Japan Megaquake जपान असा देश आहे की, जिथे कायमच भूकंपाचे धक्के बसत असतात. गुरुवारी (८ ऑगस्ट) पुन्हा एकदा देश भूकंपाच्या झटक्याने हादरला. दक्षिण जपानला ७.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर आता जपानच्या हवामान संस्थेने पहिल्यांदाच महाभूकंपाचा इशारा दिला आहे आणि 'मेगाक्वेक ॲडव्हायजरी' जारी केली आहे. या सावधगिरीच्या इशाऱ्यात असे म्हटले आहे की, जपानच्या नैर्ऋत्य पॅसिफिक किनारपट्टीवर नानकाई ट्रफ, सबडक्शन झोनमध्ये जोरदार हादरे आणि मोठ्या त्सुनामीची शक्यता सामान्यतेपेक्षा जास्त आहे. (हे असे क्षेत्र आहे जिथे टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि जड प्लेट दुसर्या प्लेटच्या खाली सरकू शकते.) परंतु, यात असेही नमूद करण्यात आले आहे की, याचा अर्थ असा नाही की, विशिष्ट कालावधीतच मोठा भूकंप निश्चितपणे होईल. नेमका या सर्व घडामोडींचा अर्थ काय? खरंच महाभूकंप येणार का? 'मेगाक्वेक ॲडव्हायजरी' म्हणजे काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. 'नानकाई ट्रफ' म्हणजे काय? नानकाई ट्रफ हा पाण्याखालील सबडक्शन झोन आहे, जो जवळपास ९०० किलोमीटर लांब आहे. या क्षेत्रात युरेशियन प्लेट फिलिपिन्स सी प्लेटला आदळते आणि नंतर या प्लेट्स जागा बदलून एकमेकांच्या वर-खाली होतात. यातून टेक्टोनिक ताण जमा होतो आणि त्यामुळे महाभूकंपाची शक्यता निर्माण होते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार यादरम्यान बसणार्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता आठ रिस्टरपेक्षा अधिक असते आणि तीव्रतेच्या भूकंपांचा अर्थ महाविनाश असू शकतो. 'नेचर जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या २०२३ च्या ‘हाय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसिव्ह ऑकरन्स ऑफ नानकाई मेगाथ्रस्ट अर्थक्वेक' या अभ्यासानुसार साधारणपणे दर १०० ते १५० वर्षांनी नानकाई ट्रफमध्ये महाभूकंप झाला आहे. दक्षिण जपानला ७.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : ‘या’ देशात उष्णतेच्या लाटेमुळे रक्ताचा भीषण तुटवडा, तज्ज्ञांनी दिला संकटाचा इशारा; कारण काय? हे हादरे सहसा जोड्यांमध्ये येतात म्हणजेच एका भूकंपानंतर दूसरा भूकंप येण्याला जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. १९४४ व १९४६ मध्ये बसलेले भूकंपाचे धक्के याच द्विभूकंपाचे उदाहरण आहे. या दोन्ही भूकंपांनी जपानमध्ये महाविनाशाची परिस्थिती निर्माण केली होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, नानकाई ट्रफवर किंवा त्याच्या जवळपास गुरुवारी ७.१ रिस्टर तीव्रतेचा भूकंप झाला. परिणामी, तज्ज्ञांना भीती आहे की, या क्षेत्राच्या आजूबाजूने होणारा पुढील भूकंप विनाशकारी असू शकतो. 'नानकाई ट्रफ' क्षेत्रात पुढील महाभूकंप कधी होऊ शकतो? जानेवारी २०२२ मध्ये जपानच्या भूकंप संशोधन समितीने सांगितले की, पुढील ३० वर्षांमध्ये आठ ते नऊ रिस्टर तीव्रतेचा महाभूकंप होण्याची शक्यता अंदाजे ७० टक्के आहे. 'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, अशा महाभूकंपामुळे टोकियोपासून सुमारे १५० किलोमीटर दक्षिणेस आणि मध्य शिझुओकापासून दक्षिण-पश्चिम मियाझाकीपर्यंतच्या भागात हादरे बसू शकतात. भूकंपानंतर काही मिनिटांतच त्सुनामीच्या लाटा ९८ फुटांपर्यंत जपानच्या पॅसिफिक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतात. नानकाई ट्रफमधील मोठ्या भूकंपाचा परिणाम जपानच्या एक-तृतीयांश भागावर होऊ शकतो. या भागात १२ कोटींहून अधिक लोक राहतात. (छायाचित्र-रॉयटर्स) २०१३ च्या सरकारी अहवालात असे आढळून आले आहे की, नानकाई ट्रफमधील मोठ्या भूकंपाचा परिणाम जपानच्या एक-तृतीयांश भागावर होऊ शकतो. या भागात १२ कोटींहून अधिक लोक राहतात. ही देशाची अर्धी लोकसंख्या आहे, असे निक्केई एशिया मासिकाच्या अहवालात म्हटले आहे. आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान १.५० ट्रिलियन डॉलर्स किंवा जपानच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या एक-तृतीयांशपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. हेही वाचा : ‘या’ देशात गुन्हेगारांची संख्या शून्यावर; तुरुंगातील कर्मचार्यांवर बेरोजगारीचे संकट; काय आहे कारण? खरेच भूकंपाचा अंदाज बांधता येतो का? भूकंपाचा अचूक अंदाज बांधता येणे कठीण आहे. भूकंपाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी पृथ्वीच्या आतून एक पूर्वसूचक सूचना मिळणे आवश्यक असते. हा एक मोठा भूकंप येणार असल्याची पूर्वसूचना असते, असेही म्हणता येईल. परंतु, पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक लहान-मोठ्या हालचाली सुरू असताता की, मोठ्या भूकंपाची सूचना लक्षात घेणे अवघड होऊ शकते. सध्या अशा पूर्ववर्ती सूचना जाणून घेण्यासाठी कोणतीही उपकरणे नाहीत. टोकियो विद्यापीठातील भूकंपशास्त्राचे प्रोफेसर रॉबर्ट गेलर यांनी 'बीबीसी'ला सांगितले की, जपानच्या हवामानशास्त्र यंत्रणेने गुरुवारी जारी केलेले 'मेगाक्वेक ॲडव्हायजरी' म्हणजे केवळ एक सावधगिरीचा इशारा होता; ज्याचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही. या 'मेगाक्वेक ॲडव्हायजरी'मध्ये रहिवाशांना अशा परिस्थितीसाठी तयार राहण्यास, यातून मार्ग काढण्यासाठी उपाय सुचवण्यास आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार करण्यास सांगितले आहे.