Har Har Mahadev Movie Screening: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर एरवी बॉक्स ऑफिसवर चर्चा झडणाऱ्या चित्रपटांवरून महाराष्ट्राचं राजकारण का ढवळून निघालंय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण याला कारणीभूत ठरलेत या चित्रपटातील काही संवाद आणि दाखवण्यात आलेला इतिहास. हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की त्याची परिणती थेट कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेमध्ये झाली. नेमकं काय आहे हे प्रकरण? या चित्रपटावरून एवढा वाद का सुरू आहे? ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये असं काय घडलं होतं की ज्यामुळे थेट आव्हाडांना अटक करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांना घ्यावा लागला?

नेमकं हे प्रकरण काय?

गा सगळा वाद सुरू झाला ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे. अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या या चित्रपटामध्ये शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारतोय. याशिवाय इतरही अनेत दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटामध्ये आहेत. स्वराज्याचे एक वीर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेचा पट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील काही संवाद आणि चित्रपटातील काही दृष्य यांच्यावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून तो प्रेक्षकांसमोर मांडला जात असल्याचा दावा आक्षेप घेणाऱ्यांकडून करण्यात आला.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश

चित्रपटावर आक्षेप काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीपासूनच या चित्रपटातील काही संवादांना आणि दृश्यांना विरोध केला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांना पाठिंबा देत जितेंद्र आव्हाडांनीही चित्रपटाच्या विरोधी भूमिका घेतली होती.

“या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं आहे ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे त्याच्याबरोबर विरोधात चित्रपटामध्ये आलं आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकणा असा मावळा कधी होता?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला होता. “शिवाजीमहाराजांच्या मांडीवरती झोपून आहे अफजलखान आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय. तसेच, बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांशी लढायला गेले होते असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. पण हे इतिहासात कुठे दिसलं? बाजीप्रभू हा शिवाजी महाराजांचा सच्चा सेवक होता”, असंही आव्हाडांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सर्व गोष्टींशी संबंधित पुरावे सादर केल्यानंतरच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे चित्रपटात कुठेही इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली नाही. केळूसकरांसारख्या मोठ्या इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकात शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील प्रसंगाचा संदर्भ दिला आहे. त्यावरूनच आम्ही ते दृश्य चित्रपटात घेतलंय”, असं स्पष्टीकरण देशपांडे यांनी दिलं होतं.

विवियाना मॉलमध्ये वाद पेटला!

दरम्यान, हा सगळा वाद एकीकडे सुरू असताना दुसरीकडे सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी यावरून ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मोठा वाद निर्माण झाला. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये सुरू असताना रात्री १० च्या सुमारास गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करून त्यांना बाहेर काढल्याचा आरोप मनसेनं केला. तर वाद घालणाऱ्या प्रेक्षकानं मद्यप्राशन केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शो सुरू असतानाच विवियाना मॉलमध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळालं.

या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काही प्रेक्षकांना मारहाण झाल्याचाही आरोप झाला. मनसेकडून याविरोधात पोलिसांत दाद मागण्यात आली. यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शो बंद पाडून चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना हुसकावून लावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच, बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत मागितल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘त्या’ वादग्रस्त घटनेबद्दल दिग्दर्शकाचे स्पष्टीकरण; म्हणाले…

बॉक्स ऑफिस ते राजकीय व्यासपीठ!

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाडांनी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकांचं समर्थन केलं जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि शरद पोंक्षेंसारख्या काही कलाकारांकडून हा गुंडगिरीचा प्रकार असल्याची परखड टीका केली जात आहे. तर मनसेकडून या घटनेनंतर ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या मोफत शोचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरचा हा मुद्दा राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा ठरला आहे.

सोमवारी विवियाना मॉलमध्ये झालेल्या या मारहाण प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असताना आज ठाणे पोलिसांनी या मारहाण प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. वर्तक नगर पोलीस स्टेशनला नोटीस देण्यासाठी म्हणून बोलवून नंतर अटक केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटद्वारे केला आहे. तसेच, जे मी केलेलंच नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असंही आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एकूणच हा चित्रपट आणि त्यातून झालेल्या वादानंतर आव्हाडांना झालेल्या अटकेमुळे मुंबई-ठाणे वर्तुळातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.