Kangana Ranaut Statement on High Protein Intake : हाय-प्रोटीन डाएट, प्रोटीन शेक आणि इंटरमिटंट फास्टिंग हे आता तरुणाईसाठी ट्रेंड बनले आहेत. अशातच अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने ‘जास्त प्रोटीन खाल्ल्याने माणसाची माणूस मंद होतो,’ असा दावा केला आहे. तसेच प्रोटीन शेक आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाण्याव्यतिरिक्त पारंपारिक भारतीय आहार घ्यावा, असा सल्लाही कंगनाने दिला. विविध देशांमधील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर बोट ठेवत तिने तेथील प्रोटीनच्या आहारासंबंधी भाष्य केले आहे. भारतीय लोकांमधील समतोल आहाराच्या सवयीमुळे देशात कॅन्सरचे प्रमाण कमी आहे, असेही ती म्हणाली.

कंगना रणौतच्या या विधानानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी पारंपरिक भारतीय आहाराचे समर्थन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, तर काहींनी ‘प्रोटीनमुळे मेंदूवर परिणाम होतो का?’ ‘जास्त प्रोटीन खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का?’ असे प्रश्न उपस्थित केले.

मात्र, डॉक्टरांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते, सोशल मीडियावरील चर्चेइतका हा विषय सरळ नाही. शरीरासाठी प्रोटीन हे अत्यावश्यक पोषकद्रव्य असून स्नायूंची वाढ (Muscles), ऊतींची दुरुस्ती (Body tissues), रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे आणि एकूण आरोग्य टिकवण्यासाठी त्याची महत्त्वाची भूमिका असते. सध्याच्या वैज्ञानिक संशोधनानुसार, केवळ प्रोटीन खाल्ल्यामुळे कर्करोग होतो किंवा जास्त प्रोटीनमुळे निरोगी व्यक्तीच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो, असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

डॉक्टरांच्या मते, कर्करोग होण्यामागे केवळ आहार नव्हे, तर अनुवांशिकता, वाढते वय, जीवनशैली, तंबाखू व मद्याचे सेवन, लठ्ठपणा, संसर्ग, पर्यावरणातील घटक आणि आहार अशा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे केवळ प्रोटीनला त्यासाठी जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही.

करोल बाग येथील एमओसी कॅन्सर केअरच्या वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. तन्वी सिंह यांनी प्रोटीनबाबतची शंका दूर केली आहे. त्या म्हणाल्या, लोकांनी प्रोटीनची भीती बाळगण्याची गरज नाही. खरा प्रश्न प्रोटीनमध्ये नसून ते कोणत्या स्रोतांतून घेतले जाते आणि संतुलित आहारात त्याचे प्रमाण किती आहे, याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे.

Kangana Ranaut Statement on High Protein Intake

जास्त प्रोटीन खाल्ल्याने मेंदूवर परिणाम होतो का?

‘जास्त प्रोटीन खाल्ल्याने माणूस मंद होतो,’ असा दावा कंगना रणौतने केला असला, तरी याला सध्या कोणताही ठोस वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

उलट, शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन आवश्यक असते. स्नायूंची वाढ, हार्मोन्सचा समतोल आणि एन्झाइम्सची निर्मिती यासोबतच शरीराच्या अनेक जैविक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावत असतं.

तज्ज्ञांनी नमूद केले की, मेंदूच्या कार्यासाठीही प्रोटीन आवश्यक असते. प्रोटीनमधील अमिनो अॅसिड्सच्या मदतीने मूड, स्मरणशक्ती आणि विचारशक्ती नियंत्रित करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार होतात.

संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात प्रोटीन घेत असलेल्या निरोगी व्यक्तींच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रोटीनचा विपरीत परिणाम होतो, असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे सध्या उपलब्ध नाहीत, असे तज्ज्ञ नमूद करतात.

प्रोटीनमुळे कर्करोगाचा धोका वाढतो का?

डॉ. तन्वी सिंह यांच्या मते, सध्या तरी प्रोटीनमुळे थेट कर्करोग होतो, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

त्यांच्या मते, प्रोटीन हे शरीरासाठी अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे. मात्र, प्रोटीन आणि कर्करोग यांचा संबंध अनेकांना वाटतो तितका सरळ नाही. आपण कोणत्या प्रकारचे प्रोटीन खातो, एकूण आहार कसा आहे, जीवनशैली कशी आहे आणि व्यक्तीची आरोग्यस्थिती कशी आहे, यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.

डॉ. सिंह स्पष्ट करतात की, कर्करोगासाठी एखादा एकच पदार्थ किंवा पोषकद्रव्य जबाबदार धरता येत नाही. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, संसर्ग, पर्यावरणातील प्रदूषण, अनुवांशिकता आणि वाढते वय यांसारखे घटक कर्करोगासाठी कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे केवळ प्रोटीनच्या सेवनामुळे कर्करोग होतो असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

प्रोटीनचा स्रोतही तितकाच महत्त्वाचा

आहारतज्ज्ञांच्या मते, सर्व प्रकारचे प्रोटीन समान दर्जाचे नसतात. त्यामुळे प्रोटीन किती घेतो यापेक्षा ते कोणत्या अन्नातून मिळते, याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

आरोग्यासाठी उपयुक्त प्रोटीनचे स्रोत म्हणजे

  • मासे
  • अंडी
  • डाळी आणि कडधान्ये
  • राजमा, हरभरा यांसारखी बीन्स
  • सोयाबीन
  • सुका मेवा आणि बिया
  • कमी फॅटचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

तज्ज्ञ सांगतात की, या पदार्थांमधून केवळ प्रोटीनच मिळत नाही, तर शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय घटक (फायबर) आणि इतर पोषकद्रव्येही मिळतात. त्यामुळे एकूण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशा नैसर्गिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

काही विशिष्ट अन्नपदार्थांमुळे कॅन्सरचा धोका संभवतो, असे अभ्यासातून समोर आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, सॉसेज, बेकन, हॅम आणि सलामी यांसारखे प्रोसेस्ड मीट नियमितपणे खाल्ल्यास मोठ्या आतड्याच्या (कोलोरेक्टल) कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे WHO ने या पदार्थांना कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या अन्नपदार्थांच्या श्रेणीत ठेवले आहे.

तसेच, रेड मीट (जसे की गोमांस, डुकराचे मांस, मेंढीचे मांस) मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते, असे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे WHO ने रेड मीटला संभाव्य कर्करोगकारक (Probable Carcinogen) म्हणून वर्गीकृत केले आहे.

मात्र, डॉ. तन्वी सिंह सांगतात की, ‘समस्या मांसातील प्रोटीनमध्ये नाही,’ तर ‘कोणत्या प्रकारचे मांस खाल्ले जाते, त्यावर किती प्रक्रिया केली जाते, ते कोणत्या पद्धतीने शिजवले जाते आणि किती प्रमाणात व किती वेळा खाल्ले जाते, यावर सर्व अवलंबून असतं.”

प्रोटीन शेक धोकादायक असतात का?

प्रोटीन शेक्स हे अति प्रक्रिया केलेले पदार्थ असतात अशी टीका केली जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते प्रत्येक प्रोटीन शेक आरोग्यासाठी हानिकारक नसतो.
काही प्रोटीन पावडरमध्ये अतिरिक्त साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि इतर अनावश्यक घटक असतात. मात्र, काही प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, जे आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नसलेल्या व्यक्तींना उपयोगी ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार घेणाऱ्या निरोगी व्यक्तींना प्रोटीन सप्लिमेंट्सची सहसा गरज नसते. मात्र, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारातून बरे होत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रोटीन शेकचे सेवन केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.

मग प्रोटीन खाणे बंद करावे का?

तज्ज्ञ सांगतात, नाही.

  • प्रोटीन हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषकद्रव्य आहे. त्यामुळे ते पूर्णपणे टाळण्याऐवजी योग्य स्रोत आणि योग्य प्रमाणावर भर देणे आवश्यक आहे.
  • प्रोटीन नैसर्गिक अन्नपदार्थांमधून घेण्याचा प्रयत्न करा
  • प्रोसेस्ड मीटचे (सॉसेज, बेकन, सलामी आदी) सेवन मर्यादित ठेवा
  • सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे आहार बदलू नका
  • फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या
  • आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.