Jambhul Health Benefits Jamun Seed Powder Diabetes Care: काळसर निळसर जांभळांचा रंग चटकन लक्ष वेधून घेतो. कवितेत जांभूळ हा प्रियकराचा लाडका. यावर्षी पाऊस सुरू झाला तरी जांभळाच्या जांभळाईने बाजार सजला आहे. याच जांभळाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे अनेक जुन्या समजुती पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यातील एक समजूत ही चक्क दुष्काळाशी संबंधित आहे. समजूत काहीही असली तरी जांभळाच्या गुणधर्मामुळे ते दैवी फळ मानले जाते.
इंडियन ब्लॅक बेरी ते जंबुद्वीप
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, मलाया, ऑस्ट्रेलिया या देशांत जांभळाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. सायझिजियम क्युमिनी हे जांभळाचे शास्त्रीय नाव. मिर्टेसी कुलातील या वृक्षाची वाढ जोमाने होते. मोठ्या फळाच्या झाडाला रायजांभूळ म्हणतात. इंग्रजीत जांभळाला जावा प्लम किंवा इंडियन ब्लॅक बेरी म्हणतात. तर हिंदीत हे फळ जामुन किंवा जांबुल, संस्कृतमध्ये जंबूफलम् किंवा महाफळ, तमिळमध्ये नावर पळम आणि तेलुगूमध्ये नेरेडू या नावांनी ओळखले जाते. प्राचीन भारतीय साहित्यात जंबुद्वीप ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.
देवांचे फळ
पौराणिक संदर्भानुसार विश्वाची रचना अनेक द्वीपांत विभागलेली आहे. त्यांपैकी जंबुद्वीप हे मध्यवर्ती आणि महत्त्वाचे द्वीप मानला जातो. हिंदू पुराणांमध्ये जंबुद्वीपाचा संबंध भारतवर्षाशी जोडला आहे. ‘जंबू’ म्हणजे जांभूळ वृक्ष, तर ‘द्वीप’ म्हणजे भूभाग किंवा बेट होय, असे काही अभ्यासक मानतात. बृहत्संहिता, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात व महाभारताच्या आरण्यक पर्वात जम्बुवृक्षाचा उल्लेख आला आहे. रामायणातही जांभळाचा उल्लेख आढळतो. रामाने वनवसाच्या काळात जांभळं मोठ्या प्रमाणात खाल्ली म्हणूनच या फळाचा उल्लेख ‘देवांचे फळ’ म्हणूनही केला जातो.
जांभळाच्या झाडाचं प्रत्येक अंग उपयोगी
जांभळाच्या झाडाचं प्रत्येक अंग उपयोगी असतं. या वनस्पतीच्या खोडाची साल चवीला तुरट असते. जांभळाची साल पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. कृमिनाशक तसेच आतड्यांना बळकटी देते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेह असलेल्या रुग्णांना या फळाचा रस दिला जातो. जांभूळ शरीराला थंडावा देणारे आहे. फळांपासून वाइन आणि सिरकाही तयार केला जातो. सिरका पौष्टिक असून त्यात वायुनाशक गुणधर्म असतो. आयुर्वेदात अतिसाराच्या त्रासावर या वनस्पतीची पाने आणि साल गुणकारी मानली जाते. तसेच बियांचे चूर्ण बहुमूत्रतेच्या समस्येत उपयुक्त ठरते. जांभळाच्या मूत्रल गुणधर्मामुळे मूत्रपिंडांमधील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. जांभळाचा रस शरीरातील स्तंभन आणि संकोच क्रिया सुधारण्यासाठी लाभदायक असल्याचे आयुर्वेदात सांगितले जाते. जांभळाच्या झाडाचे लाकूड पाण्यातही टिकाऊ असते. त्यामुळेच त्याचा वापर बांधकामासाठी केला जातो. जांभळाच्या साली त्यातील टॅनिनामुळे कातडी रंगविण्यास व कमाविण्यास वापरतात.
जांभळाचे गुणधर्म
१. कमी कॅलरीज :
कमी कॅलरीयुक्त आहार घेणाऱ्यांसाठी जांभूळ हा उत्तम पर्याय मानला जातो. त्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे प्रमाण अत्यल्प असते. तसेच त्यात सुक्रोज नसल्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हे फळ आदर्श किंवा अल्पोपहार ठरते. जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाचे सक्रिय घटक असतात. हे घटक रक्तात साखर मिसळण्याचा वेग कमी करतात आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढविण्यास मदत करतात. ते स्टार्चचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात. म्हणूनच वजन कमी करण्यार्या लोकांनाही जांभळाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
२. तंतुमय घटकांनी समृद्ध:
जांभूळ तंतुमय घटकांनी भरपूर समृद्ध असते. हे तंतू दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता, आतड्यांचे विकार, मळमळ, अतिसार आणि आमांश यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत करतात.
३. जीवनसत्त्व क ने परिपूर्ण:
जांभूळ हे जीवनसत्त्व क साठी महत्त्वाचे मानले जाते. जांभळातील जीवनसत्त्व क किंवा अॅस्कॉर्बिक अॅसिडमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म जखमा भरून येण्यास मदत करतात, तसेच दात, हाडे आणि कूर्चा मजबूत करतात. जांभूळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणूनही ओळखले जाते, कारण ते नेहमीचा खोकला, सर्दी, दमा आणि इतर संसर्गजन्य श्वसनविकारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. जीवनसत्त्व क मुळे जांभळाचे नियमित सेवन त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

४. लोह समृद्ध:
जांभळामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते अत्यंत फायदेशीर मानले जाते. रक्तक्षय असलेल्या व्यक्तींना जांभूळ सेवन करण्याची शिफारस केली जाते. जांभळातील मुबलक लोह रक्त शुद्ध करण्यास, लाल रक्तपेशींची संख्या वाढविण्यास आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारण्यास मदत करते. पारंपरिकदृष्ट्या, मासिक पाळीच्या काळात स्त्रिया आणि मुलींनी जांभूळ खावे असे मानले जाते, कारण ते रक्तस्रावामुळे येणारा अशक्तपणा आणि थकवा कमी करून शरीराला सावरण्यास मदत करते.
५. फायटोकेमिकल्स आणि पॉलीफेनॉल्सचा समृद्ध स्रोत:
जांभळामध्ये पॉलीफेनॉलिक संयुगे आणि फ्लॅव्होनॉइड्ससह अनेक जैवसक्रिय फायटोकेमिकल्स मुबलक प्रमाणात आढळतात. संशोधनानुसार जांभळामध्ये कर्करोगविरोधी आणि केमो-प्रतिबंधक गुणधर्म आढळतात. तसेच कर्करोग, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित विकारांच्या उपचारांमध्ये ते उपयुक्त ठरू शकते.
६. मुखस्वच्छता:
जांभळाची वाळवलेली आणि पूड केलेली पाने जंतूंनाशक गुणधर्मांनी युक्त असतात. दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी त्यांचा दंतमंजन म्हणून उपयोग केला जातो. जांभळाचे फळ आणि पाने तीव्र तुरट गुणधर्म असलेली असल्यामुळे घशाच्या समस्यांवर आणि तोंडाच्या दुर्गंधीवर ती प्रभावी मानली जातात. जांभळाच्या सालीचा काढा माउथवॉश म्हणून वापरता येतो किंवा त्याने नियमित गुळण्या केल्यास तोंडातील जखमा आणि हिरड्यांची सूज टाळण्यास मदत होते.
७. तेजस्वी त्वचा:
- जांभळाचा रस नियमित प्यायल्याने त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास आणि रक्तशुद्धी करण्यास रसाची मदत होते, त्यामुळे त्वचेवर आतून नैसर्गिक तेज जाणवू लागते. त्यातील जीवनसत्त्व क त्वचा डागविरहित आणि उजळ ठेवण्यास उपयुक्त ठरते.
- वाळवलेल्या जांभळाच्या बियांची पूड मधात मिसळून चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावावी आणि रात्रभर ठेवावी. हा उपाय महिनाभर नियमित केल्यास मुरूम, काळे डाग आणि त्वचेवरील वर्णद्रव्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
- चेहरा स्वच्छ केल्यानंतर ताजा जांभळाचा रस चेहऱ्यावर लावावा. जांभूळ हे नैसर्गिक तुरट गुणधर्म असलेले असल्यामुळे टोनरप्रमाणे कार्य करते. ते त्वचेची रोमछिद्रे कमी करण्यास आणि अतिरिक्त तेलस्राव नियंत्रित करण्यास मदत करते.
- तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी ठेचलेले जांभूळ, दही आणि गुलाबपाणी मिसळून फेसपॅक म्हणून लावावे. नियमित वापर केल्यास मुरुमांमध्ये लक्षणीय घट दिसून येऊ शकते.
प्राचीन जंबुद्वीपाच्या समृद्ध इतिहासापासून ते आजच्या आधुनिक जीवनशैलीतील आरोग्याच्या गरजांपर्यंत, जांभळाचे महत्त्व अबाधित राहिले आहे. या गुणकारी आणि बहुउपयोगी फळाचा योग्य वापर करून आपण आपले आरोग्य अधिक सतेज, निरोगी आणि दीर्घायुषी करू शकतो.
