जपानी नागरिकांचे मार्जारप्रेम कित्येक वर्षांपासून त्यांच्या संस्कृतीत खोलवर रुजले आहे. लहान घरे असल्याने तुलनेने मांजर हा पाळीव प्राणी पाळणे सोपे आणि सोयीचे असल्यामुळे तेथे घराघरांमध्ये मांजरी सर्रास आढळतात. पण ही मांजर हळूहळू जपानच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचली आहे. मांजर आणि या पाळीव प्राण्याशी संबंधित इतर अनेक उद्योग, पर्यटन मिळून सुमारे १९ अब्ज डॉलरच्या उद्योगाचा डोलारा जपानने उभा केला आहे.
मांजरांचा संस्कृती, अर्थव्यवस्थेवर प्रभाव
जपानमध्ये मांजरांना ‘मनेकी-नेको’ म्हणून ओळखले जाते. मांजराचा एक पंजा वर केलेला पुतळा दुकाने आणि घरांमध्ये ठेवला जातो, जो संपत्ती, यश आणि चांगले नशीब घेऊन येतो अशी लोकांची श्रद्धा आहे. जपानी भाषेत मांजरीला नेको म्हणतात. या नेकोच्या भोवती जपानचे अर्थकारण फिरते. तेथे त्याला ‘नेकोनॉमिक्स’ ही संज्ञा वापरली जाते. मांजर पालन, मांजराच्या संकल्पनेवर साकारलेल्या वस्तू, छापील साहित्य, पर्यटन आणि अशाच अनेक व्यवसायांमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा या नेकोनॉमिक्सने व्यापला आहे.
२०२६ मध्ये हा मार्जार उद्योग जपानच्या अर्थव्यवस्थेत जवळपास ३ ट्रिलियन जपानी येनचा (सुमारे १८,०३४ कोटी रुपये) इतके योगदान देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा `कॅटनॉमिक्सʼ अंदाज कात्सुहिरो मियामोटो यांनी काढला, त्यांनी मांजर कॅफे, फोटो पुस्तके, पाळीव प्राण्यांचे अन्न उत्पादित करणाऱ्या कंपन्या, वस्तू विक्री आणि संबंधित उद्योगांमधील खर्चाचे विश्लेषण केले. त्यांच्या अहवालानुसार, जपानमधील मांजरांचा आर्थिक प्रभाव आता २०२५ मधील ओसाका वर्ल्ड एक्स्पोच्या प्रमाणाच्या जवळ पोहोचतो.
जपानमध्ये मांजरे आहेत तरी किती?
जपान पेट फूड असोसिएशननुसार, २०२५ मध्ये जपानी घरांमध्ये सुमारे ८८ लाख मांजरे आणि सुमारे ६८ लाख कुत्रे होते. आता देशात १५ वर्षांखालील मुलांपेक्षा अधिक पाळीव प्राणी आहेत, असा अहवाल द गार्डियनने दिला आहे.
पाळीव मांजरांवर सरासरी खर्च किती होतो?
एक सरासरी मालक मांजराच्या आयुष्यात सुमारे १.८ दशलक्ष येन म्हणजेच सुमारे १० लाख ७७ हजार रुपये खर्च करतो. मांजरांचे उत्तम खाद्य, राहण्याच्या सुखसोयी, खेळणी, आवश्यक पशुवैद्यकीय सेवेचा यात समावेश आहे.
पर्यटनावर मांजरांचा प्रभाव किती?
टोकियोच्या काही भागांमध्ये मांजरांचा विशेष प्रभाव दिसून येतो. तेथे संपूर्ण परिसराची ओळख मांजर संस्कृतीभोवती तयार झाली आहे. येथील एका ऐतिहासिक परिसराला कॅट टाऊन म्हटले जाते. येथे मांजराच्या आकारातील मिठाई, कस्टम हांको शिक्के, पोर्सेलिन मूर्ती, चॉपस्टिक्स, पोस्टकार्ड आणि थीम असलेली स्मृतिचिन्हे विकणारी भरपूर दुकाने आहेत. जगभरातील पर्यटक या दुकानांना भेट देतात. स्थानिक दुकानदार सांगतात की या भागातील अनेक बौद्ध मंदिरांनी पूर्वीपासून भटक्या मांजरांना आकर्षित केले. त्यामुळे काळानुसार येथील भागाचे मांजरांशी नाते तयार झाले. येथे एकेकाळी मांजरे मोकळेपणाने बाहेर फिरत होती. पण आता तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक पाळीव मांजरे घरात आसरा घेतात किंवा लोक ती पाळतात.
पॉप कल्चर, साहित्यावरही प्रभाव
‘हेलो किटी’, ‘डोरेमॉन’ आणि ‘मनेकी-नेको’सारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध पात्रांमुळे मांजरांना जपानी माध्यमांमध्ये कायमच मजबूत स्थान आहे. मांजरे जपानी साहित्यातही मार्केटिंगचे साधन बनली आहेत. साहित्यावरील मांजरांचा प्रभाव सुमारे शतकभरापूर्वीपासून आहे. आय अम क कॅट जी एका पाळीव मांजरावर लिहिलेली कांदबरी खूप प्रसिद्ध आहे. आजरी हारुकी मुराकामी यांच्या लेखनात तसेच द ट्रॅव्हलिंग कॅट क्रोनिकल्स आणि द गेस्ट कॅट यासारख्या पुस्तकांवरून मांजरांचा साहित्यविश्वातील संचार जाणवतो. पुस्तक कोणतेही असतो, त्याच्या मुखपृष्ठांवर मांजरांची प्रतिमा वापरण्याकडे प्रकाशकांचा कल असतो, याला मार्केटिंग फंडाही म्हणतात.
मांजर पर्यटनाचे अर्थव्यवस्थेत योगदान किती?
जपानमध्ये ‘कॅट कॅफे’ ची संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. कामाच्या ताणामुळे थकलेले लोक तिथे जाऊन मांजरांसोबत वेळ घालवतात. मांजर जवळ आल्याने व तिच्या सहवासामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो, असा जपानी लोकांचा अनुभव आहे. देशात २४ प्रसिद्ध ‘कॅट आयलंड्स’ आहेत. तेथे मांजरांच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी पर्यटक मुद्दाम जातात. ग्रामीण रेल्वे मार्गांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी देखील जपानमध्ये मांजरांचा वापर करण्यात आला. अनेक स्थानकांवर अधिकृत दर्जा दिलेली स्टेशन मास्तर मांजरे आहेत. उदारहणार्थ, किशी स्टेशनवर तामा नावाचे प्रसिद्ध मांजर आहे, या एकट्या मांजराने स्थानिक पर्यटनात १.१ अब्ज येनपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले.
जपान श्वानप्रेमाकडून मार्जारप्रेमाकडे
जपान हा देश खरे तर परंपरेने श्वानप्रेमी होता. पण हळूहळू मांजर-केंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळला. जपानमध्ये या बदलास तेथील सामाजिक परिवर्तनही कारणीभूत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तेथील घरे अधिकाधिक लहान होत गेली. शिवाय जपानमधील नागरिकांचे सरासरी आयुर्मानही वाढलेले आहे, त्यामुळे तो देश आता वृद्धांचा देश बनला आहे.
कमी जागा असेल तर तिची देखभाल नीट करता येते हा तेथील स्वच्छताप्रेमी, टापटिपीला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांचा होरा असतो. लोक राहतात, तेथील अपार्टमेंटचे कडक नियम आणि कमी जागेमुळे शांत आणि कमी देखभालीची मांजरे ही कुत्र्यांपेक्षा अधिक सोयीची ठरतात. त्यामुळे नागरिक मांजरांना अधिक प्राधान्य देऊ लागले.
जलद गतीने वृद्ध होत असलेली लोकसंख्या आणि कमी जन्मदरामुळे लाखो जपानी नागरिक एकटे राहतात. मांजरे त्यांना मानसिक आधार आणि भावनिक दिलासा देतात. लोकांना कामासाठी खूप वेळ घराबाहेर राहावे लागते. मांजरांना कुत्र्यांप्रमाणे सतत बाहेर फिरायला नेण्याची गरज नसते. ते वृद्धांना तसेच कार्यालयात अधिक वेळ जाणाऱ्यांनाही सोयीचे जाते. शिवाय मांजरे खूप शांत आणि कमी जागेत आनंदी राहणारी असतात.
manisha.devne@expressindia.com
