रणजी करंडक पदार्पणाच्या तब्बल ६७ वर्षांनंतर जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला. उपांत्य फेरीत त्यांनी मोहम्मद शमी, आकाश दीप आणि मुकेश कुमार या कसोटीपटूंचा समावेश असलेल्या बंगाल संघाला धूळ चारण्याची किमया साधली. एरवी पर्यटनस्थळ अशी मर्यादित ओळख असलेल्या या राज्याने आता क्रिकेटमधील महासत्ता अशी ओळख निर्माण केली आहे. आता संघर्षमय प्रवासात त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

अस्तित्वासाठी संघर्ष…

जम्मू-काश्मीर संघाने यंदाच्या हंगामापूर्वी ३३४ रणजी सामन्यांत केवळ ४५ विजय मिळवले होते. त्यामुळे उत्तर विभागातील दुबळा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राजकीय आणि सामाजिक ताणतणावांमुळे जम्मू-काश्मीर येथील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो हे सर्वश्रुत आहे. तेथील क्रिकेटही याला अपवाद नव्हते. क्रिकेटच्या फारशा सुविधा नसल्याने जम्मू-काश्मीर संघाच्या प्रगतीत मोठे अडथळे निर्माण झाले होते. मात्र, कालांतराने बदल घडत गेला आणि जम्मू-काश्मीर संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.

बेदी, पठाण यांची भूमिका का महत्त्वाची?

माजी कसोटी कर्णधार बिशनसिंग बेदी २०११ मध्ये जम्मू-काश्मीर संघाशी जोडले गेले. त्यानंतर येथील क्रिकेट प्रगतिपथावर आल्याचे जम्मू-काश्मीरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू परवेझ रसूल याने एका मुलाखतीत सांगितले. अतिशय धाडसी वृत्ती आणि कणखर मानसिकता यासाठी बेदी ओळखले जायचे. हेच त्यांनी जम्मू-काश्मीर संघातील खेळाडूंतही रुजवले. तसेच २०१८ मध्ये भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण खेळाडू आणि प्रेरक (मेन्टॉर) म्हणून जम्मू-काश्मीर संघाचा भाग झाला. त्याने युवकांना हाताशी घेत जम्मू-काश्मीर संघाची प्रगती कायम राखली. टप्प्याटप्प्याने अकिब नबी, अब्दुल समद आणि उमरान मलिक यांसारखे युवा खेळाडू उदयास आले. विविध पार्श्वभूमीच्या खेळाडूंना एकत्रित ठेवण्यात कर्णधार पारस डोगरने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘बीसीसीआय’चे विद्यमान अध्यक्ष मिथुन मन्हास यांनीही संघटक म्हणून जम्मू-काश्मीर क्रिकेटच्या उभारीत बहुमूल्य योगदान दिले आहे.

सुविधांमध्ये सुधारणा, प्रशिक्षकांचे नियोजन

गेल्या काही हंगामांत जम्मू-काश्मीर येथील क्रिकेटच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच खेळपट्ट्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काळी आणि लाल माती, अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवणारा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर तग धरू शकणारा संघ घडवण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरत आहे. तसेच माजी कसोटीपटू अजय शर्मा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर प्रतिभावान खेळाडूंचा गट तयार केला. त्यातील खेळाडूंना घडविण्यात आले आणि त्याचेच फळ आता जम्मू-काश्मीर संघाला मिळते आहे. शर्मा यांना गोलंदाजी प्रशिक्षक पी. कृष्णकुमार आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक यांची मोलाची साथ मिळाली आहे.

अलीकडच्या काळातील कामगिरी

जम्मू-काश्मीर संघाने २०१७ च्या हंगामात रणजी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यासाठी त्यांना आणखी नऊ वर्षे वाट पाहावी लागली. गेल्या हंगामात मुंबईला मुंबईत हरवून जम्मू-काश्मीर संघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्यांना केरळकडून (पहिल्या डावातील पिछाडीमुळे) हार पत्करावी लागली. यंदाच्या हंगामात जम्मू-काश्मीरला सलामीच्या साखळी लढतीत मुंबईने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राजस्थानवर डावाने विजय, तर दिल्ली, हैदराबाद यांना मात देत बाद फेरी गाठली. मग उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेते मध्य प्रदेश, तर उपांत्य फेरीत बंगालला नमवत जम्मू-काश्मीर संघाने प्रथमच रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कर्नाटकचे आव्हान पार करावे लागेल.

अकिब नबीच्या रूपात कसोटीपटूचा उदय?

जम्मू-काश्मीर संघाच्या यंदाच्या यशात वेगवान गोलंदाज अकिब नबी याची भूमिका निर्णायक ठरली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात १२ बळी मिळवल्यानंतर उपांत्य सामन्यात त्याने गोलंदाजीत ९ बळी आणि फलंदाजीत ४२ धावा असे अष्टपैलू योगदान दिले. यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक ५५ बळी अकिबच्याच नावे आहेत. त्याआधी त्याने दुलीप स्पर्धेतही छाप पाडली होती. त्यामुळेच डेल स्टेनसारखा धारदार ‘आऊट स्विंग’ चेंडू टाकण्यात सक्षम असलेल्या २९ वर्षीय अकिबकडे भविष्यातील कसोटीपटू म्हणून पाहिले जात आहे.