Karjat Torrent Project Sahyadri Deforestation : सह्याद्रीत वाढणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे जंगलं, वन्यजीवांचे अधिवास आणि स्थानिक पर्यावरण यांच्यावर होणाऱ्या परिणामांविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. कर्जतच्या सायडोंगरमधल्या टॉरेंट पॉवरच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

रायगडच्या कर्जत तालुक्यात टॉरेंट पॉवरच्या ३००० मेगावॅट क्षमतेच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून सध्या वाद सुरू आहे. सायडोंगर परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमिनीची गरज असून ३० हजारांहून अधिक झाडं तोडण्याची परवानगी दिल्याचं वृत्त आहे. यामुळे शेकरू, बिबटे, भेकर यांसारख्या प्राण्यांचा अधिवास धोक्यात येईल म्हणून स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. या निमित्ताने, विकासाच्या गरजेबरोबरच सह्याद्रीच्या पर्यावरणीय मर्यादांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रस्तावित प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून १६ किलोमीटर आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर असल्याचं सरकार आणि कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जा मिळेल आणि कोळशावर आधारित वीजनिर्मितीची गरज कमी होईल, असा दावाही करण्यात आला आहे; पण प्रकल्प अभयारण्याच्या हद्दीबाहेर आहे म्हणजे पर्यावरणीय परिणाम होणारच नाहीत, असं मानता येत नाही.

सायडोंगरचा वाद हा एका प्रकल्पापुरता मर्यादित नाही. वन्यजीवांचं अधिवासक्षेत्र, जंगलाची आवश्यकता आणि स्थानिक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे या प्रकल्पाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. ऊर्जा, रस्ते, धरणं आणि इतर पायाभूत सुविधांसाठी सह्याद्रीत वाढणारे हस्तक्षेप लक्षात घेता, विकासाचं नियोजन नेमकं कसं व्हायला हवं, हा मोठा प्रश्न आहे. माधव गाडगीळ समितीचा अहवाल, कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी आणि हवामानबदलाविषयीचं संशोधन या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

सह्याद्रीची ताकद नेमकी कशात आहे?

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा॥’

कवी, नाटककार राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांच्या या ओळी सह्याद्रीचं फार समर्पक वर्णन करतात. आभाळाला गवसणी घालू पाहणारे डोंगर, नानातऱ्हेच्या वन्यजीवांना आसरा देणारी घनदाट जंगलं आणि त्यांच्या अंगाखांद्यावरून खळाळत वाहणारे असंख्य ओढे-धबधबे हे सह्याद्री पर्वतरांगांचं सगळ्यांच्या मनात असलेलं चित्र. पण, मुळात सह्याद्री पर्वतरांग म्हणजे एक अतिशय गुंतागुंतीची पर्यावरणव्यवस्था आहे. पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं, नद्यांच्या प्रवाहाला आधार देणं, मातीची धूप कमी करणं, वन्यजीवांना अधिवास उपलब्ध करून देणं आणि स्थानिक हवामानाचं संतुलन राखणं, अशा अनेक भूमिका ही पर्वतरांग बजावते.

पश्चिम घाटाला जैवविविधतेच्या दृष्टीनं जागतिक महत्त्व आहे. इथल्या अनेक वनस्पती आणि प्राणी विशिष्ट प्रदेशांतच आढळतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासंदर्भातील आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (आयसीयूएन) २०२५ च्या मूल्यांकनानुसार, पश्चिम घाटात जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या किमान ३२५ प्रजाती आढळतात. या मूल्यांकनात पश्चिम घाटाच्या संवर्धनाची स्थिती ‘अतिशय चिंताजनक’ या श्रेणीत ठेवण्यात आली आहे. वाढतं नागरीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार, खाणकाम आणि जंगलांची तुकड्यांत विभागणी हे त्यामागचे प्रमुख धोके आहेत.

प्रा. दीपा पी. आणि प्रा. सूर्या ई.व्ही. यांनी ‘द वेस्टर्न घाट्स’ या आपल्या पुस्तकात मांडल्याप्रमाणे, जंगलातली झाडं, वेली, कीटक, पक्षी, सस्तन प्राणी आणि सूक्ष्मजीव एकमेकांशी जोडलेले असतात. जंगलाचा एखादा भाग नष्ट झाला, तर या सगळ्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. रस्ते किंवा मोठ्या बांधकामांमुळे जंगलाचे तुकडे पडले, तर वन्यजीवांच्या हालचालींसाठी आवश्यक असलेले मार्गही खंडित होऊ शकतात.

म्हणूनच एखादा प्रकल्प अभयारण्याच्या हद्दीत आहे की बाहेर, एवढाच प्रश्न पुरेसा नसतो. प्रकल्पाच्या जागेचा आसपासच्या जंगलांशी, पाणलोट क्षेत्राशी आणि वन्यजीवांच्या अधिवासाशी काय संबंध आहे, हे तपासणंही आवश्यक आहे. सायडोंगरच्या बाबतीतही प्रकल्पाच्या जागेचं पर्यावरणीय महत्त्व, वृक्षतोडीचे परिणाम आणि जवळच्या परिसंस्थांशी असलेली जोडणी समजून घ्यावी लागेल. प्रकल्पाच्या सीमारेषेबाहेर होणारे परिणामही पर्यावरणीय मूल्यमापनाचा भाग असले पाहिजेत.

गाडगीळ अहवालाचा गाभा काय?

पश्चिम घाटाच्या आणि विशेषतः सह्याद्रीच्या पर्यावरणीय संवर्धनाच्या चर्चेसंदर्भात माधव गाडगीळ समितीचा २०११ मध्ये सादर झालेला अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या अहवालाचा अर्थ सह्याद्रीत कोणताही विकास होऊ नये, असा नाही; तर विकास करताना पर्यावरणीय संवेदनशीलता, स्थानिक लोकांच्या गरजा आणि दीर्घकालीन परिणाम यांचा विचार झाला पाहिजे, हा त्याचा मुख्य आग्रह आहे.

गाडगीळ समितीनं संपूर्ण पश्चिम घाटाला पर्यावरणीय संवेदनशील प्रदेश मानून त्यात संवेदनशीलतेनुसार तीन स्तर सुचवले. त्यांना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र १, २ आणि ३ असं म्हटलं जातं. प्रत्येक भागात एकाच प्रकारचे नियम लागू करण्याऐवजी त्या प्रदेशाच्या पर्यावरणीय स्थितीनुसार नियोजन करावं, हा त्यामागचा विचार होता. या समितीनं पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र १ आणि २ मध्ये मोठ्या जलसाठ्यांवर आधारित धरणांना पर्यावरणीय मंजुरी देऊ नये, अशी शिफारस केली होती. जलविद्युत प्रकल्पांसारख्या उपक्रमांचा विचार करताना त्यांचे पर्यावरणीय परिणाम आणि पर्याय तपासण्यावर समितीनं भर दिला.

या शिफारशींचं महत्त्व आजही कायम आहे. कारण एखादा प्रकल्प किती वीज निर्माण करेल, किती गुंतवणूक आणेल किंवा किती रोजगार उपलब्ध करून देईल, एवढ्यावरून त्याची उपयुक्तता ठरत नाही; त्यासाठी किती प्रमाणात जंगल नष्ट होईल, पाण्याच्या प्रवाहात कोणते बदल होतील आणि स्थानिक लोकांच्या जीवनावर काय परिणाम होईल, हेही पाहावं लागतं.

गाडगीळ समितीनं ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागालाही महत्त्व दिलं. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांच्या सीमा निश्चित करताना गावांच्या सीमा आणि नैसर्गिक पाणलोट क्षेत्रांचा एकत्रित विचार करावा, अशी भूमिका अहवालात मांडण्यात आली आहे. याचा अर्थ स्थानिक लोकांना केवळ प्रकल्पाची माहिती देणं पुरेसं नाही; तर त्यांच्या परिसरातली जंगलं, पाण्याचे स्रोत आणि उपजीविकेवर होणारे परिणाम समजून घेत त्यांना निर्णयप्रक्रियेतही सहभागी करून घेणं आवश्यक आहे.

कस्तुरीरंगन अहवाल आणि विकासाच्या मर्यादा

गाडगीळ समितीच्या अहवालानंतर डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कार्यगटानं २०१३ मध्ये पश्चिम घाटाविषयी स्वतंत्र अहवाल सादर केला. या समितीनं पश्चिम घाटातला नैसर्गिक भूभाग आणि मानवी वापरातला भूभाग यांच्यात फरक करून पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यावर भर दिला.

कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार, पश्चिम घाटाचा जवळपास ६० टक्के भाग वस्ती, शेतीसारख्या मानवी वापराच्या भूभागात मोडत होता. नैसर्गिक भूभाग सुमारे ४१ टक्के होता. त्यापैकी जैवविविधतेनं समृद्ध आणि तुलनेनं सलग असलेला सुमारे ३७ टक्के भाग, म्हणजे जवळपास ६० हजार चौरस किलोमीटर क्षेत्र, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली. या अहवालात पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवणाऱ्या खाणकाम आणि प्रदूषणकारी उद्योगांसारख्या उपक्रमांवर निर्बंध सुचवण्यात आले. इतर विकास प्रकल्पांचंही पर्यावरणीय परिणाम आणि गरज लक्षात घेऊन मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला.

सायडोंगर आणि पाली तर्फे कोथळ खलाटी हा भाग केंद्र शासनाने २७ जुलै २०२६ रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात मोडतो. पण, अशा क्षेत्रांमध्ये औष्णिक प्रकल्पांऐवजी जलविद्युत प्रकल्पांना गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन्ही अहवालांनी मान्यता दिल्याचं दिसतं. अर्थातच, त्यासाठी त्या दोघांनीही पर्यावरणीय सुरक्षेचे वेगवेगळे निकष ठरवले आहेत.

गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालांमध्ये दृष्टिकोनाचा फरक असला, तरी दोन्ही अहवाल एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. पश्चिम घाटातल्या प्रत्येक भागाची पर्यावरणीय क्षमता सारखी नाही; त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारचा विकास योग्य ठरेल, असं मानता येत नाही.

पर्यावरणीय किंमत समजवणारं शिवरायांचं आज्ञापत्र

पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांचा एक महत्त्वाचा फायदा आहे. अशा प्रकल्पांमध्ये अतिरिक्त विजेचा वापर करून खालच्या जलाशयातल्या पाण्याचा उपसा वरच्या जलाशयात केला जातो. मागणीच्या वेळी ते पाणी खाली सोडून टर्बाइनच्या मदतीने वीज निर्माण केली जाते. यामुळे वीजपुरवठ्यात समतोल राहतो; पण अशा प्रकल्पांसाठी जलाशय, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानाचाही एकत्रित विचार करणे आवश्यक ठरते.

सायडोंगर प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून तीनपट झाडं लावण्याची योजना असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे. वृक्षलागवड हा पर्यावरणीय नुकसान कमी करण्याचा एक उपाय असू शकतो; पण नव्याने लावलेली झाडं ही अनेक दशकं वाढलेल्या नैसर्गिक जंगलाला पर्याय ठरत नाहीत. नैसर्गिक जंगलात अनेक प्रजातींचे परस्परसंबंध असतात; केवळ समान किंवा पूर्वीपेक्षा अधिक संख्येत झाडं लागल्याने हे संबंध पुन्हा निर्माण होत नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातही वृक्षसंवर्धनाचा विचार स्पष्टपणे दिसतो. महाराजांनी आरमारासाठी उपयोगी असलेली पण स्वराज्यातल्या प्रजेने लावलेली आंबा-फणसाची झाडं न तोडण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. प्रजेला होणाऱ्या नुकसानाची जाणीव ठेवून, वठलेलं झाडही तोडायचं झाल्यास मालकाच्या संमतीने व योग्य आर्थिक मोबदल्यातच तोडावं, असं त्यात नमूद केलं होतं.

गडावर आंबा, फणस, चिंच, वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करावं आणि वेळप्रसंगी त्यांच्या लाकडांचा वापर करावा, असंही महाराज पुढे सांगतात. यातून आजच्या विकास प्रकल्पांसाठी झाडे तोडणे गरजेचे आहे का, प्रकल्पाची रचना बदलून नुकसान टाळता येईल का आणि वृक्षलागवडीचा पर्यावरणीय फायदा तपासणे आवश्यक आहे, हा मोलाचा विचार मिळतो.

हवामानबदलाच्या संकटात सह्याद्रीची क्षमता कशी टिकवायची?

सह्याद्रीत वाढणाऱ्या प्रकल्पांचा विचार करताना हवामानबदलाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. महाराष्ट्राच्या हवामानबदल अनुकूलन आराखड्याचं काम सरकारनियुक्त ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (टेरी) या संस्थेने २०१० मध्ये केलं होतं. ‘टेरी’च्या अहवालानुसार, उत्तर सह्याद्रीत जंगलांचं विखंडन वाढल्यास जैवविविधतेच्या संवर्धनाला आणि हवामानबदलाचे परिणाम सहन करण्याच्या क्षमतेला धोका निर्माण होऊ शकतो.

‘आययूसीएन’च्या मूल्यांकनानुसार, पश्चिम घाटात पावसाचं प्रमाण, तीव्रता आणि कालावधीत बदल झाल्याने पूर व भूस्खलनाचा धोका वाढतोय आणि पाण्याची उपलब्धता प्रभावित होतेय. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाचं मूल्यमापन करताना केवळ जुने अहवाल किंवा आजची स्थिती न पाहता, भविष्यातल्या हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर जलाशयांची सुरक्षितता, पाण्याची उपलब्धता, डोंगरउतारांची स्थिरता आणि जंगलांवरील परिणामांची तपासणी करणं अत्यावश्यक आहे.

फायदे-तोट्यांचा हिशेब हवाच

या प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभागही महत्त्वाचा ठरतो. पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभा व पंचायतींना आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामुदायिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाचे तसेच सामाजिक-आर्थिक विकासाच्या योजनांना मान्यता देण्याचे अधिकार आहेत. विशिष्ट प्रकल्पांना कोणत्या तरतुदी लागू होतात हे कायदेशीर दर्जा तपासून ठरवावे लागते. सायडोंगरसारख्या प्रकल्पातही स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर, जंगलातल्या संसाधनांवर आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होणाऱ्या परिणामांची स्पष्ट माहिती सार्वजनिक केली जाणं अपेक्षित आहे. प्रकल्पाची गरज आणि पर्यावरणीय नुकसान कमी करण्याचे पर्याय यांवर खुली चर्चा होणं गरजेचं आहे.

सह्याद्रीत नवनवे प्रकल्प झेलण्याची ताकद आहे का, याचं उत्तर सह्याद्रीची पर्यावरणीय क्षमता आगामी काळात देऊ शकते. ही क्षमता वरकरणी गोविंदाग्रजांच्या कवितेसारखी वाटते तशी आता अमर्याद राहिली नसून, सह्याद्रीच्या पोटातल्या जंगलांवर, जलसाठ्यांवर, जैवविविधतेवर आणि स्थानिक समुदायांवर आधीच दबाव आहे. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालानुसार, सायडोंगर किंवा इतर कोणत्याही प्रकल्पाचा निर्णय केवळ वीजनिर्मिती आणि अभयारण्याच्या अंतरावर न ठरवता; त्या प्रकल्पाची आवश्यकता, त्यासाठी चुकवावी लागणारी पर्यावरणीय किंमत, जंगलाचं नुकसान, स्थानिकांवर होणारा परिणाम आणि पर्यायी मार्ग तपासूनच घ्यायला हवा. विकासाचा खरा कस हा प्रकल्पाच्या आकारापेक्षा आपण काय मिळवतो आणि काय गमावतो यावर असतो. त्यामुळे सह्याद्रीत नवे प्रकल्प उभारायचे असतील, तर त्याआधी हा हिशेब मांडला जाणं गरजेचं आहे.