scorecardresearch

विश्लेषण : न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का असते?; तिच्या एका हातात तलवार अन् दुसऱ्या हातात तराजू का असतो?

न्यायदेवता अशी डोळ्यांवर पट्टी बांधून का आहे?, त्यामागील नेमकं कारण काय आहे? तिच्या हातातील वस्तू, डोळ्यांवरील पट्टीचा अर्थ काय आहे असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?

justice goddess the symbolism
या न्यायदेवतेच्या एका हातात तलवार असते तर दुसऱ्या हातात तराजू (फाइल फोटो) (justice goddess the symbolism)

न्याय हा मानवी समाज जीवनाचा आणि समाज सुरळीत कार्यरत राहील यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. जेव्हापासून मनुष्य समाज म्हणून एकमेकांसोबत राहू लागला आणि समाज व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हापासून न्यायाचा मुद्दा वेळोवेळी अधोरेखित केला गेला. अर्थात काळानुरुप न्यायदानाची प्रक्रिया आणि पद्धतही बदलत आली. कोणत्याही प्रांतामध्ये प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी न्याय हा फार महत्वाचा घटक असतो. एखाद्या प्रांची समृद्धी आणि समाज व्यवस्था टीकवण्यासाठी न्याय हा फार महत्वाचा घटक आहे. जेव्हा जेव्हा आपण न्यायासंदर्भात बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर न्यायदेवतेची प्रतिमा उभी राहते. या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते.

एका हातात तलवार तर दुसऱ्या हातामध्ये तराजू असलेली न्यायदेवता आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र ही न्यायदेवता अशी डोळ्यांवर पट्टी बांधून का आहे?, त्यामागील नेमकं कारण काय आहे? तिच्या हातातील वस्तू, डोळ्यांवरील पट्टीचा अर्थ काय आहे असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का? अर्थात पडले असतीलच. पण खरोखरच हे असं का आहे यासंदर्भात सांगायचं झाल्यास ही न्यायदेवतेची मूर्ती प्रमुख्याने इजिप्त, ग्रीक आणि रोमन सम्रज्यामध्येच दिसून येते. याच मोठ्या सम्राज्यांपासून न्यायदेवतीच्या मूर्तीचा जगभरामध्ये स्वीकार करण्यात आला आणि ती न्यायाचं प्रतिक म्हणून सर्वमान्य झाली. पण ही न्यायदेवता नेमकी कोण होती आणि त्याचा इतिहास काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही, त्यावर टाकलेली ही नजर…

तीन मुख्य संस्कृतींचा प्रभाव…
लेडी जस्टिस नावाने ओळखली जाणाऱ्या न्यायदेवताचा उल्लेख इजिप्तमध्ये देवी माट, ग्रीसमध्ये देवी थेमिस आणि डाइक किंवा डाइस या नावाने आढळतो. माट ही देवी इजिप्तमधील संतुलन, एकरुपता, न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेचं प्रतिक मानलं जाते. तर ग्रीसमध्ये थेमिस देवी सत्य, कायदा आणि न्यायव्यवस्थेचं प्रतिक आहे. तर डाइकच्या माध्यमातून योग्य न्याय आणि नैतिक व्यवस्था या गोष्टी अधोरेखित केल्या जातात. तर दुसरीकडे रोमन मान्यतांनुसार जस्टीशिया देवीला न्यायाचं प्रतिक मानलं जातं. याच वेगवगेळ्या संकल्पनांमधून न्यायदेवतेची संकल्पना जगभरामध्ये पसरली.

त्या पट्टीचा अर्थ काय?
न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू आणि तलावर असण्याबरोबच तिच्या डोळ्यांवर पट्टी असणं हे न्याय व्यवस्थेच्या नैतिकतेचं प्रतिक असल्याचं मानलं जातं. डोळ्यांवर पट्टी असण्यासंदर्भात बोलायचं झालं तर हे समानतेचं प्रतिक आहे. ज्याप्रमाणे देव सर्वांना एकाच नजरेने पाहतो, तो कोणाबद्दलही भेदभाव करत नाही, त्याचरप्रमाणे न्यायदेवताही स्वत:समोरच्या व्यक्तींना एकाच नजरेने पाहते, हे अधोरेखित करण्यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी असते असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे काही ठिकाणी असं मानलं जातं की न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यास १७ व्या शतकामध्ये सुरुवात झाली. मात्र या मान्यतेमध्ये डोळ्यांवरील पट्टीचा अर्थ हा अगदी उलट आहे. ही पट्टी न्यायव्यवस्थेचं आंधळेपण दाखवतं असं या तर्कानुसार मानलं जातं.

हातात तराजू का असतो?
न्यायदेवतेच्या हातामधील तराजू हा इजिप्तमधील संस्कृतीमधून आल्याचं सांगितलं जातं. इजिप्तमध्ये तराजूला न्यायाचं प्रतिक मानलं जातं. तसेच तराजू हा संतुलनाचंही प्रतिक आहे. न्यायदान करताना एकाच पक्षावर जास्त लक्ष देता येत नाही असं या तराजूच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असतो. दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची समान संधी असते आणि त्यानंतरच न्यायदान केलं जातं. दोन्हीकडील बाजू ऐकून घेणं हे न्यायदान करणाऱ्याचं कर्तव्य समजलं जातं. त्याचं प्रतिक म्हणून न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू असतो.

तलवार काय दर्शवते?
न्यायदेवतेच्या हातामधील तलवारीलाही फार महत्व आहे. ही तलवार कधी खालच्या दिशेने टोक करुन असते तर कधी हातामध्ये पकडलेली असते. ही तलावर प्राधिकरण म्हणजेच अथॉरिटी आणि शक्ती म्हणजेच पॉवरचं प्रतिक असते. न्यायसंदर्भात दिलेला निर्णय लागू केला जावा आणि तो स्वीकारावा हे दर्शवण्याचं प्रतिक म्हणजे ही तलवार असते. न्यायदान केल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी हे दर्शवण्यासाठी तलवार न्यायदेवतेच्या हाती असते. ही तलवार न्यायदानाचे सामर्थ्य दर्शवते.

महिलांची संख्या चिंतेचा विषय…
जगभरामध्ये मागील काही दशकांपासून अशापद्धतीची मागणी होत आहे की न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा वाढला पाहिजे. खास करुन मुख्य म्हणजेच सर्वोच्च न्यायालयांमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये महिलांची संख्या फारच कमी आहे. भारत आणि अमेरिकेची न्यायव्यव्सथा ही समान आहे. या ठिकाणी न्यायाधिशांची निवड आणि नियुक्ती एक दिर्घ प्रक्रिया असते. मात्र या देशांमध्येही न्यायव्यवस्थेमध्ये महिलांची संख्या जास्त आहे असं नाहीय. या देशांमध्येही न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये महिलांची संख्या कमी असण्याची समस्या आहे. मात्र या दोन देशांबद्दलची सकारात्मक बाब म्हणजे महिलांची संख्या वाढताना दिसत आहे.

भारतामधील परिस्थिती काय?
भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये महिलांच्या सहभागाचा मुद्दा वारंवार चर्चेत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८९ साली म्हणजेच जवळजवळ चार दशकांनंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली महिला न्यायाधीश मिळाली होती. आतापर्यंत भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ११ महिलांनी न्यायधीशांची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयामधील ३३ न्यायधीशांपैकी केवळ चार महिला न्यायाधीश आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Justice goddess the symbolism of lady justice and law scsg

ताज्या बातम्या