पंतप्रधानांनाही अथक काम करावे लागते. पण किती? आणि त्यासाठी किमान अपेक्षित झोपेचेही खोबरे करायचे का? देशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पंतप्रधानांनी घरातली कामं का करावीत? या प्रश्नांवर सध्या जपानमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे…

जपानमध्ये नेमके काय घडले?

२० जूनचा दिवस. त्या दिवशी सोमवारी जपानमध्ये ‘सी डे’निमित्त सार्वजनिक सुट्टी होती. या दिवशी अनेक जपानी नागरिक उन्हाळ्याच्या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पोहणे, सर्फिंग किंवा समुद्रकिनारी निवांत वेळ घालवणे पसंत करतात. मात्र, जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी ही सुट्टी वेगळ्या पद्धतीने घालवली. त्यांनीच त्याची माहिती दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमांवर दिली. जुलैच्या सुरुवातीपासूनच पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपण सप्ताहअखेर आपल्या निवासस्थानीच राहून कागदपत्रांच्या मोठमोठ्या गठ्ठ्यांचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याबाबतची काही वैयक्तिक माहितीही त्यांनी दिली. “खूप दिवसांनी पहिल्यांदाच सलग पाच तासांची झोप घेता आली,” असेही त्यांनी लिहिले. आपल्या नेहमीच्या “शून्य ते तीन तासांच्या” झोपेपेक्षा हे अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. मोकळा वेळ मात्र मर्यादित असल्याने त्यांनी कपड्यांना इस्त्री करणे, शिवणकामे करणे आणि सैल झालेली जॅकेटची बटणे पुन्हा घट्ट करणे, अशी कामे केली. “आता उद्यापासून पुन्हा पूर्ण ताकदीने कामाला लागता येईल!” असे त्यांनी लिहिले.

पंतप्रधानांच्या दिनक्रमावरून वादंग का?

जपानच्या नागरिकांसाठी काम करताना आपण सतत कार्यमग्न असलेले, सर्वसामान्यांशी जोडलेले नेते आहोत, अशी प्रतिमा ताकाइची यांना आपल्या पोस्टमधून निर्माण करायची होती. ही पोस्ट सुमारे ३ कोटी १० लाख वेळा पाहिली गेली. आणि घडले भलतेच… पंतप्रधानांचे कौतुक होण्याऐवजी या पोस्टवरून देशात एकच राळ उठली.

पंतप्रधान ताकाइची यांच्या पोस्टमुळे काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल तसेच झोपेच्या कमतरतेच्या धोक्यांवर देशात चर्चा सुरू झाली.विरोधी पक्षाचे खासदार तोरू कुनिशिगे यांनी ताकाइची यांना इशाराच दिला. ते म्हणाले की, दीर्घकाळ झोपेचा अभाव “नशेच्या अवस्थेप्रमाणे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो आणि राष्ट्रीय संकट व्यवस्थापनासाठी धोका निर्माण करू शकतो.

जपानच्या कायदेमंडळातील ताकाइची यांचे आणखी एक टीकाकार हिरोयुकी कोनिशी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “पंतप्रधानांचे खरे काम धोरणांची दिशा निश्चित करणे आणि सूचना देणे हे आहे; कागदपत्रातील प्रत्येक छोट्या तपशिलात डोके खुपसणे नव्हे,” असा आक्षेप त्यांनी घेतला.

डेमोक्रेटिक पार्टी फॉर द पीपल पक्षाचे नेते युइचिरो तमकी यांनी ताकाइची मेहनती असल्याचे मान्य केले. मात्र, “विश्रांती घेणे हे देखील एक कामच आहे,” असे ते म्हणाले. ताकाइची यांच्या कार्यालयाने यावर प्रतिक्रिया दिली नाही.

जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला असलेल्या ताकाइची यांना त्यांच्या पदावर अधिक मदत मिळायला हवी, असा युक्तिवाद काही भाष्यकारांनी केला. यापूर्वीचे जपानी पंतप्रधान घरातील कामांसाठी अनेकदा पत्नीवर अवलंबून राहत असत. मात्र, ताकाइची स्वत:च घरातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत, असे टोकियो येथील नॅशनल ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या प्राध्यापिका योको इवामा यांनी म्हटले.

“जपानच्या पंतप्रधानांना घरातील कामे स्वत: न करता पूर्णपणे त्यांच्या शासकीय कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करता येईल, अशी मदत व्यवस्था निर्माण केल्यास समाजातील महिलांच्या प्रगतीला हातभार लागेल,” असे इवामा यांनी ‘निक्केई’ या एका वृत्तपत्रात लिहिले.

जपानसमोरील आव्हाने

जपानमध्ये पार्लमेंटचे उन्हाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आपल्या योजना, कामांना मंजुरी मिळवण्यासाठी ताकाइची अतिशय व्यग्र आहेत. त्याच वेळी देशाच्या आर्थिक अडचणीही कायम आहेत. जपानी चलन येनचा दर ३९ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यांच्या लोकप्रियतेतही अलीकडे घट झाली आहे. मात्र, तरीही त्यांची लोकप्रियता तुलनेने चांगली आहे.

ताकाइची यांनी आपल्या पोस्टमध्ये अलीकडील कामाच्या ताणाबाबत सविस्तर लिहिले. जुलैच्या सुरुवातीपासून “पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत” आपण सप्ताहअखेर आपल्या निवासस्थानीच राहून “कागदपत्रांच्या मोठमोठ्या गठ्ठ्यांचा अभ्यास करत” असल्याचे त्यांनी सांगितले.

जपानी प्रवृत्तीमध्येच?

सतत कामात झोकून देण्याची जपानची संस्कृती जपानमध्ये दीर्घकाळ काम करण्याची संस्कृती असल्याची ख्याती आहे. काही कंपन्यांमध्ये कामाचे दिवस १२ तासांपेक्षाही अधिक असतात. उद्योग आणि सरकारी कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेल्यानंतरच कर्मचारी घरी जावेत, असा दबाव असतो. अतिरिक्त कामाचे जास्त तास नोंदवणे हे निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचे लक्षण मानले जाते.

दुष्परिणाम कोणते?

अलीकडच्या वर्षांत जपानमध्ये ‘करोशी’ अर्थात ‘अतिरिक्त कामामुळे होणारा मृत्यू’ या समस्येची अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. २०१६ मध्ये जाहिरात क्षेत्रातील दिग्गज कंपनी डेन्ट्सूमधील कर्मचारी मात्सुरी ताकाहाशी यांनी महिन्याला १०० तासांहून अधिक अतिरिक्त काम केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेनंतर सरकारने महिन्याला अतिरिक्त कामाची मर्यादा ४५ तास निश्चित केली. काही तज्ज्ञांच्या मते, विशेषत: तरुणांमध्ये या नियमामुळे कामाच्या संस्कृतीतील अतिरेक कमी होण्यास मदत झाली.

‘काम, काम आणि काम’

१९९०च्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यापासून परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेत्या बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ताकाइची यांनी आपल्या कामाच्या निष्ठेला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ‘काम, काम आणि काम’ करण्याचे आश्वासन दिले होते. आपले व्यग्र वेळापत्रक अधोरेखित करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला आहे. जानेवारीमध्ये त्यांनी सुट्टीच्या काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्थलांतर करताना भूराजकीय प्रश्न हाताळल्याबाबत सविस्तर पोस्ट केली होती. ताकाइची यांच्या कामाच्या सवयी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांनी पहाटे तीन वाजता आपल्या सहकाऱ्यांना बोलावल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांच्या घरातील फॅक्स मशीन बिघडले होते. त्यामुळे बैठकीची तयारी करण्यासाठी दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी त्यांना कर्मचाऱ्यांची मदत आवश्यक होती.
manisha.devne@expressindia.com