जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने (LDP) प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. एकूण ४६५ पैकी सनाई तकाईची यांच्या पक्षाला ३१६ जागा मिळाल्या. बहुमतासाठी २६१ जागांचा टप्पा तकाईची यांच्या पक्षाने सहज पार केला असून, जपानच्या राजकारणात बदल होण्याचे संकेत दिले जात आहेत. कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्याने तकाईची यांचे सरकार अधिक भक्क झाले आहे. ६४ वर्षीय सनाई तकाईची यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मान मिळवला होता. जपानमध्ये मागील काही वर्षांमध्ये इतके प्रचंड बहुमत मिळालेले सरकार अस्तित्वात आले नाही. त्यामुळे तकाईची यांना जपानमध्ये धोरणात्मक बदल करण्यासाठी मोठा जनाधार मिळाल्याचे मानले जात आहे. तकाईची या विजयाचा भारत, अमेरिका, चीन या देशांशी असलेल्या संबंधांवर काय परिणाम होईल, तसेच जपानचा राजकीय कल कोणत्या दिशेने आहे, ते जाणून घेऊयात.

जपानच्या शेअर बाजारात काय स्थिती?

सनाई तकाईची यांच्या विजयानंतर जपानमधील शेअर बाजारात सकारात्मक बदल दिसून आला. ‘द जपान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी टोक्यो शेअर बाजारातील शेअर्सचे भाव पाच टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. सनाई तकाईची यांना प्रचंड बहुमत मिळाल्याने जपानमध्ये एक स्थिर सरकार अस्तित्वात येणार आहे. तसेच जपानमध्ये विरोधक कमजोर झाले आहेत. त्यामुळे तकाईची या एक मजबूत सरकार जपानला देऊ शकतात असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये आहे. त्यामुळे तकाईची जपानच्या उद्योगांबाबत सकारात्मक निर्णय, धोरण राबवून जपानच्या विकासाला गती देऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. तकाईची यांनी निवडणूक प्रचारात जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रावर जोर तसेच अन्नधान्य व खाद्यपदार्थांवरील कर कमी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात बरीच पडझड झाली होती. दरम्यान, तकाईची यांच्या विजयानंतर शेअर बाजारात सकारात्मकता दिसून आली.

जपानचा राजकीय कल कोणत्या दिशेने?

सनाई तकाईची या प्रखर राष्ट्रवादाला समर्थन देणाऱ्या, रूढीवादी, पारंपारिक विचारसरणीच्या नेत्या आहेत. त्यांनी सत्तेवर येताच पारंपारिक विचारसरणीनुसार काही निर्णय बदलले. लग्न झाल्यानंतर पती-पत्नीला स्वतंत्र आडनाव वापरता येईल, असा निर्णय जपानमध्ये घेण्यात आला होता. तकाईची यांनी त्या निर्णयाला विरोध करत रद्द केले. जपानमधील जे मतदार पारंपारिक विचारसरणीच्या सान्सेईतो (Sanseito) आणि ‘डेमोक्रेटिक पार्टी फॉर द पिपल’ या लहान पक्षांना मतदान करत होते, ते तकाईची यांच्या एलडीपी पक्षाकडे वळले आहेत. तसेच सनाई तकाईची यांनी जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रावर जोर देणार असल्याचे म्हटले होते. तकाईची यांच्या राष्ट्रवादाला जपानी मतदारांनी पाठिंबा दिला आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात (हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सागरी भू-राजकीय प्रदेश) अस्थिरता निर्माण झाल्याने हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरला.

जपान-चीन संबंध सुधारतील का ?

जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची यांनी चीनबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. चीनने तैवानवर दावा केला आहे. चीनने तैवानवर हल्ला केल्यास तो जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असेल, त्यामुळे जपान चीन विरोधात सैन्य कारवाई करेल, असा इशारा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सनाई तकाईची यांनी दिला होता. त्यानंतर चीनने तकाईची यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले होते. चीनने जपानवर दुर्मिळ खनिजे व जपानी नागरिकांच्या चीनमधील प्रवासावर काही निर्बंध लादले होते. सनाई तकाईची यांच्या विजयानंतर चीनने एक निवेदन जारी केले आहे. चीनच्या जपानबद्दल असलेल्या धोरणात जपानमधील एका निवडणुकीचा काहीही फरक पडणार नसल्याचे चीनने सांगितले आहे. त्यामुळे सनाई तकाईची यांच्या विजयाने चीन-जपानमधील संबंध सुधारतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, तकाईची यांच्या विजयानंतर अमेरिका व जपानमधील संबंध आणखी सुधारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिका व जपान एकमेकांना मदत करत आले आहेत. जपानच्या परराष्ट्र धोरणात अमेरिकेला महत्वाचे स्थान असणार आहे. अमेरिकेबरोबर भागीदारी वाढवण्याबाबत तकाईची या सकारात्मक आहेत. मार्च महिन्यात तकाईची डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथे भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी तकाईची यांना पाठिंबा दिला होता.

भारतासाठी कोणत्या संधी ?

तकाईची यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. जपानची भारताबरोबर असलेली भागीदारी वाढत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या दबावाचा भारत व जपान या दोन्ही देशांनी विरोध केला आहे. तकाईची यांची जपानच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्याची भूमिका जपान व भारतातील संरक्षण भागीदारी वाढवण्यास फायदेशीर ठरू शकते. सागरी सुरक्षा, संयुक्त लष्करी अभ्यास व तंत्रज्ञानाशी संबंधित भागीदारीत वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच भारत, जपान व आफ्रिका यांच्यात दुर्मिळ खनिजांबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. दरम्यान, जपानची भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. भारतात रेल्वे, उत्पादन व शहरी विकास प्रकल्पांत जपानी कंपन्या कार्यरत आहेत. जपानची भारतात गुंतवणूक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.