अलीकडेच वाढलेल्या विमान अपघातांमुळे अनेक प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतातही अनेकजण देशांतर्गत प्रवासासाठी विमानाची तिकीटं उपलब्ध असतानाही ट्रेन किंवा इतर माध्यमांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाविषयीची भीती आणखी वाढताना दिसत आहे. त्यातच आणखी एका बातमीने लोकांची झोप उडवली आहे, ती म्हणजे टेनेरिफहून बर्मिंगहॅमकडे जाणाऱ्या Jet2 या विमानाच्या पायलटला उड्डाण घेतल्यावर विमान ३० हजार फूट उंचीवर असताना हार्ट अटॅक आला. परंतु, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे, अशा स्थितीत एअर लाईन्सकडून कोणते निर्णय घेतले जातात याचाच घेतलेला आढावा.

Jet2.com ही युनायटेड किंगडम (UK) मधील एक प्रसिद्ध विमान कंपनी (Airline) आहे. ही ब्रिटनमधील (easyJet आणि British Airways नंतरची) तिसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी या कंपनीच्या Jet2 (Flight Number LS1266, Aircraft Model Airbus A321) या विमानाने टेनेरिफहून बर्मिंगहॅमकडे जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. विमान आकाशात सुमारे ३० हजार फूट उंचीवर असताना कॅप्टनची (पायलट) प्रकृती अचानक बिघडली. एअरलाइनकडून त्यांना नंतर सांगण्यात आले की, पायलटला कॉकपिटमध्ये असताना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय होता, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली.

विमानात सुमारे २२० प्रवासी होते. टेनेरिफहून बर्मिंगहॅमकडे निघालेल्या या विमानातील अनेक प्रवासी पहाटेची वेळ असल्यामुळे झोपेत होते. पण अचानक केबिनमध्ये हालचाल वाढली, दिवे लुकलुकू लागले आणि विमान वेगाने खाली येऊ लागल्याचे जाणवताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी सांगितले की, केबिन क्रू घाईघाईने आयल (aisle) मधून जात होते आणि विमानात कोणी डॉक्टर किंवा वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती आहे का, अशी चौकशी करत होते.

एका प्रवाशाने सांगितले की, “मी आणि माझा जोडीदार झोपेत होतो. अचानक गोंधळामुळे आम्ही जागे झालो. दिवे लुकलुकत होते, एअर होस्टेस घाबरलेल्या दिसत होत्या आणि त्या प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का याचा शोध घेत होत्या. आमचे दोन वर्षांचे मूल रडू लागले, तसेच विमानातील इतर अनेक मुलेही घाबरली होती, कारण विमान खूप वेगाने खाली येत असल्यासारखे वाटत होते.”

अशा प्रसंगी प्रवाशांना नेमके काय घडत आहे, याची पूर्ण माहिती तत्काळ मिळत नाही. विमानातील प्रत्येक हालचाल अधिक भयावह वाटू लागते. क्रूची धावपळ, वैद्यकीय मदतीची हाक आणि मुलांचे रडणे या सगळ्यामुळे विमानातील वातावरण काही काळ अतिशय तणावपूर्ण झाले. मात्र अशा परिस्थितीत विमान कंपन्या विमानाच्या तत्काळ सुरक्षित लॅंडींगला प्राधान्य देतात.

म्हणूनच विमानातील को-पायलटने (First Officer) तातडीने विमानाचा ताबा घेतला आणि शुक्रवारी पहाटे २:११ वाजताच्या सुमारास पोर्तुगालमधील पोर्तो (Porto) विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) केले. त्यावेळी सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि आजारी पायलटला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विमान अखेर स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजून ११ मिनिटांनी पोर्तो विमानतळावर उतरले. विमान लँड होताच आपत्कालीन सेवा विमानाजवळ दाखल झाल्या. वैद्यकीय पथकाने कॉकपिटमध्ये जाऊन पायलटची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमान उतरल्यावरही त्यांना काही काळ विमानातच थांबवण्यात आले. काही रिपोर्ट्सनुसार, प्रवासी एक तासाहून अधिक काळ विमानात होते आणि त्यानंतर त्यांना टर्मिनलमध्ये नेण्यात आले.

प्रवाशांसाठी खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. नियोजित प्रवास खंडित झाल्यामुळे त्यांना पोर्तुगालमध्ये सुमारे १३ तास थांबावे लागले. Jet2 ने पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली. कंपनीने मँचेस्टरहून नवीन पायलट पाठवला आणि प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने बर्मिंगहॅमकडे रवाना करण्यात आले. मात्र या प्रतीक्षेमुळे अनेक प्रवासी नाराज झाले.

एका प्रवाशाने सांगितले की, “आम्ही पोर्तुगालमध्ये १३ तासांपेक्षा जास्त अडकलो होतो. सुरुवातीला आम्हाला विमानातूनही लगेच उतरू दिले नाही. नंतर आम्ही टर्मिनलमध्येच थांबलो. राहण्यासाठी जागा नव्हती. आम्हाला सांगण्यात आले की, accommodation खूप महाग आहे.” त्याच प्रवाशाने पुढे सांगितले की, “एअरलाइनने आम्हाला सांगितले की, पायलटला कॉकपिटमध्ये हार्ट अटॅक आला होता. अर्थात, आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे.”

या घटनेनंतर Jet2 ने अधिकृत प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नव्हती. एअरलाइनने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कंपनीने म्हटले की, “टेनेरिफहून बर्मिंगहॅमकडे जाणारे Flight LS1266 गुरुवारी, २१ मे रोजी, आमच्या एका पायलटची प्रकृती बिघडल्यामुळे पोर्तो येथे वळवण्यात आले. कोणत्याही क्षणी सुरक्षिततेशी तडजोड केलेली नाही आणि प्रवाशांनी नंतर त्यांचा प्रवास सुरू ठेवला. या अनपेक्षित विलंबाबद्दल आम्ही ग्राहकांची माफी मागतो.”

विमान प्रवासात अशा घटना दुर्मीळ असल्या तरी विमानवाहतूक व्यवस्थेत अशा संकटांसाठी स्पष्ट नियम आणि प्रशिक्षण असते. कॉकपिटमध्ये सहसा दोन पायलट असतात, जेणेकरून एका पायलटची प्रकृती अचानक बिघडली तरी दुसरा पायलट परिस्थिति सांभाळू शकेल. याच कारणामुळे या घटनेतही विमान सुखरूप पोर्तोमध्ये उतरवण्यात आले.

प्रवाशांसाठी मात्र हा अनुभव विसरणे सोपे नसेल. काही तासांचा प्रवास अचानक भीती, अनिश्चितता आणि दीर्घ प्रतिक्षेत बदलला. तरीही या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली, आकाशात संकट आले तरी प्रशिक्षित क्रू, आपत्कालीन प्रक्रिया आणि तातडीची वैद्यकीय मदत यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवता येतात. विमानातील पायलटच्या प्रकृतीबाबत सहानुभूती व्यक्त करत प्रवाशांनीही शेवटी सुरक्षित लँडिंगबद्दल दिलासा व्यक्त केला.

“या घटनेत एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. व्यावसायिक विमानांमध्ये दोन पायलट असतात आणि दोघांनाही विमान स्वतंत्रपणे नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे एका पायलटची प्रकृती अचानक बिघडली, तरी दुसरा पायलट विमान सुरक्षितपणे जवळच्या विमानतळावर उतरवू शकतो. प्रवाशांना विमान वेगाने खाली येत असल्यामुळे भीती वाटली असली, तरी अशा वेळी नियंत्रित उतरणे ही आपत्कालीन प्रक्रियेचा भाग असते. वैद्यकीय मदत शक्य तितक्या लवकर मिळावी, म्हणून विमान पोर्तो येथे वळवण्यात आले.”

“तसेच, या प्रकरणात ‘heart attack’ या शब्दाचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार एअरलाइनकडून त्यांना पायलटला heart attack आल्याचे सांगण्यात आले; परंतु Jet2 च्या अधिकृत प्रतिक्रियेत केवळ ‘pilot feeling unwell’ असे म्हटले आहे.