–डॉ. देवदत्त पोखरकर
यंदाचा उन्हाळा अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे चांगलाच लक्षात राहील; पण आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे जांभळांच्या झाडांना लगडलेली फळे आणि त्यांचा खाली पडलेला भरघोस सडा…शहर असो किंवा गाव, रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या जांभळाच्या वृक्षांपासून ते शेतांच्या बांधावरील जुन्या झाडांपर्यंत सर्वत्र फळांचा अक्षरशः वर्षाव झालेला दिसतो. घरातील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात की, गेल्या कित्येक वर्षात त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जांभळे कधी पाहिली नव्हती. बाजारपेठेत जांभळांची रेलचेल आहे, तर झाडांखाली पडलेल्या फळांचे जणू गालिचेच तयार झाले आहेत.
अशा वेळी आपल्या लोकसंस्कृतीतून आलेली एक जुनी समजूत पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असे मानले जाते की, ज्या वर्षी जांभळे भरपूर प्रमाणात येतात, त्या वर्षी पाऊस कमी पडतो किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही समजूत अंधश्रद्धा म्हणून नाकारावी का, की तिच्यामागे काही अनुभवजन्य निरीक्षण दडलेले आहे? हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो.
भारतीय ग्रामीण संस्कृती आणि निसर्ग
भारतीय ग्रामीण संस्कृतीचा गाभा नेहमीच निसर्गाशी एकरूप राहिला आहे. हजारो वर्षांपासून इथल्या शेतकऱ्याने निसर्गाशी थेट संवाद साधत आपले जीवन घडवले. आजच्यासारखे हवामान विभाग, उपग्रह किंवा संगणकाचे कृत्रिम अंदाज नसतानाही, तो केवळ आकाश, बदलणारे वारे, पक्षी-कीटकांची हालचाल आणि वनस्पतींचे वर्तन पाहून येणाऱ्या ऋतूंची अचूक पावले ओळखत असे. ही निरीक्षणे जरी कोणत्याही आधुनिक प्रयोगशाळेत सिद्ध झालेली नसली, तरी ती पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाच्या भक्कम कसोटीवर घासून तावून निघालेली आहेत. जांभळाला येणारा भरघोस बहर पाहून पावसाचा अंदाज बांधण्याचा लोकसमजही, याच समृद्ध आणि पारंपरिक निरीक्षणाचा एक भाग आहे.
आधुनिक विज्ञान काय सांगते?
मात्र आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्याही एका नैसर्गिक घटनेचा सरळ आणि निश्चित संबंध दुष्काळाशी जोडणे योग्य ठरत नाही. एखाद्या वर्षी जांभळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे अनेक घटक एकाच वेळी कार्यरत असतात. मागील वर्षातील पर्जन्यमान, जमिनीतील ओलावा, तापमानातील बदल, फुलोऱ्याच्या काळातील हवामान, परागीभवनासाठी पोषक परिस्थिती, रोग-किडींचे प्रमाण आणि झाडांचे वय या सर्व बाबी त्यावर प्रभाव टाकतात.
जांभूळ सहनशील वृक्ष
जांभूळ हा तुलनेने सहनशील वृक्ष मानला जातो. उष्णता, कोरडे वातावरण आणि विविध प्रकारच्या जमिनींमध्ये ते चांगले वाढते. त्याची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने इतर अनेक वृक्षांच्या तुलनेत हे झाड पाण्याची कमतरता अधिक काळ सहन करू शकते. मात्र, एखाद्या वर्षी कमी पाऊस पडणार म्हणूनच हे झाड हमखास भरघोस फळधारणा करेल, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
झाडांच्या आरोग्यपूर्ण जीवनचक्राचा भाग
वनस्पतीशास्त्रात अनेक वृक्षांमध्ये विशिष्ट कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात फुले व फळे येण्याची प्रवृत्ती आढळते. काही वर्षे मध्यम किंवा कमी उत्पादन झाल्यानंतर एखाद्या हंगामात अचानक मोठा बहर दिसून येतो. ही प्रक्रिया वृक्षांच्या जैविक चक्राचा भाग असते. त्यामागे ऊर्जा साठवण, हवामानातील अनुकूलता आणि पुनरुत्पादनाची नैसर्गिक रणनीती अशा अनेक कारणांचा सहभाग असतो. त्यामुळे एखाद्या वर्षी झालेली भरघोस फळधारणा ही केवळ संकटाची सूचना नसून झाडांच्या आरोग्यपूर्ण जीवनचक्राचाही भाग असू शकते.
लोकज्ञान आणि विज्ञान यांचा संवाद होणे महत्त्वाचे
परंतु, लोकपरंपरेतील निरीक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. कारण अनेकदा निसर्गातील सूक्ष्म बदल माणसापेक्षा वनस्पती आणि प्राणी अधिक संवेदनशीलरित्या अनुभवत असतात. वातावरणातील आर्द्रता, तापमानातील बदल, जमिनीतील ओलावा आणि ऋतुचक्रातील सूक्ष्म हालचाली यांचा परिणाम त्यांच्या वाढीवर आणि वर्तनावर दिसून येतो. त्यामुळे अशा घटनांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. लोकज्ञान आणि विज्ञान यांचा संघर्ष नसून संवाद होणे अधिक महत्त्वाचे आहे.
हवामान बदल गंभीर समस्या
आजच्या काळात हवामान बदल हा जगासमोरील सर्वात गंभीर प्रश्न ठरला आहे. तापमानवाढ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी आणि दीर्घकालीन कोरडे कालखंड यांचा परिणाम कृषी आणि पर्यावरणावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत निसर्गातील प्रत्येक बदलाकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. जांभळांचा भरघोस हंगाम असो किंवा इतर कोणतीही नैसर्गिक घटना, त्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यातून पर्यावरणीय बदलांचे संकेत शोधणे आवश्यक ठरते.
पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक
जांभळाचे झाड आपल्या संस्कृतीत आणि पर्यावरणात विशेष स्थान राखून आहे. त्याची फळे पौष्टिक आहेत, सावली दाट असते आणि जैवविविधतेलाही त्याचा मोठा आधार मिळतो. अनेक पक्षी, प्राणी आणि कीटक यांचे जीवन या वृक्षाभोवती गुंफलेले असते. त्यामुळे जांभळांच्या विपुल उत्पादनाकडे केवळ आर्थिक किंवा कृषी दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही पाहणे आवश्यक ठरते.
जमीन आणि पर्यावरण यांचे शाश्वत व्यवस्थापन प्रश्न
आज आपल्यासमोरचा खरा प्रश्न जांभळे जास्त आली की कमी, हा नाही. खरा प्रश्न आहे तो पाणी, जमीन आणि पर्यावरण यांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याचा. दुष्काळ येवो किंवा भरपूर पाऊस पडो, जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकपूर्ण वापर ही काळाची गरज आहे. निसर्ग आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतो. त्या संकेतांचे आकलन करण्यासाठी अनुभव आणि विज्ञान या दोन्हींची साथ आवश्यक असते.
समाजाची जबाबदारी नेमकी काय?
यंदाच्या जांभळांच्या बहराकडे पाहताना म्हणूनच दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पहिली म्हणजे आपल्या पूर्वजांचे निसर्गाविषयीचे निरीक्षण हा अनमोल वारसा आहे आणि दुसरी म्हणजे त्या निरीक्षणांची शास्त्रीय पडताळणी करून त्यातून अधिक व्यापक समज विकसित करणे ही आधुनिक समाजाची जबाबदारी आहे.
संदर्भ:
Singh, A. K., Bajpai, A., Rajan, S., Das, S. S., & Mishra, K. K. (2021). Modified BBCH codification and correlation of phenological characteristics with climatic variables in jamun (Syzygium cuminii Skeels). Scientia Horticulturae, 281, 109994.
Ramaswami, G., Datta, A., Reddy, A., & Quader, S. (2019). Tracking phenology in the tropics and in India: The impacts of climate change. In Impacts of Climate Change on Biodiversity.
