भारताचे दिग्गज नेमबाज, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे आणि ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे १२ जून २०२६ रोजी वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या (Cardiac Rupture) तीव्र झटक्याने निधन झाले. एका फिट, सक्रिय आणि तरुण क्रीडा मार्गदर्शकाची अशी अचानक एक्झिट संपूर्ण देशाला चटका लावून गेली. पण, या दुर्दैवी घटनेमागील जे वास्तव समोर आले आहे ते अतिशय अंगावर शहारे आणणारे आहे.

रिपोर्ट्सनुसार जसपाल राणा हे तब्बल तीन दिवस हृदयविकाराचा झटका अंगावर काढून प्रवास करत होते! छातीत सतत दुखत असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी जेव्हा ते गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर करण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

जसपाल राणा यांच्या या जाण्याने केवळ मध्यमवयीन लोकांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराच्या धोक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही, तर ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) चुकवल्यास काय अघटित घडू शकते, याचे एक भयंकर उदाहरण समोर आणले आहे.


“गॅसमुळे त्रास होत असेल”: हीच ती पहिली आणि जीवघेणी चूक!

आपल्याकडे छातीत थोडे अस्वस्थ वाटू लागले की लगेच घरगुती डॉक्टर जागे होतात. “रात्री चमचमीत खाल्लं असेल, ॲसिडिटी झाली असेल” किंवा “जिममध्ये जास्त वजन उचलल्यामुळे स्नायू दुखत असतील” असं म्हणून आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो.
पुण्यातल्या अपोलो हॉस्पिटलमधले कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. नरेश मुनोत सांगतात:

“अनेकदा लोक हृदयाशी संबंधित गंभीर लक्षणांना किरकोळ समजण्याची चूक करतात. हृदयविकार तज्ज्ञ म्हणून आम्ही नेहमीच बजावतो की, अगदी किरकोळ वाटणारी लक्षणेही हृदयाच्या एखाद्या मोठ्या विकाराचे संकेत असू शकतात. तुम्ही वैद्यकीय तपासणीसाठी जितका उशीर कराल, तितका हृदयाच्या स्नायूंचा नाश होत जातो.”


‘गोल्डन अवर’ म्हणजे काय?

हृदयविकाराच्या भाषेत ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) म्हणजे झटका आल्यानंतरची पहिली ६० ते ९० मिनिटे (एक ते दीड तास). हा तो काळ असतो जिथे मृत्यू आणि जीवनामध्ये केवळ काही मिनिटांचे अंतर उरलेले असते.

राजकोटमधल्या एचसीजी हॉस्पिटल्सचे कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. पारस लालवानी यांच्या मते, “हा पहिला दीड तास इतका मौल्यवान असतो की यादरम्यान जर रुग्णावर उपचार झाले तर हृदयाचा बंद झालेला रक्तप्रवाह पुन्हा सुरू करता येतो. वेळेत ‘अँजिओप्लास्टी’ करून स्टेंट टाकल्यास किंवा रक्ताची गाठ विरघळवणारी औषधे दिल्यास हृदयाला होणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर टाळता येते.


उपचार करायला उशीर झाला तर काय होते?

  • ३ ते ६ तास: हृदयाच्या स्नायूंचे नुकसान अत्यंत वेगाने (Accelerated) वाढू लागते.
  • १२ तासांनंतर: हृदयाला झालेली दुखापत ही ‘इरिव्हर्सिबल’ (Irreversible) असते, म्हणजेच ती कधीही भरून काढता येत नाही.
  • डॉ. लालवानी स्पष्ट शब्दात इशारा देतात की, “जे लोक अनेक दिवस त्रास अंगावर काढतात, ते जेव्हा रुग्णालयात येतात तेव्हा हृदयविकाराचा झटका पूर्ण येऊन गेलेला असतो. अशा वेळी डॉक्टर केवळ गुंतागुंत हाताळू शकतात, पण मृत पावलेल्या हृदयाच्या पेशींना (Dead Heart Tissue) पुन्हा जिवंत करू शकत नाहीत.”


प्रत्येक वेळी चित्रपट दाखवतात तसाच झटका येतो का?

बऱ्याच लोकांचा समज असतो की, चित्रपट किंवा नाटकांमध्ये दाखवतात तसे छातीवर हात ठेवून माणूस जमिनीवर कोसळला, म्हणजेच हृदयविकाराचा झटका! पण प्रत्यक्षात तसे नाही.
डॉ. लालवानी यांच्या मते, महिला, वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण यांच्यात हृदयविकाराची लक्षणे अतिशय ‘सायलेंट’ किंवा वेगळी असू शकतात. त्याला ‘एटिपिकल सिम्टम्स’ म्हणतात.


हे धोक्याचे संकेत वेळीच ओळखा:

  • छातीत केवळ कळ येणेच नाही तर तिथे प्रचंड दबाव, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणे.
  • वेदना केवळ छातीत न राहता ती डाव्या किंवा उजव्या हातात, गळ्यात, जबड्यात, खांद्यामध्ये किंवा पाठीत पसरणे.
  • अचानक विनाकारण धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
  • अचानक थंड घाम येणे (एसीमध्ये असूनही घाम सुटणे).
  • चक्कर येणे, मळमळणे किंवा उलट्या होणे.
  • प्रचंड आणि अकारण थकवा जाणवणे.

जर यापैकी कोणतेही लक्षण ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकून राहिले, ती एक ‘मेडिकल इमर्जन्सी’ आहे.

हृदयविकार शास्त्राचा एकच सुवर्णनियम आहे, ‘वेळ घालवला की स्नायू गमावला.’ जर तुम्हाला किंवा तुमच्या सोबतीला कोणालाही असा त्रास होत असेल तर खालील गोष्टी त्वरित करा:

  • स्वतः गाडी चालवू नका: रुग्णवाहिकेला (ambulance) कॉल करा किंवा तातडीने कोणाची तरी मदत घ्या. स्वतः गाडी चालवण्याचे धाडस जीवावर बेतू शकते.
  • ‘थांबून बघू’ ही वृत्ती सोडा: लक्षणे घरगुती उपायांनी बरी होतील याची वाट पाहत बसू नका.
  • ॲस्पिरिनची जादू: जर रुग्णाला ॲस्पिरिन (Aspirin) या औषधाची ॲलर्जी नसेल, तर डॉक्टरांच्या किंवा पॅरामेडिक्सच्या सल्ल्याने ३२५ मिलीग्रामची एक ॲस्पिरिन गोळी त्वरित चावून खाण्यास सांगा. ही गोळी रक्ताची गाठ मोठी होण्यापासून रोखते आणि रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव वाचवू शकते.

जसपाल राणा यांच्या अकाली जाण्याने क्रीडा जगताची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. पण, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. आपल्या शरीराचा आवाज ऐका, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ‘गोल्डन अवर’चे महत्त्व ओळखा; कारण गेलेली वेळ आणि मृत झालेला हृदयाचा स्नायू कधीही परत येत नाही!