Jihadi Drug Captagon Seized India Terrorism Connection : देशातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन रेजपिल’ ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय पथकाला यश आले. अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने नवी दिल्लीतील नेब सराई भागातून आणि गुजरातमधील मुंद्रा बंदरावरून तब्बल २२७.७ किलो ‘कॅप्टागॉन’ जप्त केले. या ड्रग्जला जगभरात ‘जिहादी ड्रग्ज’ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १८२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून या कारवाईसंदर्भातील माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर ‘जिहादी ड्रग्ज’ म्हणजे नेमके काय? त्याबाबत आतापर्यंत काय माहिती समोर आली? त्याविषयीचा हा आढावा…

अमित शाह पोस्टमध्ये काय म्हणाले?

जिहादी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केल्यानंतर अमित शाह यांनी अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोचे तोंडभरून कौतुक केले. “मोदी सरकार ड्रग्जमुक्त भारत करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणांनी जिहादी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या अमली पदार्थाची देशातील पहिलीच मोठी जप्ती करून एक ऐतिहासिक यश मिळवले आहे. मध्यपूर्वेतील देशांमधून पाठविण्यात आलेला ड्रग्जचा हा मोठा साठा जप्त करणे आणि एका परदेशी नागरिकाला अटक करणे, हे आमच्या ड्रग्जमुक्त धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. मी पुन्हा सांगतो की, भारतात येणाऱ्या किंवा देशाबाहेर पाठवल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या प्रत्येक ग्रॅमवर कठोर कारवाई केली जाईल,” असे शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

जिहादी ड्रग्ज नेमके आहे तरी काय?

अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने जिहादी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्याबाबत देशभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसीच्या माहितीनुसार, १९६० च्या दशकात जर्मनीमध्ये सर्वांत आधी या औषधाची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळात अतिचंचल मुलांवर उपचार करण्यासाठी, तसेच नैराश्य असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी या औषधाचा वापर केला जात होता. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, ‘अँफेटामाईन’ या प्रकारातील हे एक कृत्रिम उत्तेजक द्रव्य आहे. अमेरिकेत १९८१ पासूनच नियंत्रित पदार्थ कायद्याच्या पहिल्या सूचीमध्ये समावेश करून, त्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना भास होणे, दृष्टिदोष निर्माण होणे आणि मानसिक संतुलन बिघडणे अशा गंभीर समस्या निर्माण होत असल्याने ते वैद्यकीय क्षेत्रातून मागे घेण्यात आले होते. त्याशिवाय हृदयविकाराचा झटका, फेफरे येणे व भ्रम होणे अशा दुर्मीळ, पण गंभीर आजारांशीही या औषधाचा संबंध जोडला गेला.

जिहादी ड्रग्जवर अनेक देशांत बंदी

वृत्तांनुसार, या जिहादी ड्रग्जमध्ये अँफेटामाइन्स, कॅफिन, मेथअँफेटामाइन आणि इतर कृत्रिम रसायनांचे मिश्रण असते. या औषधाचे अत्यंत वाईट आणि घातक परिणाम लक्षात घेऊन, १९८० च्या दशकात अनेक देशांनी त्यावर पूर्णपणे बंदी घातली. नंतर संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सायकोट्रॉपिक पदार्थांच्या कराराच्या दुसऱ्या सूचीमध्ये जिहादी ड्रग्जचा समावेश करण्यात आला. भारतात या अमली पदार्थावर ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत कडक नियंत्रण आणि बंदी घालण्यात आली आहे. या जिहादी ड्रग्जवर जागतिक स्तरावर बंदी असली तरी २०१३ पर्यंत फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, लक्झेंबर्ग व नेदरलँड्स यांसारख्या काही युरोपीय देशांमध्ये नार्कोलेप्सीच्या उपचारासाठी त्याच्या मर्यादित वैद्यकीय वापरास परवानगी दिली होती. काळाच्या ओघात त्याची अधिकृत आणि कायदेशीर निर्मिती पूर्णपणे बंद झाली असली तरी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या माफियांकडून या अमली पदार्थाचे बेकायदा उत्पादन अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याचे समोर आले आहे.

जिहादी ड्रग्जचा दहशतवादाशी काय संबंध?

कायदेशीर उत्पादन आणि वैद्यकीय वापर पूर्णपणे बंद झालेला असतानाही पश्चिम आशियात अजूनही जिहादी ड्रग्जचा वापर होत असल्याचा दावा जागतिक माध्यमांनी केला आहे. ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’च्या अहवालानुसार, दक्षिण युरोप आणि पश्चिम आशियातील गुप्त अमली पदार्थ प्रयोगशाळांमध्ये या अमली पदार्थाची बेकायदा निर्मिती केली जाते. विशेषतः ते सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अमली पदार्थांपैकी एक मानले जाते. या प्रदेशात जप्त होणाऱ्या जिहादी अमली पदार्थांपैकी जवळपास ८० टक्के साठा एकट्या सौदी अरेबियामध्ये आढळतो. या प्रदेशातील उच्चभ्रू तरुणांकडून या अमली पदार्थांचा वापर मौजमजेसाठी आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याला ‘जिहादी ड्रग्ज’ हे टोपणनाव मिळण्यामागे एक गंभीर कारण आहे. इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांमधील दहशतवादी आपली सहनशक्ती, एकाग्रता आणि निर्भयता वाढविण्यासाठी या औषधाचा वापर करीत असल्याचा दावा विविध अहवालांमधून करण्यात आला आहे.

जिहादी ड्रग्जचे घातक दुष्परिणाम कोणते?

दहशतवाद्यांची सहनशक्ती, एकाग्रता व निर्भयता वाढविण्यासाठी हा अमली पदार्थ दिला जातो. त्यामुळे त्यांची सतर्कता वाढते, झोप उडते, थकवा जाणवत नाही आणि भूकही दडपली जाते. हा अमली पदार्थ घेणाऱ्या काही व्यक्तींना तात्पुरता अति आनंद आणि कमालीचा उत्साह जाणवत असल्याचा दावा केला जातो. सीरियातील गृहयुद्धाच्या काळात तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जिहादी ड्रग्जचा साठा सापडला होता. धक्कादायक बाब म्हणजे सीरियातील तत्कालीन बशर अल-असद सरकारच्या राजवटीचा या ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी आणि प्रादेशिक ड्रग्जमाफियांच्या जाळ्याशी थेट संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, जिहादी ड्रग्जच्या सेवनामुळे शरीरावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयाचे ठोके वेगाने वाढणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे, श्वासोच्छ्वास नेहमीपेक्षा अधिक वेगाने होणे, रक्तदाब अचानक वाढणे, तीव्र नैराश्य येणे, सततचा थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडणे, अशा गंभीर लक्षणांचा त्यामध्ये समावेश आहे. भारतामध्ये प्रथमच या अमली पदार्थचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांचे देशभरातून कौतुक होत आहे.