Indian Security Agencies Alert Kashmir Funding Iran War : २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या चार आठवड्यांपासून पेटलेल्या या संघर्षाची धग अद्यापही कायम आहे. पश्चिम आशियातील या युद्धात इराणमधील हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमांनी आपली वाहने आणि सोन्याचे दागिने विकून इराणला आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या देणग्यांपैकी काही निधीबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी संशय व्यक्त केला आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
काश्मीरमधून इराणला किती मदत?
१४ मार्च रोजी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून मानवतावादी मदतीसाठी आवाहन केले होते. त्यावेळी दूतावासाने मदतीसाठी बँक खात्याचा क्रमांक आणि आईएफएससी कोडही प्रसिद्ध केला होता. या आवाहनानंतर काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या मुस्लिमांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह आपली वाहने आणि पाळीव जनावरे विकून इराणला मदत करण्यास सुरुवात केली. यादरम्यान काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी स्टॉल्स लावून आणि घरोघरी जाऊन निधी संकलनाच्या मोहिमा राबवल्या गेल्या. ही मदत केवळ आर्थिक नसून ती वैचारिक आणि भावनिक प्रेरणेतून दिली जात असल्याचे काश्मिरी जनतेचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अंदाजानुसार, आतापर्यंत सुमारे १७.९१ कोटी रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंचाही यात समावेश आहे. हा आकडा इराणी दूतावासाच्या खात्यात थेट जमा झालेल्या रकमेव्यतिरिक्त आहे. इराणला बडगाम जिल्ह्यातून सुमारे ९.४ कोटी रुपये, बारामुल्ला जिल्ह्यातून ४.५ कोटी रुपये आणि श्रीनगरमधून सुमारे २ कोटी रुपये देणगी म्हणून देण्यात आल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा : २५ वर्षीय तरुणीला मिळाली दयामरणाची परवानगी; वडिलांविरोधातच जिंकली कायदेशीर लढाई, प्रकरण काय?
भारतीय सुरक्षा यंत्रणांना कशाचा संशय?
काश्मीरमधून इराणला पाठवल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या देणग्यांवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी करडी नजर ठेवली आहे. काही संशयास्पद संस्था सामान्य जनतेच्या भावनांचा फायदा घेऊन हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी किंवा फुटीरतावादी कारवायांसाठी वळवत असल्याचा संशय त्यांना आहे. काश्मीरमधील शिया समुदायातील गरीब आणि श्रीमंत नागरिकांकडून इराणला अत्यंत प्रामाणिकपणे मदत केली जात आहे. मात्र, काहीजण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांकडून मिळालेली मदत फुटीरतावाद्यांना पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. इंडिया टुडेला एका अधिकाऱ्याने सांगितले की, थेट इराणी दूतावासाला मदत करणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही; पण मध्यस्थांकडे दिलेला पैसा दूतावासापर्यंत पोहोचेलच याची अजिबात शाश्वती नाही. या निधी संकलनात सहभागी असलेल्या व्यक्तींचे पूर्वी फुटीरतावाद्यांशी संबंध होते, असे ‘द प्रिंट’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.
फुटीरतावादाला खतपाणी घालण्याची भीती?
केंद्र सरकारसह जम्मू-काश्मीरमधील अंमलबजावणी यंत्रणांची या देणग्यांवर करडी नजर आहे. योग्य काळजी न घेतल्यास देणगी देणाऱ्यांनाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. २४ मार्चच्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका गोपनीय अहवालात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित व्यक्ती आणि स्थानिक फुटीरतावादी घटक यांच्यात एक मध्यस्थ साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. श्रीनगरमधील बगवानपोरा येथील हकीम सज्जाद हा इराणला दिल्या जाणाऱ्या निधीचे स्थानिक धर्मगुरूंमध्ये वितरण करत असल्याची माहिती आहे. सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेला सय्यद रुहोल्ला रिजवी याचेही नाव या प्रकरणात समोर आले आहे. रिजवी हा हकीम सज्जाद याचा मेहुणा असून या आर्थिक जाळ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय आहे.
देणग्यांचा यापूर्वीही झाला होता गैरवापर
काश्मीरमध्ये सध्या इराणसाठी सुरू असलेल्या निधी संकलनाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी एका जुन्या प्रकरणाचा दाखला देत तेथील नागरिकांना सावध केले आहे. दक्षिण काश्मीरमधील एका स्थानिक धर्मगुरूने मानवी मदतीच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचा वापर चक्क भारतविरोधी कारवायांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार काही काळापूर्वी उघडकीस आला होता. मार्च २०२३ मध्ये कट्टरपंथी मौलवी सर्जन बरकाती याने जनतेच्या भावनांशी खेळून तब्बल १.५ कोटी रुपयांहून अधिक निधी कट्टरतावाद्यांना दिल्याचे तपासात समोर आले होते. २०१६ मध्ये दहशतवादी बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर बरकातीने आपल्या प्रक्षोभक भाषणांद्वारे काश्मीर खोऱ्यात हिंसेला चिथावणी दिली होती. त्यावेळेही मानवतावादी मदतीच्या बहाण्याने त्याने जनतेला भावनिक आवाहन करून कोट्यवधी रुपये जमा केल्याचे उघड झाले होते. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी काश्मिरी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. इराणला देणगीच्या स्वरूपात मदत करताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास थेट दूतावासाच्या खात्यात पैसे जमा करावे, जेणेकरून चुकीच्या हातात पैसे जाऊन त्याचा गैरउपयोग होणार नाही. आमची पथके या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
