scorecardresearch

विश्लेषण : कंगना रणौतच्या बहिणीवरही झालेला अ‍ॅसिड हल्ला; ५२ वेळा झालेल्या सर्जरीतून सावरली रंगोली, नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

यामुळे तिचं मानसिक संतुलन चांगलंच बिघडलं होतं

kangana and rangoli
फोटो : लोकसत्ता ग्राफीक टीम

दिल्लीमध्ये १४ डिसेंबर रोजी (बुधवारी) अ‍ॅसिड हल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला. द्वारका परिसरामध्ये एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. अ‍ॅसिड हल्ल्याचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणाबाबत अभिनेत्री कंगना रणौतने आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच तिने एक धक्कादायक खुलासाही केला आहे.

कंगना इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंगनाने म्हटलं, “मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी बहीण रंगोली चंदेलवर रस्त्यावरील एका अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड हल्ला केला होता. ५२ सर्जरी, मानसिक तसेच शारीरिक त्रासाचा तिला सामना करावा लागला. आमचं कुटुंब उद्धवस्त झालं होतं.” कंगनाच्या बहीणीवर हा हल्ला नेमका कसा झाला आणि त्यानंतर त्यातून ती कशी सावरली आणि कंगनाने तिची कशी मदत केली याविषयी आपण जाणून घेऊया.

आणखी वाचा : कियारा अडवाणीला करायचं होतं आलिया भट्टच्या या चित्रपटात काम केलं; मुलाखतीदरम्यान व्यक्त केली खंत

रंगोली केवळ २१ वर्षांची असताना डेहराडूनमध्ये रस्त्यावरील एका गुंडाने तिच्या चेहेऱ्यावर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहेरा विद्रूप करायचा प्रयत्न केला होता. यामुळे तिच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली, शिवाय तिचा एक कान आणि एका ब्रेस्टलादेखील गंभीर दुखापत झाली. त्यानंतर २ ते ३ वर्षात तिच्यावर तब्बल ५२ शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे तिचं मानसिक संतुलन चांगलंच बिघडलं होतं. कंगनाने याबद्दल खुलासा केला होता. रंगोलीने बोलणं बंद केल्याने कंगनाची चिंता चांगलीच वाढली होती. ती फक्त शून्यात बघत बसत असे.

एका मुलाखतीमध्ये रंगोलीच्या मानसिक स्थितिबद्दल कंगनाने स्पष्टीकरण दिलं होतं. ती म्हणाली, “तेव्हा रंगोली एका एयर फोर्स ऑफिसरबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. या अपघातानंतर जेव्हा त्याने रंगोलीचा चेहेरा पाहिला तेव्हा तो रंगोलीला कायमचा सोडून गेला. तरीही रंगोली काहीच बोलत नव्हती. डॉक्टर म्हणाले तिच्या मनावर या गोष्टीचा मोठा आघात झाला आहे.”

आणखी वाचा : ‘गांधी-गोडसे’ या विचारधारांमधील युद्ध उलगडणार मोठ्या पडद्यावर; चित्रपटातून प्रसिद्ध दिग्दर्शकाचं ९ वर्षांनी पुनरागमन

त्या दिवसांत कंगनाने कधीच रंगोलीला एकटं सोडलं नाही. कंगना जिथे जाईल तिथे ती रंगोलीला बरोबर घेऊनच जायची. कंगनाच्या योगा क्लासलासुद्धा रंगोली यायची. तिथेच तिला योगाची आवड निर्माण झाली आणि ती नियमित योगा करू लागली. त्यानंतर ती योगामध्ये एवढी पारंगत झाली की स्वतःच्या या परिस्थितीशी ती स्वतःच झगडायला शिकली. शिवाय या अपघातात एका डोळ्याची गमावलेली दृष्टीदेखील तिने योगाच्या बळावर परत मिळवली. २०१७ मध्ये देहराडून पोलिसांनी रंगोलीवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटकदेखील केली. सध्या रंगोली कंगनाबरोबरच राहत असून ती कंगनाची मॅनेजर म्हणून काम बघते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 17:32 IST

संबंधित बातम्या