पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानाची गरज नेमकी काय?
अक्षय ऊर्जेमुळे भारताची ऊर्जा निर्मिती क्षमता वाढली. सोबत ही वाढती ऊर्जा योग्यवेळी उपलब्ध करून देण्याचे आव्हानही उभे ठाकले. सुर्यप्रकाश आणि वेगवान वाऱ्यावर उत्पादित होणाऱ्या अनुक्रमे सौर आणि पवन ऊर्जेमुळे एखाद्या वेळेस (विशेषत: दिवसा) मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होते. परंतु, त्यावेळी विजेची मागणी असतेच असे नाही. दुसरीकडे मागणीच्या वेळेस (सायंकाळनंतर) वीज उत्पादन कमी असू शकते. विजेच्या मागणी-पुरवठ्याच्या या असमतोलावर पंप्ड स्टोरेज प्रकल्प हा ऊर्जा साठवणुकीला पूरक पर्याय म्हणून निवडला जातो. कर्जतचा सायडोंगर परिसरातील वादग्रस्त प्रकल्प हा या प्रकारातला आहे.
पंप्ड स्टोरेज प्रकल्प म्हणजे काय?
पंप्ड स्टोरेज प्रकल्प हा हायड्रोपॉवर प्रकल्प आहे. याचा अर्थ वीज साठवणारी जलविद्युत यंत्रणा. पारंपरिक जलविद्युत प्रकल्पात नदीच्या प्रवाहाचा किंवा धरणात साठवलेल्या पाण्याचा वापर करून वीज निर्माण केली जाते. पंप्ड स्टोरेजमध्ये बॅटरीसारखी प्रत्यक्ष वीज साठवली जात नसली तरी विजेचा वापर करून पाण्याच्या रूपात ऊर्जा साठवली जाते. उदाहरणार्थ एखाद्या इमारतीच्या खालच्या टाकीतील पाणी विजेच्या मोटारीने गच्चीवरील पाण्याच्या टाकीत चढविले जाते. त्यावेळी मोटार चालविण्याकरिता वीज खर्च होते. वरच्या टाकीत जमा झालेले पाणी खाली सोडल्यास ऊर्जा निर्माण होते. पंप्ड स्टोरेजमध्येही हेच तंत्र वापरले जाते. यात वेगवेगळ्या उंचीवर दोन जलाशय बांधले जातात. दिवसा अतिरिक्त अक्षय ऊर्जा उपलब्ध असताना तिचा वापर करून खालच्या जलाशयातील पाणी पंपांच्या साहाय्याने वरच्या जलाशयात चढवले जाते. पाणी उंचावर साठवल्यामुळे त्यात स्थितिज ऊर्जा जमा होते. सायंकाळनंतर विजेची मागणी वाढल्यावर हेच पाणी पुन्हा खाली सोडले जाते. खाली येणाऱ्या पाण्याच्या दाबाच्या जोरावर टर्बाइन फिरतात आणि जनित्राच्या मदतीने वीज निर्माण होते. वीज अभ्यासकांच्या मते, अशा प्रकल्पांचा उपयोग अतिरिक्त वीज साठवण्याबरोबरच वीजजाळ्यातील वारंवारतेचा समतोल राखणे, व्होल्टेजला आधार देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वीजव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठीही होऊ शकतो. कारण विजेची तातडीची गरज भागविण्याकरिता हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरते.
भारताला अशा प्रकल्पांची किती गरज आहे?
पंप्ड स्टोरेज हे नवे तंत्रज्ञान नाही. परदेशात चीन, अमेरिका, ब्रिटन येथे या प्रकारचे प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात घाटघर येथे या प्रकारचा सुमारे २५० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहे. या शिवाय उत्तराखंडात टिहरी, प. बंगालमध्ये पुरुलिया, तेलंगणातील नागार्जुन सागर आणि श्रीशैलम, तामिळनाडूतील कडमपराई येथेही पंप्ड स्टोरेज प्रकल्प आहेत. भारतात पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर प्रकल्पांच्या विस्ताराची योजना आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जुलै, २०२६ पर्यंत १५,८७० मेगावॉट क्षमतेचे ११ प्रकल्प निर्माणाधीन होते. त्याशिवाय ८,१४० मेगावॉट क्षमतेच्या सहा प्रकल्पांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची संमती मिळाली होती. त्यापैकी एक म्हणजे टोरेंटचा सायडोंगर प्रकल्प. यात संध्याकाळच्या वीज मागणीच्या सर्वोच्च काळात दरवर्षी सुमारे ६ हजार ५७० दशलक्ष युनिट वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. ८० वर्षांत एकूण ५ लाख २५ हजार ६०० दशलक्ष युनिट वीजपुरवठा होईल, असा दावा करण्यात आला आहे. थोडक्यात सुमारे ५५ लाख घरांची संध्याकाळची वीजेची गरज भागवता येईल.
कर्जतमधील सायडोंगर परिसरच का?
पंप्ड स्टोरेजसाठी आवश्यक दाब उपलब्ध होईल, अशा उंचीत फरक असलेली दोन जलाशयस्थळे, योग्य भूगर्भरचना, पुरेसे पाणी आणि जलाशयांदरम्यान पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आवश्यक असते. सायडोंगर परिसरातील डोंगराळ रचना आणि पेज नदीवरील प्रस्तावित खालचा जलाशय या दृष्टीने अनुकूल ठरू शकतात. रस्ते आणि कर्जत रेल्वे स्थानकाची जवळीकही बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकते.
सायडोंगर प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता कशी तपासता येईल?
टोरेंट पॉवरच्या सायडोंगर-१ प्रकल्पाच्या पर्यावरणीय अहवालानुसार, या डोंगरमाथ्यावरील जलाशय आणि पेज नदीवर खालचा जलाशय उभारण्याचे नियोजन आहे. वरच्या जलाशयाची एकूण साठवण क्षमता १५.८७ दशलक्ष घनमीटर, तर खालच्या जलाशयाची क्षमता २८.९६ दशलक्ष घनमीटर प्रस्तावित आहे. अहवालात दररोज सहा तास वीजनिर्मितीचे नियोजन आहे. प्रकल्पाची स्थापित क्षमता तीन हजार मेगावॉट आहे. प्रत्यक्षात किती वीज मिळेल, हे जलाशयातील उपयुक्त पाण्याचे प्रमाण, उंचीतील फरक, टर्बाइनची कार्यक्षमता आणि अन्य तांत्रिक घटकांवर अवलंबून असेल. शिवाय पाण्याची उपलब्धता आणि पुनर्वापराचे गणित महत्त्वाचे आहे. पंप्ड स्टोरेजमध्ये पाणी वारंवार वापरले जात असले, तरी सुरुवातीला जलाशय भरणे, बाष्पीभवनामुळे होणारी घट आणि इतर पाण्याच्या गरजा यांचा हिशेब आवश्यक असतो. प्रकल्पाचा पाण्यावर होणारा प्रत्यक्ष परिणाम समजण्यासाठी पेज नदीच्या प्रवाहाची हंगामनिहाय माहिती, पाणलोट क्षेत्र आणि स्थानिक वापराची माहिती तपासणे गरजेचे आहे. तिसरी, तांत्रिक व्यवहार्यता म्हणजे बांधकाम खर्च, पंपिंगसाठी लागणाऱ्या विजेचा खर्च, देखभाल, वीजवहन व्यवस्था आणि प्रत्यक्ष वापराचे तास यांवर प्रकल्पाचे आर्थिक गणित अवलंबून असेल.
या गणितातून पर्यावरणीय परिणामांची वजाबाकी कितपत गंभीर आहे?
कंपनीच्या पर्यावरणीय अहवालानुसार, प्रकल्पासाठी एकूण ३७७ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी २३३ हेक्टर वनजमीन आणि १४४ हेक्टर बिगरवनजमीन आहे. अहवालात सुमारे ४८ हजार झाडे आणि झुडपांची तोड अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.. परंतु, वनक्षेत्राचा प्रश्न केवळ झाडांच्या संख्येपुरता मर्यादित नाही. जंगल हे अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे अधिवास असते. ते पाणलोट क्षेत्राचे संरक्षण करते, मातीची धूप कमी करण्यास मदत करते आणि स्थानिक जलचक्रावर प्रभाव टाकते. जलाशय, धरणे, बोगदे, रस्ते आणि बांधकामासाठी होणारे उत्खनन यांमुळे या परिसंस्थेवर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. याशिवाय बांधकामातून निघणाऱ्या मलब्याची विल्हेवाट, नियंत्रित स्फोटांमुळे होणारे परिणाम, जलाशयाच्या परिसरातील वन्यजीवांची हालचाल आणि पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन यांचाही विचार करावा लागतो. थोडक्यात प्रकल्प अभयारण्याच्या अधिसूचित हद्दीबाहेर असला, तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन वापरली जाणार असल्याने पर्यावरणीय परिणामांचा स्वतंत्र विचार करावा लागतो.
नैसर्गिक जंगलांची भरपाई कशी होणार?
प्रकल्पाकरिता तोडल्या गेलेल्या वृक्षांची भरपाई वृक्षलागवड, वन्यजीव संवर्धन योजना आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन यांसारख्या उपायांतून केली जाणार आहे. परंतु, केवळ वृक्षलागवडीने नैसर्गिक जंगलाची भरपाई होत नाही. नैसर्गिक जंगलामध्ये नवीजुनी झाडे, झुडपे, वेली, सूक्ष्मजीव आणि अनेक प्रजातींचे परस्परसंबंध असतात. नव्याने लागवड केलेल्या झाडांना वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यांचे जगण्याचे प्रमाण, स्थानिक प्रजातींची निवड, पाण्याची उपलब्धता आणि दीर्घकालीन देखभाल यांवर भरपाई वृक्षलागवडीचे यश अवलंबून असते. त्यामुळे किती झाडे लावली जाणार, याबरोबरच ती कुठे लावली जाणार, त्या जमिनीची पर्यावरणीय स्थिती काय आहे, किती वर्षे देखभाल केली जाणार आणि जगलेल्या झाडांची स्वतंत्र पडताळणी कशी होणार, हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत.
पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतरही हे प्रश्न अनुत्तरित
प्रकल्पाकरिता जागा अनुकूल असली तरी, त्याच क्षमतेचा प्रकल्प कमी वनक्षेत्र बाधित होईल अशा दुसऱ्या जागी उभारता आला असता का, तेथे जलाशयांची रचना कशी असती आणि त्यासाठी किती अतिरिक्त खर्च आला असता, हे तपासणे आवश्यक आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने पंप्ड स्टोरेज प्रकल्पांची छाननी करताना भौगोलिक रचना, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान, जलाशयांची वैशिष्ट्ये, पायाभूत रचना, भूकंपविषयक जोखीम, पर्यावरणीय बाबी आणि वीजवहन व्यवस्था असे निकष ठरवून दिले आहेत. त्यामुळे सायडोंगरची निवड योग्य की अयोग्य, याचा निष्कर्ष काढण्यासाठी अन्य पर्यायांच्या तुलनेतील अभ्यास आवश्यक आहे. असा तुलनात्मक अभ्यास उपलब्ध नसल्यास, केवळ प्रकल्पाची भौगोलिक रचना अनुकूल आहे म्हणून त्याच जागेची निवड अपरिहार्य होती, असे म्हणता येणार नाही. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या हरकती, ग्रामसभांची भूमिका आणि जमीन व वनहक्कांशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया यांचाही स्वतंत्र विचार व्हायला हवा. प्रकल्पाच्या तांत्रिक किंवा आर्थिक फायद्यामुळे या बाबी दुय्यम ठरत नाहीत.
हेही प्रश्न तितकेच महत्त्वाचे
पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर प्रकल्पात वीज साठवून पुन्हा मिळवताना काही ऊर्जा खर्च होते. त्यामुळे ही व्यवस्था अक्षय ऊर्जेकरिता पर्यायी नसून तिचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठीची पूरक यंत्रणा आहे. बॅटरी साठवणूक, अन्य ऊर्जा साठवण तंत्रज्ञान, वीजवहन जाळ्याचा विस्तार आणि मागणीचे व्यवस्थापन हेही पर्याय आहेत. कोणता पर्याय योग्य ठरेल, हे आवश्यक साठवणुकीचा कालावधी, खर्च, उपलब्ध जागा आणि वीजव्यवस्थेच्या गरजांवर अवलंबून असते. विशिष्ट प्रकल्पातून किती ऊर्जा साठवता येईल, ती किती तास उपलब्ध राहील, पंप चालवण्यासाठी कोणत्या वेळी आणि किती वीज लागेल, तसेच या व्यवस्थेचा खर्च इतर पर्यायांच्या तुलनेत किती असेल, यावर या प्रकल्पाची परिणामकारकता ठरते. अक्षय ऊर्जेचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठी ऊर्जा साठवणूक उपयुक्त ठरू शकते. परंतु त्या उद्दिष्टासाठी किती वनक्षेत्र वापरणे अपरिहार्य आहे, पर्यायी जागा उपलब्ध आहेत का आणि पर्यावरणीय हानी कितपत कमी करता येईल, हेही तितकेच महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणून या प्रकल्पावरील मूलभूत प्रश्न पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञान योग्य की अयोग्य, हा नाही. ऊर्जा साठवणुकीचा अपेक्षित फायदा कोणत्या पर्यावरणीय आणि आर्थिक किमतीत मिळणार आहे, आणि त्यापेक्षा कमी हानीकारक पर्याय उपलब्ध आहेत का, हा आहे.
reshma.shivadekar@expressindia.com
