ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा शनिवारी (२४ सप्टेंबर) इंग्लंडविरुद्धचा सामना तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना. झुलनची क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. दोन दशके भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने जागतिक क्रिकेटमध्ये अमीट ठसा उमटवला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून तिने ३५० हून अधिक बळी मिळवले आहेत. तिच्या निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे. तिची उणीव भरून काढणे अवघड असले तरी, तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुलींनी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला अनेक युवा, प्रतिभावान वेगवान गोलंदाज मिळाल्या आहेत. याच कारणास्तव झुलन दोन पिढ्यांमधील दुवा ठरली आहे. झुलनच्या प्रेरणादायी कामगिरीचा, दोन दशकांतील प्रवासाचा आढावा…

झुलनचे क्रिकेटमध्ये पाऊल कसे पडले?

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील चकदासारख्या छोट्या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झुलनचा जन्म झाला. १९८०-९०च्या दशकात फुटबॉल हा बंगालमधील सर्वांत लोकप्रिय खेळ होता. त्यामुळे साहजिकच झुलनलाही फुटबॉलची आवड होती. मात्र, १९९२मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी १९९२ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सामने टीव्हीवर पाहताना तिच्या मनात क्रिकेटने घर केले. त्यानंतर १९९७मध्ये भारतात झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला खेळताना पाहून झुलनने क्रिकेटपटू होण्याचे निश्चित केले. क्रिकेट प्रशिक्षणासाठी चकदा सोडून झुलन कोलकात्याला आली आणि तिच्या कारकीर्दीला वळण मिळाले. वयाच्या १९व्या वर्षी ती बंगाल महिला क्रिकेट संघाकडून खेळली. त्यानंतर २००२मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतरची दोन दशके झुलन भारतीय महिला क्रिकेटचा एक महत्त्वाचा धागा ठरली.

झुलनच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य काय?

२०००च्या दशकापासून महिला क्रिकेटमध्ये भारताच्या यशात दोन खेळाडूंची महत्त्वाची भूमिका होती. त्यातील एक मिताली राज आणि दुसरी झुलन गोस्वामी. मिताली राजच्या बॅटचे पाणी अनेक गोलंदाजांनी चाखले, तर झुलनने अनेक फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. महिला क्रिकेटमधील सर्वांत वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून झुलनचा उल्लेख होतो. वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील एक महत्वाचे अस्त्र म्हणजे कटर चेंडू. झूलनने कटर चेंडू टाकण्याची स्वतःची शैली निर्माण केली. त्यावर तिचे प्रभुत्व होते. याच चेंडूवर तिने अनेक फलंदाजांना बाद केले. मनगट आतील बाजूस करून चेंडूच्या बाजूने बोटे खाली खेचणे ही कटर टाकण्याची सर्वसाधारण पद्धत असते. पण, त्यावरही तिने वर्चस्व मिळविले होते. तसेच उंचपुऱ्या झुलनला उसळी घेणारे चेंडू टाकण्यासाठीही फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत.

विश्लेषण: इंस्टाग्राम नंतर ट्विटरने वापरकर्त्यांना दिली खास लोकांच्या निवडीची सोय; ट्विटर सर्कल कसे वापराल?

झुलनच्या कारकीर्दीतील संस्मरणीय बळी कोणता?

इंग्लंडच्या माईक गॅटिंगला बाद केलेल्या चेंडूने जशी शेन वॉर्नची ओळख होते, तशीच २०१७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील एका बळीने झुलनची ओळख झाली. उपांत्य फेरीच्या लढतीत तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला शून्यावर बाद केले होते. हा चेंडू जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या लॅनिंगलाही कळाला नाही. क्रिकेट विश्व त्या चेंडूने स्तब्ध झाले होते. मधल्या आणि उजव्या यष्टिवर पडलेला तो चेंडू खेळण्यासाठी लॅनिंग बॅकफूट गेली आणि चेंडूने तिची उजवी यष्टी उडवली.

झुलनची सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना का होते?

झुलनने केवळ सर्वोत्तम गोलंदाज म्हणून नाही, तर सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे. एक परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. झुलनची खेळाप्रति असलेली वचनबद्धता, अडचणींवर मात करण्यासाठी झगडण्याची तिची वृत्ती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुन्या तंत्रात अडकून न राहता बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा तिचा गुणधर्म, तिला सर्वोत्तम बनवतो. कारकीर्दीत कधी पाठ, कधी टाच, खांदा, घोटा आणि शेवटी गुडघा अशा प्रत्येक दुखापतीवर हिमतीने मात करून तिने मैदानावर पुनरागमन केले. अधुनिक काळात गोलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारून झुलनने नव्या तंदुरुस्ती तंत्राशीही जुळवून घेतले.

विश्लेषण : मोबाइलमधून सिम कार्ड हद्दपार होणार?

भारतीय महिला क्रिकेटच्या दोन पिढ्यांमधील अखेरचा दुवा का?

शांता रंगास्वामी, डायना एडल्जी, मिताली राज यांच्यासह भारतीय महिला क्रिकेटमध्ये अर्थातच झुलनचे नाव सर्वांत आदराने घेतले जाते. या तिघींप्रमाणे झुलन दीर्घकाळापासून भारतीय क्रिकेटशी जोडली गेली आहे. सध्याच्या पिढीसाठी ती भारतीय महिला क्रिकेटच्या दोन युगांमधील अखेरचा दुवा आहे. झुलन आणि शिखा पांडे या दोघींनी अर्ध्या दशकाहून अधिक काळ भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली. काही कालावधीनंतर शिखाची कामगिरी खालावली. तिने भारतीय संघातील स्थानही गमावले. झुलन मात्र नव्या वारसदार येईपर्यंत टिकून राहिली. म्हणूनच ती भारताच्या दोन पिढ्यातील अखेरचा दुवा ठरते. झुलनचा वारसा पुढे नेणारी गोलंदाज सापडायला वेळ लागेल. परंतु, चिन्हे निश्चित आशादायक आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhulan goswami retired to play last match against england pmw
First published on: 24-09-2022 at 11:59 IST