चित्रपटाची कथा काय?
‘जन नायगन’ सिनेमात राजकारणाविषयीची कथा आहे. नायक थलपती विजय हा सिनेमात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताना दिसतो. तमिळनाडूतील भ्रष्टाचाराला वाचा फोडत तो गरिबांचा मसीहा होतो. सिनेमात पुढे तो राज्याचा मुख्यमंत्रीही होतो. थलपती विजय प्रत्यक्ष जीवनात या सिनेमाकडे आपल्या राजकारण पदार्पणाच्या दृष्टीने पाहत आहे. जन नायगन हा आपला शेवटचा सिनेमा असल्याचे त्याने जाहीरही केले आहे. त्यांचा पक्ष ‘तमिलगा वेत्री कडगम’ अर्थात ‘टीव्हीके’ सातत्याने राज्यातील डीएमके सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. ‘जन नायगन’चा विषयही भ्रष्टाचार हा असणे हा निश्चितच योगायोग नाही.
सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे काय?
‘जन नायगन’चे निर्माते- केव्हीएन प्रोडक्शनने १८ डिसेंबर २०२५ रोजी सिनेमा प्रदर्शनपूर्व परवानगीसाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला. सेन्सॉर बोर्डाने यात २७ कट सुचवले. निर्मात्यांनी ते सर्व बदल करून पुन्हा सिनेमा बोर्डाकडे पाठवला. मग बोर्डाने सांगितले की या सिनेमाला यूए १६ प्लस प्रमाणपत्र मिळेल. पण पुन्हा ५ जानेवारीला बोर्डाने सांगितले की एका सदस्याने चित्रपटावर आक्षेप नोंदवल्याने सिनेमा आणखी एका समितीकडे जाईल. काही दृश्ये लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा आक्षेप या सदस्याने घेतला. सिनेमात लष्कराची प्रतिमा व्यवस्थित दाखवली न गेल्याचाही आक्षेप घेतला गेला. परिणामी निर्माते या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने ९ जानेवारीला सिनेमाच्या बाजूने निकाल दिला. पण सेन्सॉर बोर्डाने त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी घेतले, ही सुनावणी २१ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, सिनेमाच्या निर्मात्यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
भाजपवर टीका भोवली?
थलपती विजयने २०२४ मध्ये ‘टीव्हीके’ची स्थापना केली. हा पक्ष तमिळनाडूतील सत्ताधारी डीएमके आणि केंद्रातील भाजपवर सतत टीका करत आहे. शिवाय, या सिनेमात थलपती याची प्रतिमा उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात तमिळनाडूत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम सिनेमाच्या प्रदर्शनावर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘रेड जायंट कंपनीशी’देखील हा वाद जोडण्यात येत आहे. विजय यांनी ‘रेड जायंट कंपनी’ला वगळून अन्य चार वितरकांद्वारे सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.
राजकारणावर प्रभाव पाडण्याची क्षमता किती?
तमिळनाडूचे राजकारण अगदी पूर्वीपासून जातीभेद, तमिळ अस्मिता, महिला आणि दलितांना समान अधिकार, धार्मिक अंधश्रद्धांना खतपाणी न घालता विवेकी विचारांना प्रोत्साहन देणे या मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरत आले आहे. तेथे १९१६ मध्ये ब्राह्मणविरोधी आंदोलनाची पहिली ठिणगी जस्टीस पार्टी या पक्षाच्या रूपाने पडली. तो ब्राह्मणेतरांचे नेतृत्व करणारा पहिला पक्ष ठरला. आज देशातील सर्वाधिक ६९ टक्के आरक्षण तमिळनाडूत आहे, त्याची पाळेमुळे या पक्षाच्या त्या वेळच्या आंदोलनात आहेत. जस्टीस पक्षाच्या आंदोलनाला पुढे ई. व्ही. रामस्वामी ऊर्फ पेरियार यांनी द्रविडी अस्मितेचा चेहरा दिला. पण हा पक्ष कधी निवडणूक लढला नाही. ती आकांक्षा अण्णादुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कडघम (डीएमके)मधून पूर्ण केली. द्रविडी विचारधारेला लेखणीतून उतरवणारे करुणानिधीही अण्णादुराईंशी जोडले गेले.
करुणानिधी यांनी लिहिलेला सिनेमा ‘पराशक्ति’ १९५२ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाद्वारे त्यांनी द्रविडी विचारधारा घराघरांत पोहोचवली होती. सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हे देखील डीएमकेचा चेहरा झाले. डीएमकेने काँग्रेसला तमिळनाडूतून हद्दपार केले. पुढे एमजीआर यांनी एआयएडीएमके पक्ष स्थापन केला. गेली ५० वर्षे तमिळनाडूची सत्ता याच दोन पक्षांभोवती फिरत आहे. हे इतके विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे सिनेमांच्या माध्यमातून राजकारण आणि विचारधारेचा प्रसार करण्याचे हे मॉडेल तमिळनाडूच्या राजकारणात भक्कम रुजले आहे. त्यामुळे तेथे कोणत्याही सिनेमाला वा त्याद्वारे होणाऱ्या प्रचार, प्रसाराला गांभीर्यानेच घेतले जाते.
