डॉ. देवदत्त पोखरकर
Jaswand Flower Ganesh Puja Benefits & Importance: भक्तीत दंग झालेलं मन प्रत्येक गोष्टीत आपल्या प्रिय देवाचं रुप पाहात असतं. देवाइकीच ती गोष्टसुद्धा भाविकांना प्रिय होऊन जाते. म्हणूनच ‘जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला, गणपती दिसला’ गणेशोत्सवात हे गाणं कानांवर पडतं, तेव्हा डोळ्यांसमोर येते ती गणरायाची सर्वांग सुंदर आकर्षक मूर्ती आणि श्रीगणेशाला वाहिलेली लालचुटूक जास्वंदीची फुलं. गणरायाच्या पूजेसाठी आवर्जून वापरलं जाणारं हे फूल केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही, तर त्यामागे लोकपरंपरा, धार्मिक श्रद्धा, वनस्पतीशास्त्र आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं दडलं आहे.
भेंडी कुळाचा सदस्यगण
अंगणात, बागेत किंवा कुंडीत सहज वाढणारं जास्वंदाचं झाड वर्षभर आपल्या लाल, गुलाबी, पिवळ्या, नारिंगी किंवा पांढऱ्या फुलांनी परिसराला शोभा आणत असतं. या जास्वंदाचं शास्त्रीय नाव आहे, Hibiscus rosa-sinensis आणि Malvaceae म्हणजेच भेंडी कुळाचा जास्वंद एक सदस्य आहे. उष्ण आणि उष्णकटिबंधीय हवामानात पुरेसा सूर्यप्रकाश, पुरेसं पाणी आणि वेळोवेळी योग्य प्रमाणात छाटणी केल्यास जास्वंदाचं हे झाड दीर्घकाळ अगदी मनसोक्त फुलत राहतं.
काय रंग, काय ढंग
आपल्या परिचयातला जास्वंद प्रामुख्यानं लाल रंगाचा असला तरी आज उद्यान विद्येमध्ये अनेक रंगांच्या आणि विविध आकारांच्या जाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये लाल, गुलाबी, पिवळा, नारिंगी, पांढरा तसेच विविध रंगांचे मिश्रण असलेली जास्वंदाची फुलं आढळतात. काही जातींची फुलं तर साध्या पाकळ्यांची असतात, तर काहींमध्ये दुहेरी किंवा अधिक पाकळ्यांची आकर्षक रचना दिसते. त्यामुळे जास्वंदाला धार्मिक महत्त्वाबरोबरच शोभेच्या वनस्पतीचंही महत्त्व आता प्राप्त झालं आहे.

श्रीगणेशाच्या चरणी नित्य एक जास्वंद
अर्थातच, गणेशपूजेत जास्वंदीच्या फुलाला विशेष स्थान आहे. विशेषतः लाल जास्वंद हे श्रीगणेशाला प्रिय मानलं जातं. भारतीय धार्मिक परंपरेत लाल रंग हा ऊर्जा, मांगल्य, उत्साह आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. जास्वंदीच्या फुलाचा तेजस्वी लाल रंग आणि उठावदार आकार गणरायाच्या मंगल व तेजस्वी स्वरूपाशी जोडला जातो. यामुळेच गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाच्या काळात जास्वंदीच्या फुलांना विशेष मागणी असते. एरवीसुद्धा सकाळी उमललेलं ताजं फूल भक्तिभावानं गणरायाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते.
विद्यार्थ्यांसाठी बेस्ट स्पेसिमेन
भाविकांना अत्यंत प्रिय असलेलं जास्वंदाचं फूल वनस्पती शास्त्राच्या दृष्टीनेही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गाचा चमत्कार असा की, फुलातले पुंकेसर एकत्र येऊन लांब नलिकेसारखी रचना तयार करतात. या पुंकेसर नलिकेतून किंजल दलाचा भाग पुढे आलेला दिसतो. फुलाची आकर्षक रचना, रंग आणि परागकणांची उपलब्धता यामुळे विविध परागीभवन करणारे कीटक त्याकडे सहज आकर्षित होतात. त्यामुळे जास्वंदाचं फूल हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी उत्तम उदाहरण ठरतं. जास्वंदीच्या फुलांमधल्या नैसर्गिक रंगद्रव्यांमुळे रंगांच्या अभ्यासातही या फुलाचं मोल अनन्यसाधारण असतं.
सौंदर्य प्रसाधनातलं मोल काय ?
वनस्पतीशास्त्रीय मोल असलेल्या जास्वंदीचा संबंध भारतीय पारंपरिक सौंदर्य संस्कृतीशीही जोडलेला आहे. अनेक भागांमध्ये जास्वंदीची फुलं-पानं वाटून त्यांचा लेप तयार केला जातो. सोबतच फुलं, पानं आणि वनस्पतीजन्य तेलांचा वापर पारंपरिक पद्धतींमध्ये केसांच्या निगा राखण्यासाठी केलेला आढळतो. मात्र अशा पारंपरिक उपयोगांमागील परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्यामुळे वापरापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हीही इष्ट ठरतं. मुळात, कोणत्याही वनस्पतीजन्य पदार्थाला वैद्यकीय उपचाराचा पर्याय मानणं योग्य नसतं.
जास्वंद ‘फ्लेव्हर टी’ का प्यावा जपून ?
जास्वंदीच्या फुलांमध्ये anthocyanins, flavonoids आणि phenolic compounds यांसारखी जैवसक्रिय संयुगं आढळतात. त्यामुळे Hibiscus वंशातल्या वनस्पतींच्या अँटिऑक्सिडंट आणि इतर जैविक गुणधर्मांवर संशोधन झालं आहे. जास्वंदाच्या फुलांपासून तयार केला जाणारा हर्बल चहा आज आरोग्यविषयक पेय म्हणून चांगलाच लोकप्रिय होत आहे. मात्र ‘हिबिस्कस टी’साठी प्रामुख्यानं Hibiscus sabdariffa (Roselle) या प्रजातीच्या वाळलेल्या बाह्यदलांचा वापर केला जातो; गणपतीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या Hibiscus rosa-sinensis च्या फुलांपासून तयार होणाऱ्या पेयाला त्याच अर्थाने हिबिस्कस टी म्हणणं योग्य ठरत नाही. इथे आणखी एक महत्त्वाची शास्त्रीय बाब लक्षात घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे, Hibiscus rosa-sinensis आणि आंबट चवीच्या चहासाठी प्रसिद्ध असलेली Hibiscus sabdariffa या दोन भिन्न वनस्पती आहेत. त्यामुळे जास्वंदीच्या औषधी किंवा आहारविषयक उपयोगांबाबत माहिती देताना वनस्पतीची अचूक ओळख करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
फूल नव्हे, एक अख्खी जिवंत प्रयोगशाळा
जास्वंद विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची ‘जिवंत प्रयोगशाळा’ आहे. पुस्तकातील फुलाची रचना प्रत्यक्ष पाहायची असेल तर जास्वंदाचं फूल परिसरात सहज उपलब्ध होतं. त्यातून पुंकेसर, किंजदल, परागकण, परागीभवन आणि फुलाची बाह्यरचना समजावून सांगता येते. वेगवेगळ्या रंगांच्या आणि पाकळ्यांच्या जाती पाहिल्यास वनस्पतींमधील विविधताही विद्यार्थ्यांना समजते. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अशा वनस्पतींची लागवड केल्यास अभ्यासक्रमातील वनस्पतिशास्त्र आणि प्रत्यक्ष निसर्ग यांच्यातील दरी कमी होऊ शकते. एकूणच, जास्वंदीचं फूल पाहताना भक्ताला त्यात गणरायाचे रूप दिसतं आणि वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासकाला त्यामध्ये निसर्गाची अद्भुत
रचना दिसून येते.
यांचा पत्ता जास्वंदाचं झाड
जास्वंदीची लागवड जैवविविधतेच्या दृष्टीनंही उपयुक्त ठरू शकते. फुलांमुळे फुलपाखरे, मधमाश्या आणि इतर कीटक बागेकडे आकर्षित होतात. हाच त्यांचा पत्ता असतो. जास्वंदासोबत तुळस, मोगरा, कण्हेर, सदाफुली, झेंडू, शेवंती अशा विविध फुलझाडांची लागवड केली, तर घराभोवती छोट्या प्रमाणात का होईना, परंतु विविध जीवांसाठी अनुकूल पर्यावरण निर्माण होईल.
जिना इसी का नाम हैं…
जास्वंदीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीचं फूल अल्पायुषी असतं. सकाळी उमललेलं फूल साधारणपणे दिवसाच्या अखेरीस कोमेजू लागतं. परंतु एका फुलाचं आयुष्य संपत असतानाच एकाच वेळी झाडावर नवीन कळ्या तयार होत असतात. त्यामुळे एका छोट्याशा फुलातून निसर्गातील क्षणभंगुरता आणि सातत्य या दोन्हींचा अनुभव आपल्याला मिळतो. जीवनचक्राचा हा सुंदर संदेश जास्वंद देत राहतो.
एक रोप श्रीगणेशाच्या नावे
जास्वंदीच्या या गुणवैशिष्ट्यांमुळे खरं तर भाविकांना ‘गणरायासाठी एक जास्वंदाचे रोप’ ही संकल्पना गणेशोत्सवात राबविता येऊ शकते. गणपतीची प्रतिष्ठापना करताना बाजारातून फुलं आणण्याबरोबरच घराच्या अंगणात किंवा कुंडीत जास्वंदाचं रोप लावलं तर येणारा प्रत्येक गणेशोत्सव निसर्गाशी नातं जोडण्याचा उत्सव ठरेल. पुढच्या गणेशोत्सवात आपल्या घरादारातच्या झाडावर उमललेलं जास्वंदाचं फूल गणरायाला भक्तीभावाने अर्पण करता येईल. भक्ती सोबत निसर्गही जपता येईल!
