Delhi Protests History : एखादं आंदोलन किती मोठं आहे हे त्यात सहभागी झालेल्या लोकांच्या संख्येवर ठरतं की, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर? दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांच्या विधानामुळे हा प्रश्न चर्चेत आला आहे. आंदोलनावर टीका करताना पात्रा यांनी जंतरमंतरच्या क्षेत्रफळाची तुलना संपूर्ण भारताच्या आकाराशी केली आहे.
संबित पात्रा म्हणाले की, ‘जंतरमंतरचं क्षेत्रफळ साधारण चार चौरस किलोमीटर आहे, तर भारताचं क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमीटर आहे, त्यामुळे भारताची कहाणी ही जंतरमंतरची कहाणी असू शकत नाही.’ जंतरमंतरवरील आंदोलन अपयशी ठरल्याचे नमूद करत पात्रांनी आंदोलक तरुण आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘अराजकतावादी’ म्हटले आहे.
इंडियन एक्स्प्रेसचे सहाय्यक संपादक आकाश जोशी लिहितात की, संबित पात्रा यांच्या विधानातून नकळत काही महत्त्वाचे प्रश्नही समोर आले आहेत. दिल्लीतील आंदोलनं सत्तेच्या केंद्राजवळ होत असल्याने त्यांना अधिक महत्त्व मिळतं का? राजधानीत माध्यमांची उपस्थिती मोठी असल्याने काही आंदोलनांना गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळते का? की रस्त्यावर उतरलेले हजारो लोक समाजात धुमसत असलेला असंतोष मांडत असतात? आंदोलनातून दिल्या जाणाऱ्या घोषणा म्हणजे केवळ विरोध दर्शवणं नसतं; सरकारने मागण्यांची दखल घ्यावी, जबाबदारी निश्चित करून आवश्यक बदल करावेत, त्यामुळे आंदोलनाकडे पाहताना गर्दी किती होती, यापलीकडे हे प्रश्न भारतीय लोकशाहीच्या व्यापक कार्यपद्धतीवर थेट प्रकाश टाकतात.
आंदोलनाची परंपरा
आकाश जोशी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर नवी दिल्लीत एका नव्या आणि तरुण लोकशाहीची धुरा सांभाळणाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला, जो आजही कायम आहे. आतापर्यंतच्या लोकनियुक्त सरकारांना आंदोलक आणि विरोधक यांची नेमकी भूमिका काय आहे, हे समजू शकलेले नाही. असे असले तरी ५० आणि ६० च्या दशकात आंदोलने सुरूच राहिली; मार्क्सवादी पक्षांनी शेतकरी आणि कामगारांच्या वतीने आंदोलनांचे नेतृत्व केले, तर सोशलिस्ट (समाजवादी) आणि गांधीवादीही यात सहभागी झाले. परंतु, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील आंदोलनाने संपूर्ण देशाला चकित केले.
बिहारमधील विद्यार्थी आंदोलनाच्या स्वरूपात जेपी आंदोलनाची सुरुवात झाली. पुढे ‘संपूर्ण क्रांती’ची हाक दिल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप आलं. जनसंघातील प्रमुख नेत्यांसह पुढे जनता पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक नेते दिल्लीतील रामलीला मैदानावर जमले. त्याचवेळी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. त्या काळातही आंदोलकांवर ‘देशाचे शत्रू’ आणि ‘अराजकता माजवणारे’ म्हणून टीका करण्यात आली होती.
आकाश जोशी पुढे नमूद करतात, या आंदोलनाने काँग्रेसच्या दीर्घकाळच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान दिले आणि देशाच्या राजकारणात नव्या नेत्यांसाठी संधी निर्माण केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक नेत्यांच्या राजकीय जडणघडणीत या आंदोलनाचा महत्त्वाचा वाटा राहिला. आंदोलनाची सुरुवात बिहारमध्ये झाली, पण त्याचा निर्णायक टप्पा दिल्लीत गाठला गेला. यामागे केवळ राजधानीचं भौगोलिक महत्त्व नव्हतं; सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचून आपली मागणी मांडण्याला प्रतीकात्मक महत्त्वही होतं. राज्याच्या पातळीवर सुरू झालेलं आंदोलन दिल्लीत पोहोचतं, तेव्हा त्याला राजकीय वजन मिळतं; त्यातून राष्ट्रीय राजकारणाची दिशाही बदलू शकते.
आकाश जोशींनी आंदोलनांचे पुढील चित्र स्पष्ट करताना म्हटले की, आणीबाणीनंतर आंदोलनांचं स्वरूप बदललं, पण आंदोलनांची परंपरा कायम राहिली. दिल्लीतील राजपथ (आताचा कर्तव्यपथ) आणि बोट क्लब परिसरात झालेल्या मोठ्या सभांमधून जननेत्यांनी शक्तिप्रदर्शन केले. १९७८ मध्ये चरण सिंह यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात लाखो लोक सत्ताकेंद्राजवळ जमले होते. या आंदोलनामुळे जनता सरकारमधील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीही उघड झाली. यानंतर १९८८ मध्ये शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांनी बोट क्लब परिसरात जवळपास आठवडाभर आंदोलन केलं. पिकांना योग्य भाव मिळावा, तसेच शेतीसाठी वीज आणि पाण्यावर अनुदान द्यावं, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. शेतकरी ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह संसद आणि राष्ट्रपती भवनापासून काहीच मीटर अंतरावर होते, यावरून आंदोलनाचं स्वरूप किती व्यापक होतं याची कल्पना येते.
१९९० च्या दशकातील आंदोलन
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला आंदोलनांनी पुन्हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात दिल्लीसह देशभरातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची पोलिसांशी झटापट झाली, तर काहींनी आत्मदहनासारखी टोकाची पावलं उचलली. याच काळात राम मंदिर आंदोलनालाही दिल्लीत महत्त्वाचं व्यासपीठ मिळालं. लालकृष्ण अडवाणींच्या ‘मंदिर वहीं बनाएंगे’ च्या घोषणेमुळे हिंदुत्वाच्या राजकारणाला व्यापक स्वरूप मिळाले. आज दिसणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकीय प्रवाहाची काही सूत्रं याच आंदोलनाच्या काळात आकारास आली.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात महेंद्रसिंह टिकैत यांचे शेतकरी आंदोलन आणि राम मंदिर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोट क्लबऐवजी जंतरमंतर हे आंदोलनांचं प्रमुख केंद्र बनलं. संसद मार्गावरील या छोट्याशा जागेत देशातील विविध संघटना, पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज उठवण्याची संधी मिळाली. जमिनी गमावलेल्या नागरिकांना न्याय मिळावा, गुन्ह्यांतील दोषींवर कारवाई व्हावी, प्राणीहक्कांचं संरक्षण व्हावं, अशा विविध मागण्यांसाठी इथे आंदोलनं होत असत.
जंतरमंतरचं असीमित महत्त्व
देशभरातील वेगवेगळ्या प्रश्नांना जंतरमंतरवर व्यासपीठ मिळालं. भ्रष्टाचाराविरोधातील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची सुरुवातही इथेच झाली. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर जागा अपुरी पडू लागली आणि ते रामलीला मैदानावर हलवण्यात आलं. या आंदोलनाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
शेतकरी, विद्यार्थी, हिंदुत्ववादी संघटना किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी अनेकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. दिल्लीतील या सर्व आंदोलनांमागे केवळ गोंधळ आणि अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता का? सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील असंतोष सत्तेसमोर मांडण्याचा अधिकार नाही का? सत्ताधारी आणि सामान्य नागरिक यांच्यात उभे प्रत्यक्ष बॅरिकेड्स रुपी अडथळे असोत किंवा सत्तेचं प्रतीक असोत ते पार करून आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही का?
पोलिसांनी आखलेल्या सीमारेषेच्या कोणत्या बाजूला उभे आहात, यातूनच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. आंदोलनकर्त्यांच्या बाजूने उभे असलेल्यांना न्यायासाठीचा संघर्ष दिसू शकतो, तर दुसऱ्या बाजूला असलेल्यांना अनेकदा तो अडथळा वाटू शकतो, असेही आकाश जोशी अधोरेखित करतात. मात्र, दिल्लीच्या इतिहासातून एक गोष्ट स्पष्ट होते, राजधानीतल्या आंदोलनांचा प्रभाव जंतरमंतरसारख्या काही चौरस किलोमीटर क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. या छोट्याशा जागेवर उठवलेला आवाज देशाच्या राजकारणावर, सरकारच्या निर्णयांवर आणि लोकशाहीतील नागरिकांच्या भूमिकेवर दूरगामी परिणाम करू शकतो.
