Why Kashmiris Donating Gold, Cash and Utensils to Iran : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशांतील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर एकपाठोपाठ एक हल्ले करण्यास सुरुवात केली. मध्यपूर्वेतील या संघर्षाला सुरुवात होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला आहे. या रक्तरंजित संघर्षाचा जागतिक स्तरावर परिणाम होत असल्याने जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. भारताने या युद्धापासून दूर राहायचे ठरवले असले तरीही जम्मू-काश्मीरमधील जनतेने इराणला पाठिंबा देण्यासाठी सढळ हाताने मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये केवळ आर्थिक मदतच नाही, तर मौल्यवान वस्तूंचेही दान दिले जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…
इराणला काश्मीरमधून मदतीचा ओघ
इराणला युद्धाच्या झळा बसत असताना भारताच्या काश्मीर खोऱ्यातून मदतीचा एक अभूतपूर्व ओघ सुरू झाला. काश्मीरमधील अनेक मुस्लिमांनी इराणी लोकांना मदत म्हणून आपले दागिने, रोख रक्कम, तांब्याची भांडी आणि अगदी स्वतःची दुचाकी व चारचाकी वाहने देण्यास सुरुवात केली. विशेषतः ईदच्या दुसऱ्या दिवसापासून महिलांसह तरुण मुलांनी घरोघरी जाऊन इराणसाठी मदत गोळा केली. एका काश्मिरी महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतर २८ वर्षांपासून जपून ठेवलेले सोन्याचे दागिने इराणमधील मदतकार्यासाठी दान केले. गांदरबलमधील एका तरुणाने आपली ‘रॉयल एनफिल्ड’ बाईक विक्रीला काढली असून, त्यातून येणारे पैसे इराणला देण्याचा निर्णय घेतला; तर दुसऱ्या एका व्यक्तीने स्वतःची कार विकून, तो निधी मदतकार्यासाठी दिला. काश्मीर खोऱ्यातील अनेक महिलांनी आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि तांब्याची महागडी भांडीही दान केली. काही कुटुंबांनी तर आपली पाळीव जनावरे विक्रीला काढली आणि त्यामधून मिळालेल्या पैशांची इराणला आर्थिक मदत दिली.
आणखी वाचा : होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचा मृत्यू; मदतीअभावी गेला जीव? कोण होते राकेश सिंह?
इराणसाठी अनेकांनी विकली सोन्याची दागिने
मागाम येथील रहिवासी नवशीन झहरा यांनी चक्क लग्नात मिळालेले सोने-चांदीचे दागिने इराणी जनतेला दान केले. दागिने दान केल्यावर मला मानसिक शांतता मिळाली. संकटात सापडलेल्या मुस्लीम बांधवांना मदत केल्याचा मला खूप अभिमान आहे, असे त्यांनी Deccan Chronicle या वृत्तवाहिनीला सांगितले. रायनावाडी येथील रहिवासी एजाज अहमद यांच्या मते, इराणवर लादलेल्या या युद्धामुळे मोठे नुकसान झाले असून, सुसंस्कृत जगाने त्यांना मदत करणे हे कर्तव्य आहे. स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि मशिदींचे व्यवस्थापन सध्या घरोघरी जाऊन ही मदत गोळा करण्यात व्यग्र आहे. या मदतीबद्दल इराणच्या दूतावासाने भारतीयांचे मनापासून आभार मानले. इराणच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या दयाळू काश्मिरी जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो. मानवी मूल्यांसाठी तुम्ही दाखवलेली ही एकजूट आणि दयाळूपणा इराण कधीही विसरणार नाही… धन्यवाद, अशी पोस्ट इराणी दूतावासाने केली.
इराणला कशी पोहोचवली जातेय मदत?
पश्चिम आशियातील युद्धाच्या काळात इराणला मिळणारा पाठिंबा आता केवळ सामान्य जनतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. काश्मीरमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि लोकप्रतिनिधींपासून ते सामाजिक संस्थांपर्यंत सर्व जण या मानवतावादी कार्यात सहभागी झाले आहेत. अंजुमन-ए-शरी शियान या संघटनेचे आगा मुजतबा यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी संवाद साधताना या मोहिमेमागची भूमिका स्पष्ट केली. हा केवळ आर्थिक मदतीचा विषय नाही, तर इराणशी असलेली आमची एकजूट दर्शविण्याचा हा एक मानवतावादी मार्ग आहे. आम्ही इस्रायल व अमेरिकेच्या आक्रमकतेचा निषेध केला आहे आणि आता लोक शक्य त्या सर्व मार्गांनी आपली मदत पाठवीत आहेत, असे ते म्हणाले. इराणला मिळणारी ही मदत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पाठवली जात आहे. जे लोक आर्थिक मदत स्वतः ट्रान्स्फर करू शकत नाहीत, त्यांची रोख रक्कम आयोजकांकडून गोळा केली जात असून, ती दूतावासाच्या खात्यात जमा केली जात आहे. बडगामचे आमदार मुंतझिर मेहदी यांनी आपला एक महिन्याचा पगार इराणच्या मदत निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. इराणच्या दूतावासाने जगभरातील अनेक देशांमधून येणाऱ्या देणग्या मिळविण्यासाठी सरकारी अधिकृत बँक खात्याची माहिती सार्वजनिक केली आहे.
हेही वाचा : शशी थरूर यांच्या इराण युद्धावरील वक्तव्यांमुळे राजकीय वादंग का उठला? कारण काय?
काश्मीर आणि इराणचे भावनिक नाते काय?
काश्मिरी लोकांचा इराणप्रति असलेला हा भावनिक पाठिंबा मुख्यतः त्यांच्या धार्मिक नात्याशी जोडलेला आहे. काश्मीरमधील मोठा वर्ग हा शिया मुस्लीम असल्याने त्यांच्या दृष्टीने इराणचे सर्वोच्च पद अतिशय महत्त्वाचे आहे. काश्मीरमधून इराणसाठी दिल्या जाणाऱ्या देणग्या हा त्याचा आणखी एक पुरावा मानला जात आहे. यापूर्वी अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. या आंदोलनांमुळे प्रशासनाला जवळपास दोन ते तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागली होती. काश्मीरला ‘इराण-ए-सगीर’ (छोटा इराण) म्हणून ओळखले जाते. १९७९ मध्ये झालेल्या इराणच्या क्रांतीनंतर एका वर्षातच इराणच्या तत्कालीन सर्वोच्च नेत्याने काश्मीरला भेट दिली होती. त्यांनी श्रीनगरच्या ऐतिहासिक जामा मशिदीत भाषण करून शिया-सुन्नी एकतेचा संदेश दिला होता. यादरम्यान काश्मीरमधून इराणला मिळणारी ही मदत केवळ एका युद्धात दिलेले सहकार्य नसून, ते एका प्राचीन संस्कृतीशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानले जात आहे.
