, तरी ती राबविण्याची जबाबदारी असलेल्या मडळींचा हेतू मात्र चांगला नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन नगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी घरकुल प्रकल्पाला घरघर लागली. अनियमितता, कायद्याचे सर्रास उल्लंघन, मनमानी पद्धतीने घेतलेले निर्णय, आर्थिक गैरव्यवहारामुळे घरकुल योजना चांगलीच वादात सापडली. घरकुले बांधण्यासाठी निवडलेली जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. तसेच त्यासाठी बिगरशेती परवानगीही घेतली नव्हती. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी मर्जीतील बिल्डर्सला घरकुलांची वसाहत उभारणीचे काम दिले होते. त्याकरीता कंत्राटदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आली होती. कंत्राटदारास इतरही बऱ्याच सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेनुसार काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराने पाळली नाही. त्यानंतरही तत्कालीन सत्ताधारी गटाने कोणतीच कारवाई केली नाही. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली, असे आक्षेप नोंदविले गेले.
गैरव्यवहारात मोठे नेते कसे अडकले?
दरम्यानच्या काळात जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल योजनेतील गंभीर बाब लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी २००६ मध्ये जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत तब्बल २९ कोटी ५९ लाख, नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात सुरुवातीला संशयित म्हणून तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे कंत्राटदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधि सल्लागार तसेच अधिकारी अशा सुमारे ९० जणांचा समावेश करण्यात आला. अर्थात, गुन्हा दाखल होऊन तसेच संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही एप्रिल २००८ पर्यंत गैरव्यवहारातील कोणालाच अटक झाली नव्हती. सुमारे सहा वर्षे तपास रेंगाळल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी घरकुल प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर तत्कालीन कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार सुरेश जैन यांच्यासह ४८ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्यात आले. कट कारस्थान करणे, महापालिकेची फसवणूक करणे, विश्वास भंग करणे यासारखे आरोप संशयितांवर ठेवण्यात आले. जैन आणि देवकर यांच्यासह इतरांना बराच काळ तुरूंगवासही भोगावा लागला.
घरकुल प्रकरण आता पुन्हा चर्चेत का?
तब्बल २० वर्षानंतर घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या मूळ फायली जळगाव मनपाच्या अभिलेख कक्षातून गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आता चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या या फायली वारंवार मागणी करूनही उपलब्ध न झाल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात फाइल गहाळ होण्यामागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. नगररचना विभागातील अभिलेख व महत्त्वाची कागदपत्रे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात. त्यानुसार, सन २००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि गट क्रमांक ३३७/३ अ/२ या जागांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फायली याच अभिलेख कक्षात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, ३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित फायलींची वारंवार मागणी करण्यात आल्यानंतर त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी नगररचना विभागात शोध मोहीम राबविण्यात आली. तरीही फायली सापडल्या नाहीत.
फायली हरवल्या की गायब केल्या?
जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या फायली रेकॉर्ड रूममधून कोणीतरी काढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून संबंधित फायली चोरून नेल्याचा संशय आहे. या फायली गहाळ झाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव महानगरपालिकेतील अभिलेख व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः घरकुल गैरव्यवहारासारख्या संवेदनशील प्रकरणातील मूळ फायलीच गायब झाल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. फायली निष्काळजीपणामुळे हरवल्या की त्या जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या, त्यात मनपाच्या कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. तपासातून काय निष्पन्न होते, त्याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
