कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली आमदार रवींद्र चव्हाण यांनी या मैत्रीला ‘शोलेची दोस्ती’ असे म्हटले. शिवसेना शिंदे गटापासून मनसेलाच अधिक धोका असल्याचे चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याला काय पार्श्वभूमी होती?

कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरपदाची निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमधील वाद काही प्रमाणात थांबला. महापालिकेतील ठेकेदारी, विकास कामे या दोन्ही पक्षांकडून सामंज्यसाने मार्गी लावले जाऊ लागले. भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील दुरावा कमी होत असल्याची चर्चाही सुरू झाली. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून या दोन पक्षातील संबंध पुन्हा एकदा ताणले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत खासदार शिंदे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीकडे भाजपचे स्थानिक नेते फिरकलेच नाहीत. हे कमी होते म्हणून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिंदे आणि मनसेच्या मैत्रीचा उल्लेख ‘शोले दोस्ती’ असा केला. शोले चित्रपटात एक मित्र गब्बर डाकूसोबत लढताना मरण पावतो. कल्याण डोंबिवलीतील राजकारणात गब्बर कोण आणि शिंदे-मनसेच्या ‘शोले’ मैत्रीत कोणाची ही अवस्था होणार याची खमंग चर्चा आता चव्हाणांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

कल्याण डोंबिवली भाजप-शिंदे संघर्षाचे केंद्र कसे ठरत आहे?

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले. असे असले तरी या दोन पक्षात निवडणुकांच्या आधीपासूनच संघर्ष पहायला मिळाला. एकमेकांचे प्रभावी नेते गळाला लावण्याची स्पर्धा दोन्ही बाजूंनी दिसून आली. हा संघर्ष इतका टोकाला पोहचला की शिंदे यांच्या पक्षाच्या काही मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर हे फोडाफोडीचे राजकारण काही काळ थांबले. तरीही कल्याण डोंबिवलीत आपला महापौर असावा अशी स्पर्धा दोन्ही पक्षात होती. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत भाजपचे दोन आमदार आहेत. त्यामुळे यावेळी ही महापालिका शिवसेनेच्या हातून हिसकावून घेण्याची उत्तम संधी पक्षाला आहे असे भाजप नेत्यांना वाटत होते. प्रत्यक्षात दिल्लीवरुन झालेल्या युतीमुळे भाजपला शिंदेसेनेबरोबर दोन हात करता आले नाहीत.

शिंदे आणि मनसे यांच्यात जवळीक कशी झाली ?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५४ तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले. फारशी ताकद नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेही नऊ नगरसेवक येथे निवडून आले. भाजपला मिळालेले यश पाहून सत्तेच्या राजकारणात या पक्षाचा हस्तक्षेप वाढेल या विचाराने शिवसेनेत अस्वस्थता होती. त्यातूनच मनसेच्या नगरसेवकांना सोबत घेण्याचा निर्णय शिंदे यांच्या शिवसेनेने घेतला. या भागातील मनसेचे नेते राजू पाटील हे एकेकाळी रविंद्र चव्हाण यांच्या मित्रयादीत मोडत. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात तर नेहमीच वाद रंगलेला असायचा. अशा परिस्थितीत युतीच्या राजकारणात भाजपचा प्रभाव कमी रहावा यासाठी खासदार शिंदे यांनी राजू पाटील यांच्याशी जुळवून घेतले आणि मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळावला. मनसेच्या या टेकूच्या सहाय्याने महापालिकेच्या राजकारणात शिंदेसेनेला भाजपचा प्रभाव कमी करता आला आहे. याची बोच अर्थातच भाजप नेत्यांना आहे.

समझोत्यानंतर आता पुन्हा संघर्ष का वाढला ?

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने शिंदे गट, भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर भाजप, शिंदे गटाच्या कल्याण डोंबिवलीतील जिल्हा, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये पालिका निवडणुकीत युती म्हणून लढतोय. त्यामुळे आपण युती धर्माचे पालन करत एकमेकांचे पदाधिकारी, नगरसेवक फोडायचे नाहीत, असे अलिखित स्वरूपात ठरले. या करारानंतर शिंदे गट, भाजपने मागील सात महिन्यात इच्छा असुनही एकमेकांचे पदाधिकारी, नगरसेवक आपल्या पक्षात दाखल करून घेतले नाहीत. या अलिखित कराराचे तंतोतंत पालन दोन्ही पक्षाकडून केले जात होते. त्यामुळे कुरबुरीला पूर्णविराम होता. मात्र काही दिवसापूर्वी भाजपला विश्वासात न घेता शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे डोंबिवली, कल्याणमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात दाखल करून घेतले. त्यामुळे हा समझोता आता संपल्यात जमा आहे.

कोण जय, कोण विरू? चव्हाणांच्या ‘शोले मैत्री‘चा नेमका अर्थ काय ?

श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीकडे पाठ फिरविल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आता शिंदे -मनसे मैत्रीला ‘शोले दोस्ती’ अशी उपमा दिली आहे. ‘शोले’ चित्रपटात एका मित्राला डाकू गब्बरबरोबर लढताना मृत्यू येतो. त्यामुळे शिंदे-मनसेची ही मैत्री टिकणारी नाही असा संदेश चव्हाण यांनी एकप्रकारे दिला आहे. शिवाय यात एका मित्राचा बळी जाणारच आणि अर्थातच भाजपला याचा काहीही त्रास नाही असेही त्यांनी सूचित केले. कल्याण डोंबिवलीत मोठा मित्र अर्थातच शिंदे पक्ष आहे. त्यामुळे ‘शोले’मधील या मैत्रीत ‘जय’ कोण असेल हे सांगण्याची गरज नाही. चव्हाण यांच्या या टोलेबाजीत एकप्रकारे शिंदे यांच्या पक्षाच्या एककल्ली वृत्तीवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला गेल्याची आता चर्चा आहे. वेळ येईल तेव्हा शिंदे यांचा पक्ष मनसेचा घास घेईल हे एकप्रकारे सूचित करुन चव्हाणांनी पुन्हा एकदा खासदार शिंदे यांच्यावर नेम साधला आहे.