Fujisawa Mosque Controversy जपानच्या किनारपट्टीवर असलेल्या फुजीसावा या शहरात तणाव निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून हजारो लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले जात आहेत. फुजीसावा शहरात पहिल्या मशिदीचे सध्या बांधकाम सुरू आहे. या मशिदीला फुजीसावा शहरातील लोक विरोध करत आहेत. फुजीसावा शहरात सुरू झालेल्या वादाचे लोण आता जपानमध्ये पसरत आहे. आंदोलकांकडून हातात फलक घेत घोषणाबाजी करत मशिदीच्या बांधकामाविरोधात आंदोलन केले जात आहे. मशिदीचे बांधकाम हे जवळील शिंतो धार्मिक स्थळापेक्षा मोठे असल्याने त्याला विरोध होत आहे. तसेच हे “चिथावणी देणारे कृत्य” असून जपानच्या संस्कृतीला धोका असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. जपानमध्ये नेमका वाद काय सुरू आहे? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
स्थानिक नागरिक व मशिदीचे बांधकाम करणारे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू असताना तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मशिदीच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. ‘फुजीसावा मशिदी’च्या प्रतिनिधीने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, “आम्ही जपानवर प्रेम करतो. जपानच्या नियमांशी आम्ही बांधील आहोत.”
जपानमध्ये मुस्लीम लोकसंख्या किती?
जपानमध्ये मागील १५ वर्षांपासून मुस्लीम लोकसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये सध्या विवाद उद्भवला आहे. वासेदा विद्यापीठातील प्राध्यापक एमेरिटस हिरोफूमी तनादा म्हणाले, २०२४ च्या अखेरपर्यंत जपानमध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या जवळपास ४ लाख २० हजार झाली आहे. २०१० मध्ये मुस्लीम समाजाची लोकसंख्या १ लाख १० हजार होती. दरम्यान, जपानमध्ये असलेल्या मुस्लीम समाजापैकी ९० टक्के मुस्लीम समाज हा परदेशातून येऊन स्थायिक झाला आहे. तर उर्वरित १० टक्के समाजाचे धर्मांतर किंवा सांस्कृतिक मिसळण झाली आहे.
जपानमध्ये स्थलांतर का वाढले?
जपानमध्ये वयोवृद्धांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कामगारांचा तुटवडा आहे. परदेशातून कामगार जपानमध्ये यावेत, यासाठी जपान सरकारने जपानची द्वारे खुली केली आहेत. इंडोनेशिया हा एक मुस्लिमबहुल देश आहे. इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जपानमध्ये स्थलांतर होत आहे. बाहेरील देशातून जपानमध्ये येणाऱ्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी जपान सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. ‘टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम’ आणि ‘इकॉनॉमिक पार्टनरशिप एग्रिमेंट’ हे त्यांपैकी काही उपक्रम आहेत. नर्सिंग आणि केअरटेकरशी संबंधित कामे करण्यासाठी जपानमध्ये स्थलांतर वाढले आहे. जपानमध्ये होत असलेल्या या बदलाने जपानच्या सामाजिक रचनेत बदल होत आहे. २००८ मध्ये ५० मशिदींची नोंद होती. २०२५ मध्ये किमान १६४ मशिदींची जपानमध्ये नोंद झाली आहे.
JAPAN: Thousands gathered to protest the construction of the first mosque in Fujisawa. The proposed mosque would be much larger than the nearby Shinto shrine, an act of provocation.
— Dr. Maalouf (@realMaalouf) April 12, 2026
“We don’t want a single mosque, or Muslim cemetery here!” pic.twitter.com/NhqCY0znCI
अंत्य विधीच्या पद्धतींमुळे तणाव?
जपानमध्ये सुरू झालेल्या वादाचे मुख्य कारण म्हणजे अंत्यविधीची प्रक्रिया आहे. जपानच्या संस्कृतीनुसार जपानी नागरिकांना मृत्यूनंतर दहन केले जाते. त्यांना अग्नी दिला जातो. तर इस्लामिक परंपरेत मृत्यूनंतर दफन विधी केला जातो. दफन विधीला जपानमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दफन करणे हे पर्यावरणावर परिणाम करणारे आहे, असे जपानमध्ये आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. जमिनीतील पाणी दूषित होत असल्याचा काहींनी दावा केला आहे, परंतु, तसा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
जपानमध्ये दफनभूमींची संख्या कमी आहे. त्यामुळे देखील तणाव वाढत आहे. जपानमध्ये मुस्लीम समाजासाठी फक्त दहा दफनभूमी आहेत. आणखी काही दफनभूमींचा प्रस्ताव देण्यात आला, परंतु, त्याला जोरदार विरोध झाला. स्थानिक नागरिक दफनभूमीला विरोध करत आहेत. दरम्यान, या मुद्द्याने जपानमध्ये आता राजकीय वळण घेतले आहे. उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी इस्लामशी संबंधित कोणत्याही पायाभूत सुविधा उभारण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. तसेच जपानमध्ये स्थानिक नागरिकांनी अजानचा विरोध केला आहे. आवाजाने त्रास होत असल्याने अजानला विरोध होत आहे. तसेच ईद-अल-फितर सणालाही मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव एकत्र येतात. त्यास देखील विरोध झाला. दरम्यान, फुजीसावा शहरात मोठी मशिद उभारली जात असल्याने तिचा परिणाम आजूबाजूच्या भागावर होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?
जपानमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले आहेत. सोशल मीडिया एका वापरकर्त्याने लिहिले, “आत्ताच नुकसान टाळा नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. जपानने उचललेले हे उत्तम पाऊल आहे, उशीर होण्यापूर्वी आपल्या संस्कृतीचे रक्षण करा. भारत, लंडन इत्यादी ठिकाणची परिस्थिती पहा.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “सर्वात आधी, कोणत्या प्राधिकरणाने याला बांधकाम परवानगी दिली? नकाशा किंवा योजना कशा मंजूर केल्या गेल्या? कोणत्याही बांधकामाची परवानगी घेताना अनेकदा सर्वेक्षणे केली जातात. ती एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “जपानी लोक स्वतःला सुसंस्कृत म्हणतात, पण इतर धर्माच्या एका प्रार्थनास्थळालाही ते स्वीकार करू शकत नाहीत.”
जपानमध्ये काय परिस्थिती?
जपानमध्ये अलिकडच्या काळात स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देणार्या राजकीय पक्षांचा प्रभाव वाढत आहे. सानसेईतो आणि इशिन नो काई यांसारख्या गटांनी “जपान-प्रथम” धोरणावर भर दिला आहे. लोकसंख्या रचनेत होणाऱ्या बदलावर ते सातत्याने टीका करतात. दरम्यान, जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची यांनी देखील सांस्कृतिक मूल्यांवर जोर दिला आहे. जपानमध्ये कामगारांचा तुटवडा असल्याने परदेशातून रोजगारासाठी जपानमध्ये स्थलांतर होत आहे. त्यामुळे जपानमध्ये अनेक सांस्कृतिक बदल होत आहेत. जपानच्या संविधानानुसार धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण केले जाते.
