कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या लढतीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवड झाल्यानंतर त्यांनी प्रचारावर बऱ्यापैकी पकड घेतलेली दिसते. उपाध्यक्षपदासाठी (रनिंग मेट) त्या कुणाची निवड करतात, याविषयी उत्सुकता होती. काही नावांची चर्चा होती. अखेरीस त्यांनी मिनेसोटा राज्याचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांची निवड करून विश्लेषकांना बऱ्यापैकी धक्का दिला आहे. विश्लेषकांच्या मते पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जॉश शापिरो यांना अधिक संधी होती. कोण आहेत टिम वॉल्झ? टिम वॉल्झ हे सध्या मिनेसोटा राज्याचे गव्हर्नर आहेत. त्याचबरोबर ते डेमोक्रॅटिक गव्हर्नर परिषदेचे विद्यमान अध्यक्षही आहेत. माजी शिक्षक आणि शाळेच्या फुटबॉल (अमेरिकन रग्बी) संघाचे प्रशिक्षक अशी त्यांची आणखी एक ओळख. त्यांनी अनेक वर्षे नॅशनल गार्ड या अमेरिकी निमलष्करी दलातही सेवा बजावली. ग्रामीण भागात वाढलेले आणि खास ग्रामीण बाजाचा स्पष्टवक्तेपण आणि तिरकसपणा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली जातात. हेही वाचा - विश्लेषण : जगभरात मुलींवर अत्याचार वाढताहेत? जोडीदारच सर्वाधिक वेळा दोषी? काय सांगतो आरोग्य संघटनेचा अहवाल? राजकीय कारकीर्द… मिनेसोटा हे अनेक काळ रिपब्लिकन विचारसरणीचे राज्य मानले जायचे. त्या राज्यात टिम वॉल्झ सलग दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून निवडून आले आहेत हे विशेष. गव्हर्नर होण्यापूर्वी वॉल्झ १२ अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रतिनिधिगृहाचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकनबहुल मतदारसंघात दोन वेळा विजय मिळवला होता. २०१८ पासून मिनेसोटाचे गव्हर्नर आणि त्या राज्याचे कायदेमंडळ असे दोन्ही डेमोक्रॅटिक आहे याचे श्रेय निःसंशय वॉल्झ यांचेच. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने रो वि. वेड खटल्यातून महिलांना मिळालेला स्वेच्छा गर्भपाताविषयीचा अधिकार गतवर्षी काढून घेतला, तेव्हा स्वेच्छा गर्भपाताचा कायदा नव्याने करून घेणाऱ्या राज्यांमध्ये मिनेसोटाचा क्रमांक पहिला होता. मुदतपूर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना आणि अशा निवडणुकांमध्ये अध्यक्षीय पक्षाच्या विरोधात (डेमोक्रॅटिक) सर्वसाधारण कौल असताना, वॉल्झ यांनी दोन्ही सभागृहे राखून मिनेसोटाचे कायदेमंडळ डेमोक्रॅटिक पक्षाकडे राखले. बलस्थाने आणि उणिवा… टिम वॉल्झ हे कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये पहिले होते. त्यांचे वाढीव वय आणि कमला हॅरिस यांचे अश्वेत असणे, तसेच त्या वॉल्झ यांच्याहून तरुण असल्यामुळे या जोडीची तुलना बराक ओबामा आणि जो बायडेन जोडीशी केली जात आहे. कारण ओबामा यांनीही त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाचे बायडेन यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती. मात्र बायडेन हे स्वतः नेहमीच अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होते. वॉल्झ यांची अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाला पसंती मिळाली, याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते ग्रामीण भागातील आहेत आणि गोरे आहेत. ग्रामीण भागांतील गोरा मतदार हा अमेरिकेत प्राधान्याने रिपब्लिकन पक्षासाठी मतदान करतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा हुकमी एक्का खिळखिळा करण्यासाठी वॉल्झ यांच्या उमेदवारीची मदत होईल, असे डेमोक्रॅटिक नेतृत्वाला वाटते. हेही वाचा - पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? रिपब्लिकन पक्षावर थेट हल्ला चढवण्याचा वॉल्झ यांचा अनुभव दांडगा आहे. ट्रम्प यांच्यासारख्या रिपब्लिकन नेत्यांचा उल्लेख ते ‘वियर्ड’ (विचित्र) असा करतात. अमेरिका माहीत आहे असा दावा एक फसलेला बिल्डर (ट्रम्प) आणि एक व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हान्स) कसा काय करू शकतात. त्यांना अमेरिका अजिबात ठाऊक नाही, असे टिम वॉल्झ निक्षून सांगत असतात. पण पेनसिल्वेनियाचे गव्हर्नर जॉश शापिरो यांची उपाध्यपदासाठी निवड न केल्यामुळे ज्यू मतदार डेमोक्रॅटिक पक्षापासून दुरावू शकतो, असा अंदाज काही विश्लेषक व्यक्त करतात. तसेच, गर्भपात, मेडिकेअर अशा मुद्द्यांवर वॉल्झ यांची मते त्यांना अतिडावीकडचे ठरवतात आणि यावर आता रिपब्लिकन प्रचारात भर देण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब हॅरिस-वॉल्झ यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.