पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) जांभूळ मधासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले. आतापर्यंत पारंपरिक उपचारांमध्ये गुणकारी मानला जाणारा जांभूळ मध आता आरोग्यदायी असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय या संशोधनाच्या पलीकडे जात एनसीएल स्वदेशी मधाचा राष्ट्रीय विदासाठा (नॅशनल डेटाबेस) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एनसीएलचे जांभूळ मधाबाबत संशोधन
‘सर्वाधिक भेसळ होणाऱ्या उत्पादनांमध्ये मधाचा समावेश आहे. त्यामुळे मधाच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ‘एनसीएल’मध्ये संशोधन सुरू करण्यात आले. ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरच्या जंगलातून जांभूळ मधाचे ८२ नमुने संकलित केले. या नमुन्यांचे न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (एनएमआर) आणि मास स्पेक्टोमेट्री या तंत्राच्या साहाय्याने मधाची अस्सलता तपासण्यात आली. तसेच मधातील गुणधर्मांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. डॉ. उदय किरण मारेल्ली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटामध्ये स्नेहल वाघोले, शिरीन मॉन्सी, सपना रवींद्रनाथन यांचा समावेश होता. या संशोधनातून जांभूळ मधाची अस्सलता तपासण्यासाठी विशिष्ट पद्धती विकसित करण्यात आली.
संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत?
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून जांभूळ मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे प्रमाण अन्य मधांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असून, अँटिऑक्सिडंट क्षमता ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. शरीराला फायदेशीर ठरणारे मायरीसेटीन, केम्पफेरॉल असे एकूण १२ प्रकारचे नैसर्गिक घटक जांभूळ मधात मुबलक प्रमाणात आढळले. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या मधाचे आंबण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने हा मध दीर्घकाळ टिकू शकतो. जांभळाच्या मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूपच कमी (१०० ग्रॅम मधात २५.९१ ग्रॅम) आढळले. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे एकूण एकत्रित प्रमाणही इतर मधांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या मधाचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ (रक्तातील साखर वाढवण्याचा वेग) अत्यंत कमी आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी जांभूळ मध अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्याशिवाय आतापर्यंत पारंपरिक वैद्यकीय उपचारांमध्ये गुणकारी मानला जाणारा ‘जांभूळ मध’ खरोखरच आरोग्यदायी असल्यावर शास्त्रीयदृष्ट्या शिक्कामोर्तब झाले आहे.
जांभूळ मधाचे संशोधन का महत्त्वाचे?
जांभूळ मधाची अस्सलता तपासण्यासाठी विशिष्ट पद्धती विकसित करण्यात आली. न्यूझीलंडमधून येणारा मनुका नावाचा मध दहा हजार रुपये किलो दराने विकला जातो. तर, जांभूळ मध केवळ हजार ते बाराशे रुपये किलो दराने विकला जातो. न्यूझीलंडच्या मधात असलेले गुणधर्म आपल्या स्वदेशी जांभूळ मधात आहेत, असे एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी सांगितले. तर संशोधनाचे नेतृत्व केलेले डॉ. उदय किरण मारेल्ली म्हणाले, की महाबळेश्वरच्या जंगलातून संकलित केलेल्या नमुन्यांच्या आधारे मधाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. आतापर्यंत आपला स्वदेशी मध परदेशात पाठवून त्याच्या चाचण्या करून घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे आपल्या मधाचा विदा परदेशी जात होता. मात्र, आता मधाच्या तपासणीसाठीची पद्धत विकसित केल्यामुळे देशातच मधाच्या चाचण्या करता येतील.
जांभूळ मधाचे संशोधन दिशादर्शक कसे?
जांभूळ मधाच्या संशोधनानंतर देशात उत्पादित होणाऱ्या मधाची अस्सलता आणि भौगोलिक मूळ शोधण्यासाठी स्वदेशी मधांचा राष्ट्रीय विदासाठा (नॅशनल डेटाबेस) तयार करण्याचे काम ‘एनसीएल’ने सुरू केले असून, त्याचे प्रारूपही विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध प्रांतांमध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण फुलोऱ्यापासून तयार होणाऱ्या अनोख्या मधांचा अभ्यास केला जाणार आहे. ‘देशात विविध राज्यांमध्ये मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, मधाची अस्सलता तपासण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. विविध प्रकारच्या मधाच्या चाचण्या करून त्यांच्यातील गुणधर्मांचा अभ्यास करून मधाच्या अस्सलतेचे निकष तयार करण्यात येत आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात ‘एनसीएल’ने जांभूळ मध, कारवी मध, मोहरी मध अशा काही मधांचा अभ्यास केला आहे. त्याच्या पुढील टप्प्यात मधाचा राष्ट्रीय विदासाठा तयार केला जाणार आहे. त्यासाठी ‘एनसीएल’ने आठ प्रकारच्या मधांचे सुमारे ६००हून अधिक नमुने संकलित केले आहेत. येत्या काळात आणखी नमुने संकलित करून त्यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे.’
स्वदेशी मधाचा राष्ट्रीय विदासाठा का महत्त्वाचा?
भारतीय मधाचे नेमके मूल्य काय, मध अस्सल आहे की नाही, हे तपासण्यासाठी मधाचा राष्ट्रीय विदासाठा असणे आवश्यक आहे. आतापर्यंत युरोपीय निकषांनुसार मधाची चाचणी करावी लागते. मात्र, भारतीय मधासाठी युरोपीय निकष लावणे योग्य नाही. भारताची भौगोलिकता वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे फुलोराही वेगळा आहे. उदाहरणार्थ, आठ वर्षांतून एकदा फुलणाऱ्या कारवीच्या फुलांपासूनही मध तयार होतो. ही प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. त्यामुळे या वनस्पतीच्या फुलांपासून तयार होणाऱ्या मधासाठी युरोपीय निकष लावणे योग्य नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून विदासाठा तयार करण्याची गरज आहे. स्वदेशी मधांचा राष्ट्रीय विदासाठा मधांचे वेगळेपण सिद्ध करण्यासह मधातील भेसळ रोखण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. युरोपात अशा प्रकारचा विदासाठा आहे. त्यामुळे त्यांना मधाच्या अस्सलतेबाबत चाचण्या करणे शक्य होते. आपल्याकडे विकल्या जाणाऱ्या मधाची ‘एनएमआर’ (न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स) चाचणी करणे गरजेचे आहे. मधाच्या राष्ट्रीय विदासाठ्यामुळे स्वदेशी मधांचा अभ्यास करून त्यांचे वेगळेपण तपासता येईल. त्याद्वारे मधांचे भौगोलिक मानांकनही मिळवता येईल. त्या आधारे स्वदेशी मधांचे ब्रँडिंग करता येऊ शकेल, असेही डॉ. आशिष लेले यांनी नमूद केले.
