-डॉ. देवदत्त पोखरकर
Discover Kanak Champa tree benefits, medicinal uses, and environmental significance: आपल्या आसपास अनेक झाडे असतात; आपण त्यांच्या सावलीतून जातो, त्यांच्या फुलांचा गंध अनुभवतो, पण त्यांच्या नावाची किंवा वैशिष्ट्यांची माहिती नसते. पुराणकाळापासून आपली सोबत करत आलेला मचकुंद उर्फ कनक चंपा हाही अनेकदा अशाच दुर्लक्षित वृक्षांपैकी एक ठरतो.
काँक्रिटिकरणाच्या काळातलं हे आहे, त्याच्या अस्तित्वाचं महत्त्व नि मोल…
तू डिट्टो त्याच्यासारखा दिसतोस…अशा कौतुकात प्रेमाचाच अंश अधिक असतो. प्रत्यक्षात एक माणूस दुसऱ्यासारखा नसतोच मुळी. प्रत्येकाचं रुप निराळं, रंग आगळे, ढंग तर त्याहून वेगळा. वृक्षांचंही अगदी तसंच. प्रत्येक वृक्ष स्वतःचं वेगळंपण घेऊन उभा असतो. त्याची ओळख जितकी दिसण्या-असण्यावरून होते, तशीच त्याच्या उपयुक्ततेवरूनही होते. असाच वर्षभर मोठाल्या हिरव्या पानांचा अंगरखा चढवून शांतपणे उभा असतो, बहुगुणी, बहुपयोगी कनक चंपा. काहीसा दुर्लक्षित राहणारा हा वृक्ष फुलांनी बहरला की, त्याच्या देखण्या नि आकर्षक अस्तित्वाची खूण सहज पटते.
सर्वव्यापी, सर्वसाक्षी नोंद
वनस्पती शास्त्रीय भाषेत कनक चंपाचं नाव आहे, टेरोस्पर्मम अॅसरिफोलियम (Pterospermum acerifolium). कूळ आहे, माल्वेसि (Malvaceae). या वृक्षाला हिंदी भाषेत म्हणतात, कनकचंपा किंवा मचकुंद. मराठीत ओळख मचकुंद अशी. तर संस्कृतमध्ये मुचकुंद (Muchukunda) अशी या वृक्षाच्या नावाची नोंद आहे. इंग्लिशमध्ये Kanak Champa तसंच Maple-leaved Bayur Tree अशी नावं प्रचलित आहेत.
पुराणाशी काय याचं नातं?
वृक्षाला असलेल्या मचकुंद या नावामागे भारतीय सांस्कृतिक परंपरेची खास अशी छटा आहे. भारतीय पुराण कथांमध्ये मुचकुंद नावाच्या राजाची कथा प्रसिद्ध आहे. हा राजा महापराक्रमी होता म्हणतात. तो देवांच्या रक्षणासाठी राक्षसांशी लढला. त्याला निद्रेचं वरदान होतं. निद्रा हे शांतीचं प्रतीक. या राजाच्या नावावरूनच वृक्षाला मुंचकुंद हे नाव पडलं. थोडक्यात, ‘मुचकुंद’ हे नाव भारतीय परंपरेत आधीपासूनच परिचित आहे.
वनस्पतीवैभव कोणाचं?
कनकचंपा अर्थात मचकुंद हा पृथ्वीवर फुलून आलेल्या असंख्य नैसर्गिक कथांचा एक सुंदर भाग आहे. त्याच्या फुलांचं सौंदर्य डोळ्यांना सुखावतं, गंधानं मन प्रसन्न होतं आणि त्याची वनस्पतीशास्त्रीय वैशिष्ट्यं निसर्गाच्या अद्भुत रचनेची आपल्याला हरघडी जाणीव करून देतात. म्हणूनच मचकुंद हा केवळ एक सुंदर वृक्ष राहात नाही, तर भारतीय वनस्पतीवैभव, लोकपरंपरा आणि जैवविविधतेचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो.

हिरवाईच्या जोडीला छत्रछायासुद्धा
कनक चंपाचं अस्तित्व मुख्यतः भारतीय उपखंडातील उष्ण आणि दमट प्रदेशांमध्ये आढळतं. भारतातील अनेक भागांत त्याची लागवड शोभेच्या उद्देशानं केली जाते. उष्ण हवामान, पुरेसा ओलावा आणि वाढीसाठी योग्य जागा मिळाल्यास तो मोठा आकार धारण करू शकतो. त्याच्या वाढलेल्या फांद्यांमुळे विस्तृत छत्र तयार होते. त्यामुळे मोठ्या मोकळ्या जागांमध्ये लावल्यास हा वृक्ष परिसराला हिरवाई देण्याबरोबरच आवश्यक छत्रछायाही मिळवून देतो.
विश्वासार्ह शोभिवंत निसर्गसाथी
कनकचंपाची पहिली ठळक ओळख म्हणजे, नजरेत भरणारी मोठी पानं. पानांचा आकार मेपलच्या पानांसारखा असतो. पानांच्या कडा खोलवर विभागलेल्या असतात. एका बाजूला मोठ्या आकाराची हिरवी पानं आणि दुसऱ्या बाजूला उमललेली आकर्षक फुलं, असं या वृक्षाचं रुप अत्यंत मोहक दिसतं. उद्यानं, संस्थांचं आवार तसंच मोठ्या परिसरामध्ये खात्रीनं शोभा देणारा या विश्वासानं हा वृक्ष लावला जातो.
कोण म्हणतं, हे केवळ फूल आहे?
कनकचंपाची पानं नजरेत भरणारी असली तरीही, या वृक्षाची खरी ओळख फुलांमुळे होते. फुलं तुलनेनं मोठी, पांढऱ्या आणि फिकट पिवळसर पांढऱ्या (क्रीम) रंगाच्या छटांमध्ये उमलतात. फुलांच्या पाकळ्यांची रचना साधी पण, अत्यंत आकर्षक असते. फुलांना मंद, गोड सुगंध असतो. स्पेशली, संध्याकाळच्या वातावरणात तुम्ही कनक चंपाच्या सानिध्यात आलात, तर हा गंध प्रकर्षाने जाणवतो. या झाडावर मोठ्या संख्येनं फुले उमलली की हिरव्या पानांच्या सोबतीनं उमललेली फुलं एखाद्या नैसर्गिक दागिन्यासारखी भासतात. पानाफुलांनी साधलेला हा सुंदर नैसर्गिक विरोधाभास बघणाऱ्यांचं मन मोहवून टाकतो. ‘कनक चंपा’ हे नाव त्याच्या या आकर्षक फुलांमुळे अधिक अर्थपूर्णही वाटतं.
पंख तेही बियांना?
बरं, केवळ आकर्षक पानं आणि फुलं एवढीच कनकचंपाची खासियत नाही. या वृक्षाला लगडणारी फळंसुद्धा वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या मोलाची आहेत. कनकचंपाला येणारी फळं काहीशी लांबट आकाराची असतात. त्यात अनेक बिया आणि बियांभोवती पंखासारखी रचना आकारास आलेली असते. वाऱ्याच्या मदतीनं बियांचा प्रसार होण्यासाठी ही रचना चांगलीच उपयोगी ठरते. टेरोस्पर्मम या प्रजातीच्या नावातही याच वैशिष्ट्याचा संदर्भ आला आहे. ग्रीक भाषेत pteron म्हणजे ‘पंख’ आणि sperma म्हणजे ‘बी’; म्हणजेच ‘पंख असलेले बी’ असा या शब्दाचा अर्थ. वनस्पतींच्या सुलभ बीजप्रसारासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या जादुई युक्त्यांपैकी ही एक सुंदर रचना मानली जाते.
औषधी गुण ते काय ?
भारतातील अनेक वृक्षांप्रमाणे मुंचकुंदामध्येही औषधी गुणधर्म असल्याचे उल्लेख लोकपरंपरेत आढळतात. आयुर्वेदात मुचकुंद वा कनक चंपा या झाडाची पानं, फुलं, कफ आणि पित्त या वातदोषांवर गुणकारी औषध म्हणून उपयोगी ठरतात. श्वसनविकार, जखमा भरणं, पचनशक्ती सुधारणं, सांधेदुखी दूर करणं यासाठीही कनक चंदा बहुगुणी सिद्ध होतो. अर्थात, आयुर्वेदाची किंवा पारंपरिक ट्रिटमेंट प्रत्येकालाच लागू पडतेच असं नाही, त्यामुळे या झाडाचा औषध म्हणून वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरावं.
आश्रयस्थान कोणाचं?
कोणताही वृक्ष हा कोणी एकांडा, आत्मनिर्भर घटक नसतो. जैवविविधतेनं नटलेलं ते एक जिवंत,सळसळतं नि डोलतं बेट असतं. वेगवेगळे पक्षी, कीटक-कृमी यांचं ते हक्काचं आश्रयस्थान असतं. आश्रयाच्या बदल्यात हे पक्षी नि कीटक निसर्गाच्या युगानुयुगे सुरु असलेल्या गाण्यात खंड पडू देत नाहीत. म्हणूनही गजबजलेल्या शहरांमध्ये वाढत्या काँक्रिटीकरणाच्या सापळ्यात अडकलेल्यांसाठी कनक चंपासारख्या बहुगुणी वृक्षांचं महत्त्व लाखपटींनी वाढतं.
क्राँक्रिटीकरण टाळा, कनक चंपा रुजवा
मचकुंद या वृक्षाकडे केवळ शोभेचा वृक्ष या नजरेनं पाहण्यापेक्षा शहरी जैवविविधतेच्या दृष्टीनेही मोलाचा असलेला घटक या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. इतकंच नव्हे, तर शहरांमध्ये देशी किंवा प्रदीर्घकाळ स्थानिक पर्यावरणाशी जुळवून तगून राहिलेल्या वृक्षांचं संवर्धन करणं अत्यावश्यक आहे. आज रस्त्यांचं रुंदीकरण, इमारतींची बेफाम वाढ आणि झपाट्यानं होणारं नागरीकरण यामुळे मोठ्या वृक्षांची संख्या घटत चाललीये. अशा परिस्थितीत कनक चंपासारख्या माणसाला सुगंधी सावली देणाऱ्या जुन्या वृक्षांची नोंद, संवर्धन आणि योग्य ठिकाणी नवीन लागवड करणं हीच काळाची खरी गरज आहे.
